भरवशाचा निर्यातदार हीच खरी ओळख

अचानक लादण्यात येत असलेल्या निर्यातबंदीमुळे एक बेभरवशाचा निर्यातदार अशी आपली ओळख जागतिक बाजारात निर्माण होत आहे.
agrowon editorial
agrowon editorial

डाळी, कांदा याबरोबरच इतरही शेतीमालाचे देशांतर्गत बाजारपेठेत थोडेफार दर वाढू लागले अथवा कधी कधी तर दर कमी असले, तरी पुढे दर वाढून ग्राहकांवर त्याचा बोजा पडू नये, या उद्देशाने केंद्र सरकारने निर्यातबंदीचे तसेच गरज नसताना शेतीमाल आयातीचे निर्णय घेतले आहेत. आपल्या देशात असे निर्णय संबंधित शेतीमालाचे उत्पादक, शेतकऱ्यांच्या संघटना, विक्रेते, निर्यातदार, त्यांची आयात करणारे देश अशा कोणालाही विश्‍वासात न घेता, घेतले जातात. त्यामुळे या सर्व संबंधित घटकांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. शेतीमाल निर्यातबंदीच्या तसेच अनावश्यक आयातीच्या निर्णयाने देशांतर्गत बाजारपेठेतील दर कोसळतात, यात उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्या पुढील बाब म्हणजे कुठलीही सूचना न देता, भारताकडून निर्यातबंदीचे निर्णय घेतले जातात, याबाबत जागतिक व्यापार संघटना - कृषी समितीच्या बैठकीत अमेरिका, जपान आदी देशांनी आक्षेप नोंदविला आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या कृषिविषयक कलमात निर्यातबंदीच्या वेळी पूर्वसूचना आवश्यक असताना मागील सप्टेंबरमध्ये कांदा निर्यातबंदी करताना ती का दिली गेली नाही, असा प्रश्‍न उपस्थित गेला गेलाय. कांदा निर्यातबंदीबाबत भारताकडून देण्यात आलेले स्पष्टीकरण या दोन्ही देशांना मान्य नाही. त्यामुळे येथून पुढे तरी शेतीमाल आयात-निर्यातीबाबत आपल्याला कसेही वागता येणार नाही.

मागील पाच-सात वर्षांत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अन्नधान्ये, फळे-फुले-भाजीपाला यांचे उत्पादन देशात वाढले आहे. काही शेतीमाल तर खास निर्यातीसाठी पिकविला जातो. अशावेळी आपल्या गरजेपेक्षा जास्तीचे उत्पादन निर्यात केले गेले पाहिजेत. अनेक देशांकडून आपल्या शेतीमालास मागणी वाढत आहे. ही शेतीमाल निर्यातवाढीसाठी संधी आहे. अशावेळी चीन-अमेरिकेतील शीत युद्ध आणि कोरोना विषाणूचा वाढलेला प्रादुर्भाव यामुळे शेतीमाल आयात-निर्यातीची समीकरणे बदलली आहेत. मानवी आरोग्याबाबत जगभरातील ग्राहक सजग झाला आहे. आपल्या देशात नव्या कीड-रोगांचा शिरकाव टाळण्यासाठी अनेक देशांनी शेतीमाल आयातीचे निकष कठोर केले आहेत. शेतीमाल निर्यातवृद्धीसाठी ही आव्हाने जिकिरीचे ठरत असताना शेतकरी निर्यातक्षम उत्पादन घेत आहेत. मात्र केवळ केंद्र सरकारच्या आयात-निर्यातीबाबतच्या धरसोडीच्या धोरणांमुळे आपला निर्यातीचा टक्का घसरत आहे, ही बाब दुर्दैवी आहे.

केंद्र सरकारने निर्यातीला प्रोत्साहनासाठी २०१८ मध्ये शेतीमाल निर्यात धोरण आणले. देशात ‘एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल’ स्थापन करण्यात आलेत. अशावेळी अचानक लादण्यात येत असलेल्या निर्यातबंदीमुळे एक बेभरवशाचा निर्यातदार अशी आपली ओळख जागतिक बाजारात निर्माण होत आहे. वर्षभरात कुठून कुठला शेतीमाल आयात करायचा, याबाबत बहुतांश देशांचे नियोजन असते. अशावेळी आपण अचानक एखाद्या शेतीमालावर निर्यातबंदी लावली तर आपल्याकडून तो शेतीमाल आयात करणाऱ्या देशांचे नियोजन कोसळते. ऐनवेळी असा शेतीमाल आयात करायचा कुठून, असा पेच त्यांच्यासमोर उभा राहतो. असे सातत्याने होत राहिले तर आयातदार आपल्यापासून शेतीमाल आयात करण्याचे टाळतील. त्यामुळे शेतीमालाबाबतीत ‘भरवशाचा निर्यातदार’ अशी आपल्या देशाची ओळख निर्माण झाली पाहिजेत. शेतीमालाच्या निर्यातबंदीचा निर्णय नकोच. कधी घेतला गेलाच तर त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजेत. अन्न व नागरी पुरवठा, वाणिज्य आणि कृषी अशा मंत्रालयात आयात-निर्यातीबाबत समन्वय आवश्यक असून एकमेकांना विश्‍वासात घेऊनच त्यांनी निर्णय घ्यायला हवेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com