agriculture news in marathi agrowon agralekh on effect of corona lockdown on agro tourism | Agrowon

कृषी पर्यटन टिकायलाच हवे

विजय सुकळकर
सोमवार, 6 एप्रिल 2020

कृषी पर्यटनाची उपयुक्तता आपल्या ध्यानात येत असताना किंबहूना प्रचंड रोजगार क्षमता असलेले हे क्षेत्र देशात बाल्यावस्थेत असतानाच यांस `कोरोना’ने ग्रासले आहे.
 

कोरोना या घातक विषाणूचा प्रसार जगात, देशात आणि आपल्या राज्यात सुद्धा वाढत आहे. स्पर्शातून संसर्ग होणाऱ्या या विषाणूवर सध्यातरी नियंत्रणात्मक प्रभावी उपचार नसल्याने याची लागण होऊन मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आकडा वाढत आहे. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे. कोरोनाची लागण आणि प्रसार एकमेकांचा संपर्क टाळूनच आपण रोखू शकतो. त्यामुळेच देशभर २१ दिवस लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे फिरणे तर सोडा, मात्र घराबाहेर पडणेही बंद झाले आहे. याचा मोठा फटका शेतीसह अनेक जोडव्यवसाय, पूरक व्यवसायाला बसला असला तरी सर्वाधिक अवकळा ही पर्यटन व्यवसायावर आली आहे. अनेक देशांच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय पर्यटनाचा मोठा वाटा आहे. तर काही लहान देशांचे अर्थकारणच पर्यटनावर चालते. अशा सर्व देशांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेती आणि काही शेतीजोडव्यवसाय परवडत नसल्याने आपल्या देशात, राज्यात अलिकडच्या काळात अनेक शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन या नव्या शेतीपूरक व्यवसायाची कास धरली होती. कृषी पर्यटन व्यवसायातून उत्पन्न वाढविण्याच्या आशेने अनेकांनी कर्ज काढून गुंतवणूक केली. परंतू या व्यवसायाला मोठी खीळ बसली आहे. त्यामुळे हा व्यवसाय करणारे शेतकरी आणि त्यात काम करणारे मनुष्यबळावर उपासमारीचीच वेळ आली आहे.

कृषी पर्यटन हे ग्रामीण भारतातील रोजगार निर्मितीचे महत्वाचे साधन असून या माध्यमातून छोट्या-मोठ्या शेतकऱ्यांचे शाश्वत विकास शक्य झाला आहे. कृषी पर्यटनाची उपयुक्तता आपल्या ध्यानात येत असताना किंबहूना प्रचंड रोजगार क्षमता असलेले हे क्षेत्र देशात बाल्यावस्थेत असतानाच यांस कोरोनाने ग्रासले आहे. त्यामुळे कृषी पर्यटनाला लवकरच चांगले दिवस येतील, असे वाटत होते, नेमक्या अशा वेळी या व्यवसायाचे भवितव्यच अंधकारमय दिसून येत आहे. काही जणांनी कृषी पर्यटनाकडे मुख्य व्यवसाय म्हणून पाहिले, यांस हॉटेल, रिसॉर्टचे स्वरुप दिले ते तर अधिकच आर्थिक संकटात सापडले आहेत. ज्यांनी खऱ्या अर्थाने कृषी पर्यटन हा व्यवसाय शेतीपूरक म्हणून जोपासला ते तुलनेने कमी अडचणीत आहेत. महत्वाचे म्हणजे बहुतांश हॉटेल, रिसॉर्ट व्यावसायिकांनी त्यात काम मनुष्यबळाला घरी बसविले आहे. परंतू कृषी पर्यटन व्यावसायिकांना यातील मनुष्यबळाला शेतीत गुंतविण्याची संधी असून अनेक जण तसे करीत आहेत. अशा वेळी कृषी पर्यटन चालक तसेच त्यात काम करणारे मनुष्यबळ या दोघांनीही आर्थिक अडचणीच्या वेळी समंजसपणाची भुमिका घ्यायला हवी. असे केल्यास हातावर पोट असणाऱ्यांचा रोजगार आणि कृषी पर्यटन व्यवसाय हे दोन्ही टिकेल.

कृषी पर्यटनात अन्न, निवास व्यवस्था, मनोरंजन आणि प्रवास यावरील खर्च कमी आहे. सर्व कुटुंबाला सामावून घेता येतील, अशा सेवा-सुविधा तेथे उपलब्ध असतात. महत्वाचे म्हणजे इतर पर्यटन स्थळांना होत असलेली गर्दी पाहता अनेक जण शांत निसर्गरम्य कृषी पर्यटनाला पसंती दर्शवित आहेत. अशावेळी हा व्यवसाय कोरोनानंतरच्या आर्थिक महामंदीनंतरही पुढे चालू राहायला हवा. या वर्षीच्या ऐन हंगामातच हा व्यवसाय पूर्णतः बंद आहे. त्यातून काहीही आर्थिक मिळकत नाही. त्यामुळे कर्ज काढून उभ्या केलेल्या अनेक व्यावसायिकांना कर्ज हप्ते भरता येणार नाही. त्यामुळेच कृषी पर्यटनासाठी काढलेल्या कर्जाचे पुनर्गठण व्हायला पाहिजे. या व्यवसायात आर्थिक मिळकत सुरु होईपर्यंत कर्जे हप्ते वसुलीला स्थगिती मिळायला हवी. कर्ज हप्त्यात काही सवलत देता येईल का, अनुदानाच्या स्वरुपात या व्यवसायाला काही मदत करता येईल का, याबाबतची राज्य शासनाने विचार करायला हवा.
...................................


इतर संपादकीय
आता संकल्प फेरमांडणीचा : मोहम्मद युनूस"कोरोना'ने आपल्याला नव्याने सर्व काही सुरू...
उद्धवजी, शेतीत पैसा येऊ द्या !वाहतुकीसह सर्व पुरवठा साखळी अशीच विस्कळित राहिली...