agriculture news in marathi agrowon agralekh on drastically fall down prices of bullocks and other animals in Maharashtra | Page 2 ||| Agrowon

बैलांचा उठलेला बाजार

विजय सुकळकर
शुक्रवार, 23 जुलै 2021

ऐन पेरणीच्या हंगामात बैल बाजार बंदचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
 

मुळात शेतीच्या यांत्रिकीकरणाने शेतकऱ्यांकडील जनावरे खासकरून बैल-गोऱ्हे यांची संख्या कमी झाली आहे. असे असले तरी राज्यातील अल्प-अत्यल्प भूधारक शेतकरी दोन-तीन दुधाळ जनावरे (गायी-म्हशी) गोठ्यात पाळतात. त्यापासूनच्या दूध उत्पादनातून होणाऱ्या अर्थार्जनातून शेती-संसाराचा गाडा हाकत असतात. परंतु चारा, पशुखाद्याचे वाढलेले दर आणि लॉकडाउन काळात दुधाचे पाडलेले दर यामुळे दुग्ध व्यवसाय परवडत नसल्याने अनेकांनी दुधाळ गायी-म्हशी विकून आपले गोठे 
मोकळे केले आहेत. काही शेतकरी खरीप हंगामाच्या तोंडावर शेतीकामासाठी एखाद-दुसरे जनावर विकत घेत असतात. तर काही शेतकरी जवळच्या जनावरांची विक्री करून खरिपाचे नियोजन करीत असतात. परंतु मागच्या वर्षी आणि या वर्षीदेखील खरीप हंगामाच्या तोंडावर जनावरांचे बाजार बंद होते. आता ते हळूहळू सुरू होत असले, तरी अजूनही पूर्वपदावर आलेले नाहीत. अशा काळात जनावरांच्या झालेल्या खरेदी-विक्रीत शेतकऱ्यांचा तोटाच झाला आहे. बाजार बंदच्या काळात शेतकऱ्यांना आपले जनावर विकायचे असेल तर स्वस्तात विकावे लागले आणि एखाद्या जनावरांची खरेदी करायचे म्हटले तर व्यापाऱ्यांकडून महागात खरेदी करावे लागले. अशा व्यवहारामुळे देखील शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटण्याचे काम केले आहे. पशुपालकांचे हे दुष्टचक्र येथेच संपत नाही. सद्यपरिस्थितीत तर चपळ अन् डौलदार अशा खिलार बैलाचे संगोपनदेखील शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत आहे. अशावेळी त्यांची विक्री करायचे म्हटले तर लाखमोलाचा खिलार काही हजारांत विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतीचे यांत्रिकीकरण आणि शर्यतबंदीमुळे खिलार बैल जोपासणीत होणारी घट फारच चिंताजनक आहे.

शेतीचे यांत्रिकीकरण वाढलेले असले तरी राज्यातील अनेक अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी बैलावरचीच शेती करतात. त्यातच मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने लहान-मोठ्या शेतकऱ्यांना देखील यांत्रिक शेती खर्चिक ठरत आहे. त्यामुळे त्यांचाही कल बैलावरच्या शेतीकडे दिसून येतो. बैलांचे शेतीतील महत्त्वाचे स्थान, जनावरांच्या खरेदी-विक्रीत शेतकऱ्यांचे दडलेले अर्थकारण, त्यावरील त्यांचे शेती नियोजन हे सर्व पाहता या वर्षीच्या लॉकडाउनमध्ये तरी योग्य त्या सर्व प्रकारच्या खबरदारीत जनावरांचे बाजार सुरू ठेवणे उचित ठरले असते. विशेष म्हणजे या वर्षी राज्यात लॉकडाउन घोषित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन काळात शेती-शेतकऱ्यांसंबंधित सर्व कामे सुरळीत चालू राहतील, असे स्पष्ट केले होते. परंतु ऐन पेरणीच्या हंगामात बैल बाजार बंदचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा बैलगाडा शर्यतीचा आहे. बैलगाडा शर्यतीमध्ये बैलांवर होणाऱ्या अत्याचारामुळे राज्यात सध्या तरी यावर बंदी आहे. शर्यतीसाठी खिलार बैलाचे वेगळे संगोपन केले जाते. अशा बैलजोडीला चांगली किंमत मिळते. परंतु सध्या शर्यत बंदमुळे खिलारचे दर पडलेले आहेत. एवढेच नव्हे तर एकंदरीतच बैलगाडा शर्यतीत दडलेले अर्थकारण धोक्यात आले आहे. बैलगाडा शर्यत ही करमणुकीसाठी असली, तरी अनेकांच्या भावनाही त्यास जडलेल्या आहेत. अशावेळी बैलांवर कोणताही अत्याचार होणार नाही, अपघात होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेत आणि कडक नियम ठरवून आणि त्या नियमांचे सर्वांनी पालन करीत ही 
शर्यत सुरू करायला हरकत नाही. यामुळे खिलार बैलाला चांगले दिवस येतील. शर्यतीसाठी बैलांची साज-सजावट, शर्यतीच्या गाड्या बांधणे हे व्यवसाय सुरळीत चालू होऊन त्यावर उपजीविका करणाऱ्यांना ग्रामीण भागात रोजगार मिळेल.


इतर संपादकीय
रीतसर नफ्याचा घोटाळाशेती हा असा व्यवसाय आहे, की ज्यामध्ये शेतकरी...
व्रतस्थ कर्मयोगीप्रसिद्ध ऊसतज्ज्ञ डॉ. ज्ञानदेव गंगाराम हापसे...
शुभस्य शीघ्रम्शालेय अभ्यासक्रमात कृषीचा समावेश करण्याच्या...
वाढत्या नैसर्गिक आपत्ती गांभीर्याने...पर्यावरणाच्या कडेलोटाच्या कुंठितावस्थेचं ...
शुद्ध खाद्यतेलासाठी हेतूही हवा शुद्धपामची लागवड आणि तेलनिर्मिती वाढविण्यास केंद्र...
कात टाकून कामाला लागानागपूर येथील `केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन...
घातक पायंडाजनुकीय बदल केलेल्या (जीएम) सोयापेंड आयातीला...
ऊस रसापासून थेट इथेनॉल निर्मितीचे हवे...जागतिक पातळीवर उसाच्या थेट रसापासून ३२ टक्के व...
‘गोल्डनबीन’ची झळाळी टिकवून ठेवा मागील दशकभरापासून राज्यात सोयाबीन (गोल्डनबीन)...
दिलासादायक दरवाढ खरे तर यंदाच्या साखर हंगामात साखरेच्या किमान...
अन्नप्रक्रिया योजना ठरताहेत मृगजळ भारतात उत्पादित शेतीमालापैकी ४० टक्के माल सडून...
शेतकऱ्यांच्या जिवांशी खेळ थांबवा सुमारे चार वर्षांपूर्वी २०१७ च्या खरीप हंगामात...
इथेनॉलयुक्त भारतातूनच साधेल इंधन...भारत हा ब्राझीलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ऊस...
डीबीटी’ लाभदायकच!  कृषी विभागांतर्गतच्या विविध योजनांचा एक हजार...
साखर दराला झळाळी; दोन वर्षांतील...कोल्हापूर : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारात...
दिलासादायक दरवाढखरे तर यंदाच्या साखर हंगामात साखरेच्या किमान...
शर्यतीच्या बैलांची निवड आणि संगोपनशर्यतीच्या बैलांची खरेदी साधारण नोव्हेंबर ते...
बैलगाडा शर्यत ः ग्रामीण अर्थकारणाचे साधनबैलगाडी शर्यतीचा इतिहास तसा फार जुना आहे....
‘सिट्रस इस्टेट’ला गतिमान करा विदर्भातील संत्रा या फळपिकाची उत्पादकता वाढवून...
जीवदान अन् दाणादाणहीयावर्षी जूनमध्ये ऐन पेरणीच्या हंगामातील पावसाचा...