agriculture news in marathi agrowon agralekh on effect of corona on agriculture export | Agrowon

निर्यात आपत्ती व्यवस्थापन

विजय सुकळकर
शनिवार, 4 एप्रिल 2020

शेतमाल निर्यातीत दिवसेंदिवस समस्या ह्या वाढतच जाणार आहेत. हे लक्षात घेता देशात निर्यात आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करायला हवा.

वैविध्यपूर्ण पिकांच्या दर्जेदार उत्पादनांत महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. त्यामुळेच राज्यातील फळे-फुले-भाजीपाला देशभरच नाही तर जगभर पोचतो. शेतमालाच्या एकूण निर्यातीत राज्याचा वाटा ६० टक्केहून अधिक आहे. द्राक्ष, डाळिंब, कांदा आदींच्या निर्यातीत तर हा वाटा ८० ते ९० टक्के आहे. मागील सात-आठ वर्षांचा अनुभव पाहता शेतमाल निर्यातीत राज्याने चांगलीच घडी बसविली आहे. त्यामुळेच शेतमालाचा दर्जा आणि मानवी आरोग्य सुरक्षितता याबाबतीत अनेक देशांनी नवनवीन कठोर नियम, निकष, अटी लावल्या तरी त्यास शेतकऱ्यांपासून निर्यात प्रक्रियेतील सर्वच घटकांचा योग्य प्रतिसाद लाभल्यामुळे निर्यातीत आपला दबदबा कायम आहे. या दरम्यान केंद्र सरकारच्या काही चुकीच्या निर्णयांमुळे निर्यातीचा आलेख खाली घसरला आहे. त्यातच मागील तीन महिन्यांपासून कोरोनाचे थैमान जगभर सुरु आहे. त्यामुळे आयात निर्यात ठप्प झाली आहे. याचा सर्वात मोठा फटका आपल्या राज्याला बसला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रसार अजून किती दिवस चालेल, हे सध्यातरी सांगणे कठीण आहे. परंतू यातून सर्व जग सावरले तरी त्यावेळी जागतिक बाजाराचा एकंदरीत ट्रेंड पूर्णपणे बदललेला असेल. अशा परिस्थितीत आपल्या राज्यातून मागील तीन चार दिवसांपासून द्राक्ष, कांदा यासह काही भाजीपाल्याची निर्यात सुरु झाली आहे. निर्यातीबाबत शेतकऱ्यांचा आग्रही पुढाकार, काही शेतमाल निर्यातीसाठी राज्यात उपलब्ध सेवा-सुविधा, अपेडासह इतरही संस्थांचे प्रयत्न तसेच केंद्र सरकारच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे.

आपल्याकडे अॅक्रिडेटेड पॅकहाऊस जवळपास १२० आहेत. अशा पॅकहाऊसमध्ये ग्रेडींग, पॅकींग केलेलाच शेतमाल निर्यात होऊ शकतो. परंतू बहुतांश पॅकहाऊस सध्या शेतमालाने भरुन आहेत. ते खाली झाले तरच शेतमाल निर्यातीचा मार्ग मोकळा होईल. शेतमाल निर्यातीसाठी यातील सर्वच घटक युद्धपातळीवर प्रयत्न करताहेत. एअर कारगो, गुड्स (मालवाहतूक) कारगो याद्वारे शेतमालाची निर्यात चालू करण्यात आली आहे. निर्यातीसंबंधित सर्वच संस्था, अधिकारी व्यक्ती दिवसरात्र सेवा देत आहेत. तरीही यात नवनवे अडथळे येत असल्याने काही शेतमालाची निर्यात रखडलेलीच आहे. कोकणातील हापूसची बंदरापर्यंत वाहतुक होताना दिसत नाही. फुलांचे मुख्य मार्केट असलेल्या नेदरलॅंड या देशाला कोरोनाचा विळखा पडल्याने त्या देशातून फुलांना मागणीच नाही. सण, उत्सव, समारंभ, सोहळे हे सर्वच बंद असल्याने देशांतर्गत बाजारपेठेतूनही फुलांना मागणी नाही. कोकणातील आंबा रेल्वेने आणून तो विमानाने विदेशी पाठविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याबरोबरच कोरोनानंतरच्या बदलत्या जागतिक व्यापारात निर्यातीसाठी नवनवे देश शोधणे, त्यांच्या शेतमालाबाबतच्या ऑर्डर्स मिळविणे, आपला शेतमाल सुरक्षित कसा आहे, हे विविध देशांना पटवून देणे, याबाबत शेतमालनिहाय शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे लागेल. अपेडा, राष्ट्रीय संशोधन संस्था तसेच केंद्र-राज्य शासनांने यासाठी पुढाकार घ्यायला हवा. हे करीत असतानाच कीडनाशके उर्वरित अंश, कीड-रोग अवशेष याबरबरच आता कोरोना विषाणूमुक्त शेतमालाची मागणी सर्वच देश करतील. अशा शेतमालासाठी शेतकरी ते निर्यातदार यांनी काय काळजी घ्यायला पाहिेजे, हेही संबंधित घटकांना सांगावे लागेल. महत्वाचे म्हणजे शेतमाल निर्यातीत दिवसेंदिवस समस्या ह्या वाढतच जाणार आहेत. हे लक्षात घेता देशात निर्यात आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करायला हवा. याचे कामकाज दिल्ली - राज्य राजधानीचे ठिकाण - जिल्हा अशा तीन स्तरावर चालेल, हेही पाहावे लागेल. यातून निर्यातीबाबत उद्भवलेल्या समस्येचे जागीच अन् तात्काळ निवारणासाठी प्रयत्न व्हायला हवेत. असे झाले तरच आपली शेतमाल निर्यात सुरक्षित आणि सुरळीत चालू असेल, अन्यथा नाही.
..........................


इतर संपादकीय
आता संकल्प फेरमांडणीचा : मोहम्मद युनूस"कोरोना'ने आपल्याला नव्याने सर्व काही सुरू...
उद्धवजी, शेतीत पैसा येऊ द्या !वाहतुकीसह सर्व पुरवठा साखळी अशीच विस्कळित राहिली...