हिंसाचारामागचे खलनायक कोण?

‘प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या किसान रॅली’ला हिंसक वळण लावणारे खलनायक कोण, याचा कसून तपास लावण्याची जबाबदारी दिल्ली पोलिसांसह केंद्र सरकारची आहे.
agrowon editorial
agrowon editorial

दोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताकदिनी हिंसेचे गालबोट लागले. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत मुख्य परेडनंतर ‘किसान गणतंत्र परेड’ करण्याचे ठरले होते. केंद्र सरकारकडून आंदोलनाकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध म्हणून या परेडमध्ये दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात येईल, ही परेड शांततेत होईल, अशी ग्वाही शेतकरी नेत्यांनी दिली होती. ट्रॅक्टर रॅलीत अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला होता. असे असताना देखील सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेलगत आंदोलक (?) दिल्लीत घुसले. आंदोलकांनी ठरलेली वेळ आणि मार्गाचे पालन केले नाही, असा आरोप पोलिस करीत आहेत, तर ठरलेल्या मार्गावरून शांततेत जाताना आमची नाहक अडवणूक केली जात होती, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसेला शेतकरी नेते जबाबदार असल्याचे केंद्र सरकारला वाटते, तर या हिंसेशी आमचा काहीही संबंध नाही, असे शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले आहे. 

प्रसारमाध्यमे खास करून काही हिंदी, इंग्रजी वृत्तवाहिन्या आंदोलनादरम्यानच्या हिंसाचाराचे आपल्या सोयीने वार्तांकन करून लोकांमध्ये आपल्या भूमिकेनुसार ‘परसेप्शन’ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सोशल मीडियावर देखील आंदोलनातील हिंसेबाबतचे फोटो, व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पंजाबचा ॲक्टर-सिंगर दीप सिद्धू यांनी काही तरुण शेतकऱ्यांना भडकावून लाल किल्ल्याकडे मोर्चा नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दीप सिद्धूची भाजपशी जवळीक काही लपून नाही. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशावेळी ‘प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या किसान रॅली’ला हिंसक वळण लावणारे खलनायक कोण, याचा कसून तपास लावण्याची जबाबदारी दिल्ली पोलिसांसह केंद्र सरकारची आहे.

चार दिवसांपूर्वीच दिलेला दोन वर्षांसाठी कायदे स्थगित करण्याचा शेवटचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळून लावल्यानंतर केंद्र सरकारमध्ये भयंकर अस्वस्थता दिसून येत होती. त्यातच महाराष्ट्रासह इतर राज्यांतही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काढलेल्या मोर्च्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे केंद्र सरकारवरील दबाव वाढतच चालला होता. परंतु काहीही झाले तरी कायदे कायमचे रद्द करायचे नाहीत, अशी केंद्र सरकारची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन आता चिरडले पाहिजेत, असा विचार केंद्र सरकार पातळीवर झालेला दिसतो. जे शाहीनबागमध्ये घडले तेच या आंदोलनातही घडवून आणण्याचा प्रयत्न दिसून येत होता.

मुळात हे तीनही कृषी कायदे सविस्तर चर्चा न करता, कायदे करण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता ते शेतकऱ्यांवर लादले आहेत. या विरोधात शेतकरी आंदोलन करीत असताना त्यांना ‘खलिस्तानी’ ठरविले गेले. आंदोलक हे नसून शेतकऱ्यांचे दलाल आहेत. त्यांना चीन-पाकिस्तानकडून फंडिंग होते आहे. असे कितीतरी आरोप सरकारकडून आंदोलकांवर झाले. मात्र किसान संघटनांनी आरोपबाजीच्या सापळ्यात न अडकता शांततेने आंदोलन सुरूच ठेवल्याने सरकारची मोठी गोची झाली होती. त्या पार्श्‍वभूमीवर प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंसाचाराचा लाभ कोणाला होणार, याचे उत्तर उघड आहे. त्यामुळे या हिंसाचारामागे नेमके कोण आहे, याची पारदर्शक आणि निरपेक्ष चौकशी करण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com