मानवनिर्मित आपत्ती!

डोंगर-दऱ्या पोखरून रस्ते केले जात आहेत. शहरालगतच्या टेकड्या कोरून तेथे बहुमजली इमारती उभ्या राहत आहेत.
agrowon editorial
agrowon editorial

राज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच हाहाकार उडाला आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना महापुराने विळखा घातला तर कोकणामध्ये डोंगर-दरडी कोसळून अनेकांचे प्राण गेले. रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर तालुक्यांवर निसर्ग अक्षरशः कोपल्याचे पाहावयास मिळाले. महाडच्या तळिये गावात दरडीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण गाडले गेले. या आपत्तीने राज्यभरात ८० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. अनेक जण अजूनही बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढणार आहे. शेतीपिके, गुरेढोरे, इतर मालमत्तेचीही अपरिमित हानी झाली असून, यथावकाश नुकसानीचे आकडे पुढे येतील. या आपत्तीमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. ठिकठिकाणच्या दुर्घटनास्थळी मृतांच्या नातेवाइकांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश ऐकायला मिळतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळिये गावाला भेट देऊन ओढवलेला प्रसंग मोठा कठीण असून स्वतःला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचे पुनर्वसन करू, असा आधार दुर्घटनाग्रस्त लोकांना दिला. एखादी दुर्घटना घडली की शासन-प्रशासन तात्पुरते जागे होते. चार-आठ दिवस अशा दुर्घटना टाळण्याबाबत चर्चा होते. सरकारही आपण काहीतरी करतोय, असे दाखवते. मात्र ठोस काहीच होत नाही. पुन्हा महापूर, दरड-डोंगर कोसळून काही जणांचे प्राण जातात. हे असे मागील अनेक वर्षांपासून राज्यात सुरू आहे. 

आज सुमारे पाच वर्षांपूर्वी भीमाशंकर परिसरात माळीण गाव डोंगरकडा कोसळून जमिनीच्या पोटात गडप झाले होते. यात २०० हून अधिक जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. सुमारे तीन वर्षांनंतर या गावचा पुनर्वसन सोहळा पार पडला. त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माळीणसारख्या डोंगराजवळ असलेल्या धोकादायक गावांचा आढावा घेण्याचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे. अशा गावात आपत्ती येऊच नये म्हणून उपाययोजना केल्या जातील, असे स्पष्ट केले होते. या कामाचे पुढे काय झाले, ते या राज्यातील जनतेला कळेल का? सरकार बदलले तरी हे काम सुरू असते तर आज कदाचित तळिये आणि इतर गावांत दरडी कोसळून अनेकांना प्राण गववावे लागले नसते. एवढेच नाही तर दरड कोसळण्यापूर्वी येथील ग्रामस्थांना दुर्घटनेचे काही संकेत मिळाले होते. शासन-प्रशासनाने वेळीच सावध होऊन मदतकार्य पोहोचविले असते तरीही अनेकांचे प्राण वाचले असते. परंतु तसेही झाले नाही. तळियेत माळीणचीच पुनरावृत्ती झाली आहे. आता तळियेची तरी पुनरावृत्ती नको, एवढी काळजी घ्यायला हवी. अनेकांच्या मृत्यूनंतरचे पुनर्वसन काही कामाचे नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे.

महापूर, भूस्खलन असो की दरड-डोंगर कोसळणे असो, या सर्व मानवनिर्मितच आपत्ती आहेत. निसर्गात मानवाच्या नको तेवढ्या हस्तक्षेपाने वातावरणाचे संतुलन बिघडले आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गाला सारखे ओरबाडणे सुरू आहे. त्याचीच परतफेड निसर्ग करतोय. डोंगर-दऱ्या पोखरून रस्ते केले जात आहेत. शहरालगतच्या टेकड्या कोरून तेथे बहुमजली इमारती उभ्या राहत आहेत. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. त्यामुळे भूस्खलनाचे प्रमाण वाढले आहे. नदी-नाल्यांत भर टाळून त्यांचे प्रवाह अडविले, वळविले जात आहेत. राडारोडा, कचरा, सांडपाणी नदीपात्रात सोडून तिला प्रदूषित केले जात आहे. मोठी गावे, शहरांत पाणी निचऱ्याची व्यवस्था नाही. त्यामुळे अचानक होणाऱ्या अतिवृष्टीने पुराचे प्रमाण वाढले आहे. धरणाचे पाणी सोडण्याबाबतही दोन राज्यांत समन्वय दिसत नाही. अनेक वेळा धरणाचे पाणी अचानक सोडल्याने त्या खालील गावांना पुराचा वेढा पडतो, तर कधी पाणी न सोडल्याने धरणांच्या मागील गावे पाण्याखाली जातात. निसर्गात मानवाचा नको तेवढा हस्तक्षेप थांबवावा लागेल. हवामान बदलाच्या काळात नैसर्गिक आपत्ती वाढत असताना समन्वय आणि सर्वांच्याच एकत्रित प्रयत्नांतून त्यावर मात करावी लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com