आता थांबवा संसर्ग!

देशात तापमान जसजसे वाढत जाईल, तसतसा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता आहे. असे असले तरी कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न व्हायला पाहिजेत.
agrowon editorial
agrowon editorial

मागील डिसेंबरपासून जगभर (प्रामुख्याने चीनमध्ये) कोरोना विषाणूचा थरार चालू आहे. या विषाणूचा प्रसार अथवा संसर्ग अत्यंत झपाट्याने होतोय. मागील अडीच महिन्यांत जगभरातील १०० हून अधिक देशांत कोरोना विषाणू पोचला आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण होऊन मृत पावलेल्यांचा आकडा चार हजारांवर जाऊन पोचला आहे. कोरोनाची लागण झालेल्या इतर देशांतही मृतांची संख्या वाढतेय. जगभर कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आपल्या देशात याचा शिरकाव होऊ न देणे, अफवा पसरू न देणे तसेच लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ न देणे या सर्वच पातळ्यांवर केंद्र-राज्य शासनासह सर्वांनाच अपयश आले आहे.

भारतात कोरोना विषाणू दाखल झाला असून तो झपाट्याने पाय पसरतोय. देशात काश्मीर ते केरळपर्यंत कोरोना बाधित रुग्ण आढळत असून हा आकडा ६० जवळ जाऊन पोचला आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे पुण्यात कोरोना ‘पोझिटिव्ह’ची संख्या पाच झाली असून राज्यात अनेक संशयित रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहर व जिल्ह्यात ‘आपत्ती व्यवस्थापन कायदा’ लागू करण्यात आला आहे. कोरोनाबाबतच्या अफवांचा सोशल मीडियावर महापूर आलेला आहे. कोरोना नेमका कशाने होतो, हेदेखील माहित नसणारे याबाबतचे उपाय, औषधं व्हॉट्सॲप, फेसबूक आदी माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोचवित आहेत. तुलनात्मक आरोग्य विभाग, शासनाद्वारे देण्यात येणारे संदेश कमीच आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आणि दहशतीचे वातावरण आहे. चिकन खाल्ल्याने कोरोना होत असलेल्या अफवेने राज्यातीलच नव्हे तर देशभरातील कुक्कुटपालन व्यवसाय संकटात आहे. चीनसह जगभरातील आयात-निर्यात पूर्णपणे थांबली आहे. पर्यटन व्यवसाय ठप्प आहे. कोरोनामुळे जगभरात दोन हजार अब्ज डॉलरचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. 

आपला देश मुळातच दाट लोकसंख्येचा आहे. या देशात अनेक ठिकाणी कामानिमित्त तसेच अनावश्यकदेखील गर्दी केली जाते. कामानिमित्त स्थलांतराचे प्रमाणही देशात अधिक आहे. विशेष म्हणजे स्वच्छता, आरोग्याबाबत येथील बहुतांश नागरिक जागरूक नाहीत. आपली आरोग्य यंत्रणा खूपच विस्कळित आहे. बहुतांश आरोग्य केंद्रात प्राथमिक सेवा सुविधादेखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत देशात कोरोनाचा संसर्ग अथवा फैलाव जलदगतीने होऊ शकतो. यात समाधानकारक बाब म्हणजे कोरोनाचा विषाणू २८ ते ३० अंश सेल्सिअसच्या पुढील तापमानात टिकाव धरत नाही, असे यातील जाणकार सांगताहेत. देशातील बहुतांश राज्यात मार्च-एप्रिलमध्ये तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे असते. देशात तापमान जसजसे वाढत जाईल, तसतसा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता आहे. असे असले तरी कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न व्हायला पाहिजेत.

कोरोनाबाबत सोशल मीडियाद्वारे पसरविल्या जात असलेल्या अफवा तत्काळ थांबवायला हव्यात. कोरोना नेमका कशाने होतो, होत नाही याबाबतची शास्त्रशुद्ध अन् अधिकृत माहिती आरोग्य विभागातर्फे देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचवायला हवी. देशभरातील नागरिकांनीसुद्धा कोरोनाची लागण आणि प्रसार रोखण्यासाठीच्या आरोग्य विभागाकडून सांगितल्या जात असलेल्या दक्षतांचे काटेकोर पालन करायला हवे. सर्दी, खोकला, ताप येत असेल तर घाबरून न जाता तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. देशभरातील कोरोना बाधित आणि संशयित रुग्णांवर संबंधित यंत्रणेकडून आवश्यक त्या उपचारांना सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे. शहरी तसेच ग्रामीण विभागातील रुग्णालयांमध्ये कोरोनासाठीचे विलगीकरण कक्ष तसेच इतर उपचार साहित्य सज्ज असावे. प्रत्येक जण आपल्या वैयक्तिक पातळीवरील स्वच्छतेने कोरोनाची लागण आणि प्रसार थांबवू शकतो, हे लक्षात घ्यायला हवे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com