agriculture news in marathi agrowon agralekh on effect of climate change on coral reefs | Page 2 ||| Agrowon

समुद्रातील ‘अद्‍भुत खजिना’ 

विजय सुकळकर
गुरुवार, 24 जून 2021

सुंदर, सळसळत्या प्रवाळ बेटांचे भवितव्य सुरक्षित राहण्यासाठी अनेक संस्था, शास्त्रज्ञांचे इशारे वारंवार मिळत असताना यांच्या प्रभावी संवर्धनासाठी जगभर व्यापक मोहीम राबविण्याची वेळ आता आली आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्यावर असलेल्या रंगीबेरंगी प्रवाळ बेटांना (ग्रेट बॅरिअर रिफ) हवामान बदलामुळे हानी पोहोचत आहे. त्यांचे जतन करण्यासाठी ऑस्ट्रेलियावर काही प्रमाणात निर्बंध लादण्याचा संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक वारसा समितीचा विचार आहे. प्रवाळ बेटांच्या संवर्धनास आम्ही समर्थ असल्याचा दावा आस्ट्रेलिया केला आहे. प्रवाळ बेटे संवर्धनासाठी ऑस्ट्रेलियावर निर्बंध लादणे हे आंतरराष्ट्रीय राजकारण असल्याचेही तेथील सरकारने स्पष्ट केले आहे. समुद्रात निर्माण होणाऱ्या वादळांचा कणखरपणे मुकाबला करणाऱ्या तसेच असंख्य सागरी जिवांचे प्रजनन केंद्राबरोबर मुख्य अधिवास असणाऱ्या सागरी प्रवाळांना खरा धोका हा मनुष्यप्राण्यापासूनच आहे. याबाबत पूर्वीदेखील अनेक इशारे जगात जिथे जिथे प्रवाळ बेटे आहेत, त्या देशांना मिळाले आहेत. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, कॅरिबियन समुद्र व ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरियर रिफमधील प्रवाळ बेटे वातावरणातील वेगाने होणाऱ्या बदलामुळे २०५० मध्ये नष्ट होतील, अशी नोंद इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्‍लायमेट चेंजने (आयपीसीसी) केली आहे. 

प्रवाळांमध्ये अब्जावधी प्रवाळ कीटक असतात. या प्रवाळांची रचना अतिशय गुंतागुंतीची असते. काही प्रवाळांचा आयुर्वेदिक औषधांमध्ये उपयोग होतो. अनेक स्थानिक माशांच्या प्रजातींचे प्रजनन प्रवाळ बेटांमध्ये होते. तसेच, इतर समुद्र जीवसृष्टीसाठी प्रवाळ बेटे आश्रयापासून ते अन्नापर्यंत अशा अनेक अंगांनी उपयुक्त असतात. त्यामुळेच समुद्र जीवसृष्टीसाठी प्रवाळ बेटे जीवदानच म्हणावे लागतील. प्रवाळ बेटांची उपयुक्तता एवढ्यापुरतीच सीमित नाही, तर ते समुद्रकिनारे सुरक्षित ठेवण्यासाठीसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतात. समुद्राच्या पृष्ठभागावर रेलून वाढणाऱ्या प्रवाळांमुळे वादळांना, मोठ्या लाटांना अटकाव होतो. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील अनेक गावांना त्यांचा तडाखा बसत नाही. एवढेच नव्हे तर जगातील किमान ५० कोटी लोक मासेमारी, पर्यटन या माध्यमातून अर्थार्जन करण्यासाठी प्रवाळ परिसंस्थेवर अवलंबून आहेत. जागतिक पातळीवर प्रवाळ बेटे दरवर्षी जवळपास १० कोटी डॉलरचा नफा कमावून देतात. ही प्रवाळ खजिना असाच नामशेष होत राहिला तर भविष्यात मानवाला वाढत्या वादळांना मार आणि काही जणांना उपासमार सोसावी लागणार आहे. 

भारतीय समुद्रातही तीन प्रकारची प्रवाळ बेटे आहेत. कोकणातील मालवणजवळील आंग्रिया बॅंक हे एक बुडालेले कंकणाकृती प्रवाळ बेट असून, जगातील सर्वांत मोठा प्रवाळ साठा तिथे असावा, असा संशोधकांचा अंदाज आहे. या प्रवाळ बेटाचे रहस्य उलगडले तर ते जगातले सर्वोत्तम सागरी पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला येऊ शकते. ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरियर रिफमधील रंगीबेरंगी सुंदर प्रवाळ बेटांची सफर अनुभवण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक दरवर्षी भेट देतात. यातून ऑस्ट्रेलियाला अब्जावधी डॉलरचा फायदा होतो. अनेक अंगांनी महत्त्वाच्या अशा प्रवाळ बेटांचे मग ते जगाच्या पाठीवर कुठेही असोत, त्यांचे संवर्धन व्हायलाच पाहिजेत. समुद्राचे वाढते प्रदूषण, समुद्राच्या पाण्याचे वाढत असलेले तापमान, कार्बन डायऑक्साइड वायूचे वाढते उत्सर्जन, मॅंग्रूव्ह वनांची होत असलेली तोड अशा अनेक कारणांमुळे प्रवाळ बेटे नष्ट होत आहेत. समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता खालावल्याने घातक स्पाँजचे प्रमाण प्रवाळ बेटांच्या भागात वाढत आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम प्रवाळांच्या वाढीवर होतोय. या सर्व बाबींवर तत्काळ नियंत्रण आणावे लागेल. प्रवाळ बेटे संवर्धनाची जगभर व्यापक मोहीम राबविण्याची हीच वेळ आहे. प्रवाळाचे श्‍वेतन रोखण्यासाठी जागतिक पातळीवर समुद्राचे तापमान वाढू नये म्हणूनही खबरदारी घेतली पाहिजे. तथापि, स्थानिक पातळीवर मानवनिर्मित धोके कमी केल्यास प्रवाळांच्या संवर्धनास हातभार लागू शकतो. स्थानिक नेतृत्वाने पुढाकार घेऊन प्रवाळांचे विज्ञान समजून घेऊन शाश्‍वत पर्यटनाची आखणी केली पाहिजे. ग्रेट बॅरिअर रिफचा धोकादायक जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यास त्यांच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न होतील. 


इतर संपादकीय
इथेनॉलयुक्त भारतातूनच साधेल इंधन...भारत हा ब्राझीलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ऊस...
डीबीटी’ लाभदायकच!  कृषी विभागांतर्गतच्या विविध योजनांचा एक हजार...
साखर दराला झळाळी; दोन वर्षांतील...कोल्हापूर : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारात...
दिलासादायक दरवाढखरे तर यंदाच्या साखर हंगामात साखरेच्या किमान...
शर्यतीच्या बैलांची निवड आणि संगोपनशर्यतीच्या बैलांची खरेदी साधारण नोव्हेंबर ते...
बैलगाडा शर्यत ः ग्रामीण अर्थकारणाचे साधनबैलगाडी शर्यतीचा इतिहास तसा फार जुना आहे....
‘सिट्रस इस्टेट’ला गतिमान करा विदर्भातील संत्रा या फळपिकाची उत्पादकता वाढवून...
जीवदान अन् दाणादाणहीयावर्षी जूनमध्ये ऐन पेरणीच्या हंगामातील पावसाचा...
स्वतंत्र सिंचन यंत्रणेची करा निर्मितीपंतप्रधान कृषी सिंचन योजना देशातील अनेक राज्यांत...
घटता सहभाग चिंता वाढविणारापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी...
अनुदानात अडकले सूक्ष्म सिंचनाचे थेंब ठिबक व तुषार सिंचन पद्धती वापरून कमी पाण्यात...
हिरव्या ऋतूत पाण्याची वानवायावर्षी देशपातळीवर सरासरीपेक्षा अधिक पावसाच्या...
तीन दशके आर्थिक उदारीकरणाची!वामनाने तीन पावलांत बळीराजाला पाताळात ...
शांतता, संसदेत गोंधळ सुरू आहे!अनेक महत्त्वाच्या घडामोडी गेल्या आठवड्याने...
एफआरपी ः दूधदरावर कायमस्वरूपी तोडगाखरे तर मागील दशकभरापासून राज्यातील दुग्ध व्यवसाय...
अडचणीत वाढ अन् लुटीला प्रोत्साहनआधीच शेतकऱ्यांवर प्रचंड निर्बंध लादलेले असताना...
अवजारांची उपयुक्तता अन् दर्जा कसून...मागील दीड-दोन दशकांमध्ये देशात, राज्यात...
असा आदर्शवादी नेता पुन्हा होणे नाहीगणपतराव देशमुख ३० जुलै २०२१ ला आपल्यातून निघून...
आव्हान पाण्याच्या अन् चिखलाच्या पुराचेकोकणात २२ जुलै २०२१ या दिवशी ६३० मि.मी. एवढा...
जीवनमरणाचा प्रश्‍न निकाली काढामागील काही वर्षांपासून सोयाबीनच्या चांगल्या...