वृक्ष संपन्न देशात विदेशी वृक्ष का?

आपल्या देशात सुमारे ५० हजार वनस्पती प्रजाती असून, यापैकी ४० टक्के प्रजाती विदेशी आहेत. विदेशी वृक्षांचे उपद्रवमूल्य आता सर्वांना कळू लागले आहे. यामुळेच अलीकडील काही वर्षांत जनतेच्या वृक्ष लागवड विचारसरणीत बदल झालेला आहे.
agrowon editorial article
agrowon editorial article

आज आपल्यासमोर सर्वांत गंभीर संकट उभे आहे, ते जागतिक तापमानवाढीचे आणि हवामान बदलांचे. अलीकडील काही वर्षांपासून पृथ्वीचे तापमान दरवर्षी सतत वाढत आहे. त्याचे प्रमुख कारण आहे, हवेचे प्रदूषण, वाढते औद्योगिकीकरण आणि वाढती वाहन संख्या. हवेत कार्बन डायऑक्‍साइडचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. जागतिक तापमानवाढीत कार्बन डायऑक्‍साइडचा सर्वांत मोठा म्हणजेच, सुमारे ७२ टक्के वाटा आहे. तापमान वाढीमुळे हवामानात बदल होऊन, निसर्गचक्रच बदलत आहे. ऋतुचक्रही बदललं आहे. चक्रीवादळांचे प्रमाण वाढले आहे. अवेळी पडणाऱ्या प्रचंड पावसामुळे मोठे नुकसान होत आहे. उकाडा असह्य होऊ लागला आहे. या सर्व कारणांमुळे मानवी जीवनावर, वन्यजीवांवर आणि पीक व्यवस्थेवरही विपरीत परिणाम होऊ लागले आहेत. यामुळे पिकांचे उत्पादन कमी होत आहे. कीटकजन्य व विषाणूजन्य रोगांचे प्रमाण वाढले आहे. पृथ्वीतलावर जगणे हळूहळू असह्य बनू लागले आहे. यामुळे हवेचे प्रदूषण कमी करणे अत्यावश्‍यक आहे. नैसर्गिकपणे हवेचे प्रदूषण कमी करण्याची क्षमता फक्त वनस्पती आणि वृक्षांमध्ये आहे. यासाठी आपल्याला वनांची, जंगलांची आवश्‍यकता आहे. हवेचे शुद्धीकरण व पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे महत्त्वाचे काम वृक्ष करतात. पण अतिरेकी मानवी हस्तक्षेपांमुळे वनक्षेत्र झपाट्याने कमी होत चालले आहे. पर्यावरण संतुलनासाठी ३३ टक्के भूक्षेत्रावर वनांचे आच्छादन असणे आवश्‍यक असताना, आपल्याकडे अवघे २० टक्के जंगलक्षेत्र शिल्लक राहिले असून, यामध्येही दाट वनांची टक्केवारी फक्त नऊ टक्के आहे. यामुळेच आपणांस वनक्षेत्र व वृक्षांच्छादन क्षेत्र वाढविणे अत्यंत आवश्‍यक आहे. 

या सर्व कारणांमुळेच हल्ली शासकीय स्तरांवर वृक्ष लागवडीच्या मोठमोठ्या योजना दरवर्षी राबविल्या जात आहेत. अनेक सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, महानगरपालिका, निसर्ग-पर्यावरण आणि वृक्षप्रेमी संघटना मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करीत आहेत. पण ही वृक्ष रोपे जगण्याचे प्रमाण मात्र अति अल्प आहे, तर दुसऱ्या बाजूस आपल्या देशात दरवर्षी सात अब्ज वृक्षांची तोड केली जात आहे, हे प्रामुख्याने लक्षात घेणे आवश्‍यक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या राज्यात वनविभागाच्या वतीने वृक्ष लागवड प्रकल्प राबविले जातात. पण या प्रकल्पांत प्रामुख्याने निलगिरी, ऑस्ट्रेलियन बाभूळ, मॅंजियम, ग्लिरिसिडीया, सुरू, सुबाभूळ, सिल्वर ओक यांसारख्या विदेशी वृक्षांची एकसुरी लागवड करण्यात आली आहे. शहर परिसरात गुलमोहोर, रेन ट्री, काशिद, पिचकारी, पीतमोहोर, नीलमोहोर, (वि)देशी बदाम यांसारख्या विदेशी वृक्षांचीच संख्या सर्वांत जास्त आहे. आपला देश वनस्पती आणि वृक्ष विविधतेत अतिसंपन्न असताना, मोठ्या प्रमाणात विदेशी वृक्षांचीच लागवड का व कशासाठी, असे प्रश्‍न आता सामान्य जनताही विचारू लागली आहे. विदेशी वृक्षांचे उपद्रवमूल्य आता सर्वांना कळू लागले आहे. स्थानिक परिसंस्थेत देशी व स्थानिक झाडाचे महत्त्व किती आहे, हे हल्ली जनतेला पटू लागले आहे. यामुळेच अलीकडील काही वर्षांत जनतेच्या वृक्ष लागवड विचारसरणीत बदल झालेला आहे. हे शुभ चिन्ह आहे. आपल्या देशात व राज्यात देशी वृक्षांचीच लागवड आवश्‍यक आहे, असा जनमतप्रवाह आता बनू लागला आहे आणि तो अत्यंत योग्य व समर्थक आहे. 

आपल्या देशात सुमारे ५० हजार वनस्पती प्रजाती असून, यापैकी ४० टक्के प्रजाती विदेशी आहेत. विदेशी वनस्पती प्रजातींपैकी ५५ टक्के प्रजाती अमेरिका खंडातील, २० टक्के पूर्व आशिया खंडातील, १५ टक्के युरोप तर १० टक्के प्रजाती आफ्रिका खंडातील आहेत. यापैकी कांही प्रजाती ब्रिटिश राजवटीत इंग्रजांनी वनस्पती उद्याने तयार करताना भारतात आणल्याच्या नोंदी आहेत. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बहुसंख्य विदेशी वनस्पती भारतात आल्या आहेत, हे विशेष! 

आपल्या देशात सुमारे २० हजारांच्या आसपास विदेशी वनस्पती प्रजाती असून, यापैकी बहुतांश प्रजाती तणवर्गीय आहेत. सुमारे २५ टक्के विदेशी वनस्पती प्रजाती अति आक्रमक गुणधर्माच्या आहेत. काही विदेशी वृक्षही अति आक्रमक गुणांचे आहेत. आक्रमक विदेशी तणांमुळे भारतात दरवर्षी शेती उत्पादनात ३० टक्के इतकी घट होते. यावरून विदेशी वनस्पती आपणासाठी किती घातक आहेत, याची कल्पना येऊ शकेल. घाणेरी किंवा टणटणी, केंदाळ किंवा जलपर्णी, काँग्रेस गवत किंवा गाजर गवत, पिवळा धोत्रा या विदेशी तणांचा प्रसार अत्यंत वेगाने झाल्याने ही सर्व भारतभर पसरली आहेत. अलीकडील काळात अल्टननथिरा रानमोडी, मिकानिया ही विदेशी तणे संपूर्ण कोकण व पश्‍चिम घाट परिसरात सर्वत्र पसरलेली आहेत. कॉसमॉस, झिनिया, वेडेलिया, तिथोनिया, विदेशी आघाडा अशा अनेक शोभिवंत विदेशी वनस्पती आज तण म्हणून सर्व भारतभर पसरलेल्या आहेत. ही तणे अत्यंत चिवट असल्याने, आपल्याकडील चराऊ गवताळ कुरणे या तणांनी व्यापली आहेत. यामुळे पाळीव तसेच जंगली जनावरांच्या चराऊ जागा कमी झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

आपल्या देशात वनविभागाकडून मोठ्या प्रमाणात लागवड केले जाणारे निलगिरी, सुरू, सिल्व्हर ओक, ऑस्ट्रेलियन बाभूळ (ऑस्ट्रेलिया), ग्लिरिसिडीया, सुबाभूळ (मध्य अमेरिका), हे सर्व वृक्ष विदेशी आहेत. १९६० ते १९८० या कालावधीत निलगिरी वृक्षांची लागवड भारतात मोठ्या प्रमाणात करण्यात आली. आज अखेर भारतात १२ लाख हेक्‍टर पेक्षाही जास्त भूक्षेत्रावर निलगिरीची लागवड आहे. महाराष्ट्रात सुमारे दोन लाख हेक्‍टर जमिनीवर निलगिरीचे वृक्ष पसरले आहेत. निलगिरी वृक्ष लागवडीचे सर्व तोटे लक्षात आल्यानंतर, कर्नाटक उच्च न्यायालयाने २०१७ मध्ये निलगिरी वृक्ष लागवडीवर संपूर्ण राज्यभर बंदी घातली आहे. अशी बंदी संपूर्ण देशभर येणे आवश्‍यक आहे. ऑस्ट्रेलियन बाभूळ, ग्लिरिसिडीया, सुबाभूळ या विदेशी वृक्षांची लागवड भारतात १९५० ते १९७० पासून सुरू झाली असून, या वृक्षांनी आज आपल्या देशातील लाखो हेक्‍टर जमीन व्यापलेली आहे. सुरू या विदेशी वृक्षांची सर्वांत जास्त लागवड आपल्या देशात असून, सुमारे आठ लाख हेक्‍टर भूक्षेत्रावर सुरू वृक्षांची लागवड दिसून येते. असंख्य विदेशी तणे, बागेतील अनेक शोभिवंत विदेशी वनस्पती आणि वनीकरणासाठी आयात केलेले सर्व विदेशी वृक्ष, या सर्वांचा आपल्या देशात शिरकाव झाल्यानंतर त्याचा प्रसार भारतभर झालेला असून, त्यांच्या आक्रमक गुणांमुळे आपल्या स्थानिक परिसंस्था विस्कळीत झाल्या आहेत. यामध्ये भर म्हणून आपल्या देशांतील बागांमध्ये आणि रस्त्यांच्या कडेने विदेशी वृक्षांचेच आक्रमण झालेले आहे. विदेशी वृक्षांच्या आक्रमतेमुळे आपली देशी वृक्ष संपदा धोक्‍यात आली आहे. विदेशी तणांचे समूळ उच्चाटन करणे आणि देशी वनस्पती व देशी वृक्षांचीच लागवड करणे, ही काळाची गरज आहे. 

डॉ. मधुकर बाचूळकर    ९७३०३९९६६८

(लेखक पर्यावरण व वनस्पती तज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com