agriculture news in marathi agrowon agralekh on economic crises | Agrowon

मंदीचा मार
विजय सुकळकर
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा रसातळाला जात असताना देशांतर्गत अथवा जागतिक व्यापार सुधारुन तो रुळावर आणण्यासाठी सरकारकडे ठोस असा काहीही कार्यक्रम दिसत नाही.
 

गेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत आहेत. मागील सहा महिन्यांपासून वाहन उद्योग ‘रिव्हर्स गिअर’मध्ये आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांनावर अनेक सवलती देऊन, त्यांच्या किमती कमी करूनही खप वाढत नाही. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची विक्री अनुक्रमे १७ आणि २३ टक्क्यांनी घटली आहे. वाहन उद्योगाशिवाय जीनिंग आणि कापड उद्योग, बांधकाम, पर्यटन, वाहतूक, संगणक सॉफ्टवेअर, खाण, ऊर्जा अशा अनेक क्षेत्रांना मंदी हळूहळू आपल्या कवेत घेत आहे. विदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेत आहेत. बॅंकेच्या बुडीत कर्जात वाढ होतेय. भारताची निर्यातही घटत चालली आहे. शेतीवर तर कायम तोट्याचे क्षेत्र म्हणून ठपकाच बसलाय. आर्थिक मंदीचे सावट केवळ आपल्याच देशावर आहे असे नाही. जगात दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनच्या औद्योगिक उत्पादनांतही घट होतेय. तर जगात पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेतही आगामी दोन वर्षांमध्ये आर्थिक मंदी येण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. गंभीर बाब म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा रसातळाला जात असताना देशांतर्गत अथवा जागतिक व्यापार सुधारुन तो रुळावर आणण्यासाठी सरकारकडे ठोस असा काहीही कार्यक्रम दिसत नाही.

ट्रिपल तलाक असो की कलम ३७० आणि ३५ ए हटविणे असो केंद्र सरकारच्या या निर्णयांचे देशभरात जोरदार स्वागत झाले, अजूनही होत आहे. परंतु, या वातावरणात केंद्र सरकारला खालावलेल्या अर्थव्यवस्थेचा विसर पडलेला दिसतो. या निर्णयांनी देशातील जनताही भारावून गेली असून बिघडलेल्या अर्थव्यवस्थेच्या झळांची सध्यातरी त्यांना जाणीव होत नाही. राष्ट्र बांधणीसाठी धाडसी राजकीय निर्णय आणि ठोस आर्थिक धोरणे या दोन्ही बाबी महत्त्वाच्या असतात, असे मत भाजपचेच खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी व्यक्त केले आहे. तर देशात अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी नव्या सुधारणांची गरज असल्याचे आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना वाटते. मात्र, केंद्र सरकारच्या अजेंड्यावर सध्या तरी ठोस आर्थिक धोरण आणि नव्या सुधारणा या दोन्ही बाबी नाहीत. त्याचे गंभीर परिणाम आगामी काळात देशाला भोगावे लागले तर नवल वाटू नये. आर्थिक सुधारणांच्या बाबतीत बोलायचे झाले तर मोदी सरकारने याचसाठी नोटबंदी आणि जीएसटी लागू करण्याचे निर्णय घेतले होते. परंतु, या दोन्ही निर्णयांनी अर्थव्यवस्थेला गती तर मिळाली नाही, उलट ग्रहणच लागले असून ते सुटता सुटेनाशे झाले आहे. देशात मुळातच बेरोजगारी वाढत आहे. त्यातच आर्थिक मंदीने लाखो लोकांचे रोजगार हिरावून घेतले जात असताना बेरोजगारीचा विस्फोट होतो की काय, असे आता वाटू लागले आहे. 

उद्योग क्षेत्राला मंदीच्या दृष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी यापूर्वी बुस्टर पॅकेजेस दिलेली आहेत. तसेच पॅकेज या वेळी सुद्धा मिळावे, अशी उद्योग क्षेत्राची मागणी आहे. उद्योगांच्या उत्पादनांना उठाव मिळण्यासाठी सर्वसामान्यांची क्रयशक्ती वाढली पाहिजे. सर्वसामान्यांची क्रयशक्ती वाढविण्यासाठी शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक स्थिती सुधारायला हवी. आंतराष्ट्रीय व्यापारात सुधारणेसाठी त्या देशांसोबत राजकीय संबंध चांगले असणे गरजेचे आहे. सध्या आपण जगातील बहुतांश देशांसोबत राजकीय संबंध चांगले असल्याचे दाखवत असलो तरी वास्तविक परिस्थिती तशी नाही. चीनसोबत संबंधात कटुता येत आहे. अमेरिकासुद्धा चीनबरोबर आपल्याही आर्थिक नाड्या आवळत आहे. त्यामुळे या देशांकडून पुढे व्यापार-उद्योगात फारसे सहकार्य लाभेल, असे वाटत नाही. आखाती तसेच युरोपीय देशांबरोबरची शेतमालासह एकूणच निर्यात घटत चालली आहे. त्यामुळेच व्यापार युद्धानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारात निर्माण होत असलेल्या पेचांचा सामना करण्यासाठी नव्याने रणनीती आखल्याशिवाय निर्यात वाढणार नाही. अशी काही पावले तातडीने उचलल्यास आर्थिक मंदीच्या विळख्यातून आपली सुटका होऊ शकते. 

इतर अॅग्रो विशेष
महाराष्ट्राप्रमाणे आम्हालाही विकसित...पुणे : महाराष्ट्रातील शेतकरी पीक उत्पादन...
कांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग...नाशिक : कांद्यातील भाववाढीला आळा घालण्यासाठी...
द्राक्षपंढरीत गोड्या छाटण्यांना सुरवातनाशिक : चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामाला सुरवात...
युरियाशिवाय शेती विचार रुजला तरच...नागपूर ः सेंद्रिय शेतीचा विचार गेल्या अनेक...
...अखेर ऊसतोड कामगार महामंडळ स्थापनमुंबई ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा निकाली...नागपूर ः नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील...
शेतकरी कंपन्यांकडून हमीभावाने खरेदीची...पुणे : किमान हमीभाव खरेदीच्या कार्यक्रमात शेतकरी...
राज्यात उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने...
राज्यात नवे जलधोरणपुणे : राज्याच्या जुनाट जलधोरणाला अखेर मूठमाती...
कृषी विभाग उभारणार गाव पातळीवर शेतकरी...नागपूर ः ग्रामपंचायत कार्यालयात कृषी सहायकांकरिता...
अनुदान अर्जांना १०० टक्के पूर्वसंमती...पुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांमधील...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशी विश्रांती घेतल्यानंतर अरबी...
कीडनाशके विक्री पात्रतेचा तिढा सुटलापुणे : देशात कीडनाशके विक्रीसाठी शैक्षणिक...
‘अमूल’कडून राज्यात कडवे आव्हानपुणे : राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत...
मॉन्सूनचा मुक्काम लांबणारपुणे : निम्मा सप्टेंबर उलटूनही परतीच्या...
अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टर शेती नापेरअकोला ः अनियमित पावसाचा यंदा खरिपाला मोठा फटका...
नाशवंत शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी...पुणे : राज्यातील नाशवंत शेतमालाचे काढणीपश्‍चात...
शेतमाल प्रक्रिया उद्योगातून मिळाला...नांदेड जिल्ह्यातील बहाद्दरपुरा (ता. कंधार) येथील...
कुक्कुटपालनातून मिळाली स्वयंपूर्णतापरिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वळके...