झळा वणव्याच्या!

आपल्याकडे मुळातच वनक्षेत्र कमी असल्याने वणव्याने जंगल नष्ट झालेल्या ठिकाणी नव्याने वृक्ष लागवडीचे नियोजन वन विभागाने करायला हवे.
agrowon editorial
agrowon editorial

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील कवठणी गाव परिसरात नुकत्याच लागलेल्या आगीत माळरान जमीन खाक झाली. या आगीत आंबा, काजू, जांभळाची शेकडो झाडे जळून खाक झाली. राज्यात पूर्व विदर्भापासून ते पश्‍चिमेच्या कोकण किनारपट्टीपर्यंत उन्हाळ्यास सुरुवात झाली की गायरान, माळरान, वन-जंगल जमिनीत वणवे पेटत असतात. हे सत्र पावसाळा सुरू होईपर्यंत चालू राहते. जंगलात क्वचितच नैसर्गिक कारणांमुळे आगी लागतात. जंगल क्षेत्रातील ज्वालामुखी, वादळ तसेच वीज पडल्याने लागणारी आग ही सर्व वणव्याची नैसर्गिक कारणे आहेत. तर अनैसर्गिक कारणांमध्ये गवताच्या वाढीसाठी, अकाष्ठ वनोपज गोळा करण्यासाठी, शेती करण्यासाठी, वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी, त्यांना हाकलून लावण्यासाठी, वन गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यासाठी जंगलाला आग लावली जाते. राब जाळताना योग्य दक्षता न घेतल्याने देखील आग जंगलात पसरते. जंगलातील रस्त्याने माणसे जाताना जळती विडी, सिगारेट न विझवता तशीच जंगलात टाकतात किंवा माचिसची जळती काडी निष्काळजीपणे फेकतात. त्यामुळेही वणवा लागतो. 

वणव्यात चराऊ कुरणे, जंगलातील साग, साल, खैर, बांबू आदी मौल्यवान वटवृक्षांसह असंख्य दुर्मीळ वनौषधी नष्ट होत आहेत. वन्य जीव, पशुपक्षीही वणव्यातून आपले प्राण वाचवू शकत नाहीत. डोंगर उतारावर केली जाणारी शेती, जंगलालगतच्या जमिनीला वणव्याच्या झळा बसतात. शेतातील पिके, फळझाडे, गोठ्यातील जनावरे वणव्याच्या आगीत होरपळतात. त्यामुळे वनांच्या बरोबरीने शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान हे वेगळेच! वणव्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा फटका शेकडो किलोमीटर अंतरापर्यंतच्या पिके आणि वनस्पतींना बसत असल्यचेही एक अभ्यास सांगतो. वणव्यामध्ये जमिनीतील आर्द्रता घटते, वनांची उत्पादनक्षमताही घटते. सातत्याने आगी लागल्यास वनांपासून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये मोठी घट होते. वणव्यामुळे जमिनीवरील वनस्पतींचे आच्छादन नष्ट होते. जमिनीची धूप होते. मध्य युरोपामधील जंगलात लागणाऱ्या आगीमुळे तापमानामध्ये वाढ होत असल्याचेही एका संशोधनातून पुढे आले आहे. यावरून वणव्याच्या दाहक झळा आपल्या लक्षात यायला हव्यात. पेटलेला वणवा आटोक्यात आणणे हे अवघड काम आहे. त्यामुळे तो पेटूच नये यासाठी खबरदारी घ्यायला हवी. 

आगीचा इशारा देणारे वायरलेस सेंसरचे जाळे उभारून कमी खर्चात आगीची माहिती मिळविली जाऊ शकते. परंतु आग लागू नये म्हणून पूर्वापार चालत आलेल्या जाळरेषा आणि आग लागल्यानंतर विझविण्यासाठी झाडांच्या फांद्या याच पद्धतीवर आजही वनखाते अवलंबून असल्याचे दिसून येते. राज्यात प्रत्येक वनक्षेत्राचा सुधारित आग संरक्षण आराखडा तयार करायला हवा. अशा आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीतून राज्यात वणव्याचे प्रमाण घटू शकते. या आराखड्यामध्ये प्रतिबंधात्मक तसेच नियंत्रणात्मक उपाययोजना असायला हव्यात. वणव्याबाबत स्थानिक लोकांमध्ये प्रबोधन वाढवायला हवे. वनालगत राब भाजणे, राख तयार करणे ही कामे करताना जंगलाला आग लागणार नाही, याची दक्षता सर्वांनी बाळगणे कायद्याने बंधनकारक आहे. गावाजवळच्या वनाला आग लागल्यानंतर ती तत्काळ विझविणे आवश्यक आहे. त्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मदत करणे वन कायद्यानुसार गावकऱ्यांना बंधनकारक आहे. आपल्याकडे मुळातच वनक्षेत्र कमी आहे. त्यात वणवे पेटून दरवर्षी वनक्षेत्र कमी होते. वणव्याने जंगल नष्ट झालेल्या ठिकाणी नव्याने वृक्ष लागवडीचे नियोजन वन विभागाने करायला हवे. जळीत जंगले पुन्हा हिरवी होण्याची प्रक्रिया नैसर्गिकरीत्या सुरू होते. मात्र अनेक ठिकाणी ही प्रक्रिया सुरू होत नाही. अशी नैसर्गिक प्रक्रिया न घडणारी ठिकाणे शोधून त्या ठिकाणी वृक्ष पुनर्लागवड करणे फायदेशीर ठरते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com