agriculture news in marathi agrowon agralekh on farming crises | Agrowon

शेतकऱ्यांचा विचार सर्वप्रथमच हवा

विजय सुकळकर
गुरुवार, 9 एप्रिल 2020

कष्ट करुन पिकविलेला शेतमाल देशभर लॉकडाउन असताना सुद्धा सर्व जनतेची भूक भागावी म्हणून शेतकरी स्वःत जोखीम पत्करुन तो सर्वांना पुरवित आहे. या त्यांच्या कार्याला खरे तर सलामच करायला हवा.
 

......
कोरोनाचा लॉकडाउन अजूनही सहा दिवस आहे. अनेक उद्योग-व्यवसाय बंद असल्यामुळे संपूर्ण देशभर वातावरण ठप्प आहे. पोलिस, डॉक्टरसह इतर वैद्यकीय व्यवसायातील व्यक्ती, सैनिक, स्वच्छता कामगार लॉकडाउनमध्येही युद्धपातळीवर काम करीत आहेत. सध्याच्या आरोग्य आणीबाणीत अजून एक वर्ग सुट्टीवर नसून तो अविरत कष्ट करीत आहे. तो वर्ग म्हणजे शेतकरी. रब्बी-उन्हाळी हंगामातील पिकांची काढणी-मळणीची कामे सुरु आहेत. अनेक भागात उन्हाळी मशागतीची कामे पण चालू झाली आहेत. इतर शेतमाल विक्री ठप्प झाली असली तरी फळे-भाजीपाला, दूध ही दैनंदिन गरजेची अत्यावश्यक उत्पादने शेतकरी जीवाचे रान करुन शहरी ग्राहकांपर्यंत पोचवत आहेत. असे करीत असताना शासन-प्रशासनाकडून सेवा-सुविधा देणे तर सोडाच, उलट शेतकऱ्यांना ही यंत्रणा त्रासच देत आहेत. फळे-भाजीपाला शहरांत पोचवताना अनेक शेतकऱ्यांना पोलिसांचा मार खावा लागत आहे. सद्य परिस्थितीत शेतमालाचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांना किती त्रास होतोय, याचा विचारच न केलेला बरा. शेतातील कोणत्याही कामासाठी मजूर मिळत नाहीत. बी-बियाण्यासह इतरही निविष्ठा शेतकऱ्यांना मिळत नाहीत. ट्रॅक्टरचलित यंत्र-अवजाराने काढणी-मळणी-मशागतीच्या कामांचे दर प्रचंड वाढले आहेत. एवढ्या दिव्यातून शेतमाल उत्पादन घेतले जात असून त्याची विक्री करतानाच्या अडचणी देखील प्रचंड वाढल्या आहेत.

कोरोना दहशतीच्या पार्श्वभूमीवर अजून एका शेतकऱ्यांवरील आघाताकडे शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मागील आठवड्यापासून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये वादळी पाऊस तसेच गारपीट सुरु आहे. खरे तर मागील पावसाळा अतिवृष्टि, महापुराने गाजविला. तर पावसाळा संपल्यापासून सातत्याने नैसर्गिक आपत्ती सुरुच आहेत. यामध्ये रब्बी तसेच उन्हाळी पिके आणि फळ-भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले आहे. पुढील चार दिवसांत राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला असल्याने हे संकट अजूनही पूर्णपणे टळलेले नाही. परंतू कोरोना लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची साधी चर्चा देखील कुठे होताना दिसत नाही. अशावेळी पाहणी-पंचनामे तर दूरच म्हणावे लागतील.

शेतमालाचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांना काय कष्ट पडतात, त्यांना काय त्रास होतो, याचा साधा विचार देखील अंगावर काटा आणतो. मजूरटंचाई, निविष्ठांचे वाढलेले दर, त्यातील भेसळ, न परवडणारे यांत्रिकीकरण, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टि यामुळे शेतमालाचा उत्पादन खर्च वाढला आहे. पीक हाती येईपर्यंत उत्पादनाची शाश्वती नाही, तर मार्केटमध्ये शेतमाल नेऊन विकेपर्यंत मिळकतीची हमी नाही. त्यातच कोणताही शेतमाल असो दर त्याचा उत्पादन खर्चसुद्धा निघणार नाही, एवढा कमी मिळतो. अशा परिस्थितीत पिकविलेला शेतमाल देशभर लॉकडाउन असताना सुद्धा सर्व जनतेची भूक भागावी म्हणून शेतकरी स्वःत जोखीम पत्करुन तो सर्वांना पुरवित आहे. या त्यांच्या कार्याला खरे तर सलामच करायला हवा. विशेष म्हणजे एवढ्यावरच थांबून चालणार नाही. शेतकऱ्यांच्या या कार्याची दखल शासन, प्रशासन तसेच सर्व जनतेने देखील घ्यायला हवी. सध्याच्या परिस्थिती शेतकऱ्यांचा विचार हा सर्वप्रथम व्हायला हवा. नैसर्गिक आपत्तीत त्यांचे होत असलेल्या नुकसानीचे पाहणी-पंचनामे करुन शेतकऱ्यांना त्वरीत आर्थिक मदत करायला हवी. तसेच सध्याच्या लॉकडाउनमध्ये शेतमाल उत्पादन घेताना, त्याची वाहतुक-विक्री करताना त्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, हेही शासन-प्रशासनाने पाहायला हवे.
.................................


इतर संपादकीय
आता संकल्प फेरमांडणीचा : मोहम्मद युनूस"कोरोना'ने आपल्याला नव्याने सर्व काही सुरू...