‘लष्करी’ हल्ला

राज्यात अमेरिकी लष्करी अळीवर नैसर्गिक बुरशीचा प्रादुर्भाव होऊन अळ्या मरत असल्याचे दिसून येत आहे. अशा वेळी अधिक उष्णतामानात या बुरशी कशा काम करतील, यावर संशोधन व्हायला पाहिजे.
संपादकीय.
संपादकीय.

चालू खरीप हंगामात अमेरिकी लष्करी अळी (फॉल आर्मी वर्म) या किडीने राज्यात धुमाकूळ घातला आहे. या किडीच्या हल्ल्याने मक्याचे ४० ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान केले आहे. कीडनाशकांच्या तीन-चार फवारण्या करूनही ही कीड आटोक्यात येत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना आपल्या मका पिकावर नांगर फिरवावा लागला आहे. लष्करी अळी प्रादुर्भावग्रस्त आणि त्यावर फवारणी केलेले मका पीक जनावरांच्या खाण्यात आल्याने काही ठिकाणी विषबाधेच्या घटनाही घडल्या आहेत. मका पीक उपलब्ध नसलेल्या ठिकाणी या किडीने तिच्या ‘होस्ट रेंज’मधील इतर पिकांवर आपला मोर्चा वळविला आहे. जेजुरी-सासवड भागात बाजरी तर नगर आणि खानदेशात कापसावर या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. रब्बी हंगामात या किडीचा ज्वारीवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी घातक अशी लष्करी अळी देशात दाखल झाल्याचे वृत्त प्रथमतः अॅग्रोवनने दिले होते. त्यानंतर कापसावर या किडीच्या प्रादुर्भावाची नोंदही प्रथम अॅग्रोवननेच नुकतीच घेतली आहे. असे असताना शासन, प्रशासन आणि शास्त्रज्ञ हे सर्वच या किडीच्या बाबतीत कमालीचे गाफील असल्याचे दिसून येते. त्यामुळेच या किडीचा प्रसार राज्यात झपाट्याने होत असताना शेतकऱ्यांकडे आजही प्रभावी नियंत्रणाचे उपाय नाहीत. लष्करी अळीच्या कापसावरील प्रादुर्भावाबाबत विद्यापीठातील तज्ज्ञ तसेच कृषी विस्तार यंत्रणा यामध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे. आपल्या राज्याबरोबर इतरही राज्यांत अनेक पिकांवर या किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हे राष्ट्रीय संकट ठरत आहे. या सर्वच बाबी अत्यंत गंभीर असून या किडीचा प्रसार रोखण्यापासून ते प्रभावी नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना स्पष्ट असे मार्गदर्शन व्हायला हवे.

मक्यावरील लष्करी अळीच्या वाढत्या प्रादुर्भावाने राज्यातील दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. लष्करी अळी ही बहुभक्षी कीड असून या किडीचा प्रादुर्भाव तृणधान्ये, नगदी पिके, तेलबिया आणि भाजीपाला आदी पिकांवर होऊ शकतो. सध्या ऊस आणि कापूस या पिकांवर या किडीचा प्रादुर्भाव कमी असला तरी बाहेर देशांत या पिकांबरोबर भात आणि सोयाबीनचे देखील या किडीने मोठे नुकसान केले आहे. हे सर्व पाहता या किडीकडे वेळीच लक्ष दिले नाही तर राज्यातील संपूर्ण शेती धोक्यात येऊ शकते. खरे तर या किडीच्या व्यापक होस्ट रेंजबरोबर अंडी घालणे, एका रात्रीतील प्रवास, समुदायाने हल्ला करून पीक फस्त करण्याची क्षमता या सर्वांचा नीट अभ्यास करायला हवा होता. तसेच चीन, तैवान ‍आदी देशांनी नेमक्या कोणत्या उपाय योजना केल्या हे पाहणेही गरजेचे होते. पण तसेही काही झाले नाही. एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती हीच घातक अशा किडींना नियंत्रणात ठेवण्याचा प्रभावी उपाय असल्याचे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. त्यातही लष्करी अळीच्या नियंत्रणाकरिता जैविक नियंत्रणावर भर द्यायला हवा.

सुदैवाची बाब म्हणजे राज्यात अमेरिकी लष्करी अळीवर नैसर्गिक बुरशीचा प्रादुर्भाव होऊन अळ्या मरत असल्याचे काही ठिकाणी दिसून आले आहे. परंतु, आता लवकरच राज्यात ‘ऑक्टोबर हिट’ सुरू होईल. त्यामुळे उष्णतामान वाढत गेले म्हणजे या नैसर्गिक बुरशी प्रभावीपणे काम करणार नाहीत. अशावेळी अधिक उष्णतामानात या बुरशी कशा काम करतील, यावर संशोधन व्हायला पाहिजे. या किडीला फस्त करणारे मित्र कीटकही शोधायला हवेत. जनावरांना चारा तसेच मानवी खाद्यातही मक्याचा वापर होत असल्याने लष्करी अळीवर प्रभावी अशी जैविक कीडनाशके शेतकऱ्यांना मिळायला हवीत. रासायनिक नियंत्रणामध्ये परिणामकारक कीडनाशकांच्या योग्य मात्रेबाबत शेतकऱ्यांना अवगत करावे लागेल. रासायनिक कीडनाशकांच्या फवारणीनंतर नेमक्या किती दिवसांनी मका पिकांचा चारा म्हणून वापर करावा, जेणेकरून विषबाधा टाळता येईल, हेही शेतकऱ्यांना सांगावे लागेल. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातूनच लष्करी अळीच्या हल्ल्याचा प्रतिकार आपण करू शकू, हेही लक्षात घ्यायला हवे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com