agriculture news in marathi agrowon agralekh on GI authorized user registration | Agrowon

‘जीआय’चे अधिकृत ब्रॅंडींग

विजय सुकळकर
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

जीआय मानांकन मिळविण्यात देशात आघाडीवरील आपल्या राज्यात अशा शेतमालाचे ‘अधिकृत वापरकर्ते’ म्हणून प्रमाणपत्र मिळविण्याचा मुद्दा दुर्लक्षित राहिला आहे. 

कोविड महामारीनंतर जागतिक बाजारातही खूप उलटफेर झाले आहेत. देशी-विदेशी ग्राहक खाद्य पदार्थांचा दर्जा आणि सुरक्षितता याबाबत आता अधिकच चोखंदळ झाला आहे. त्यामुळे शेतमालाची गुणवत्ता आणि सुरक्षितता याबाबत उत्पादक, विक्रेते, निर्यातदार अशा सर्वांनीच चौकस राहण्याची ही वेळ आहे. बाजारात विशिष्ट गुणवैशिष्ट्ये अथवा भौगोलिक वेगळेपण लाभलेल्या शेतीमालास नेहमी अधिक मागणी असते. शेतकऱ्यांच्या पीक व्यवस्थापनाबरोबर एखाद्या परिसरातील वैशिष्टपूर्ण माती-पाणी, हवामान यामुळे शेतमालास रंग, वास, चव, आकार आदी गुणवैशिष्ट्यांमध्ये वेगळेपण दिसून येते. अशा दर्जाची खात्री जीआय अर्थात भौगोलिक मानांकनातूनच मिळते.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत २६ उत्पादनांना जीआय मानांकन मिळालेले आहे तर सहा उत्पादने असे मानांकन मिळविण्याच्या प्रक्रियेत आहेत. राज्याला लाभलेल्या जीआय मानांकनात २४ उत्पादने कृषीशी निगडीत आहेत, ही बाब उल्लेखनिय म्हणावी लागेल. जीआय मानांकन मिळविण्यात देशात आघाडीवरील आपल्या राज्यात ‘मान्यताप्राप्त कर्ता’ अथवा ‘अधिकृत वापरकर्ता’ म्हणून प्रमाणपत्र मिळविण्याचा मुद्दा दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे जीआयच्या नावाखाली आपल्या शेतमालाचे देश-विदेशात ‘ब्रॅंडींग’ पिछाडीवर राहिले आहे. याबाबत आता कृषी-फलोत्पादन विभागाने आघाडी घेतली असली तरी त्यास शेतकरी, पणन मंडळासह या प्रक्रियेतील सर्व घटकांचे सहकार्य लाभायला हवे.

जीआय टॅगमुळे वैशिष्ट्यपूर्ण शेतमालाचे संरक्षण होते, देशी-विदेशी बाजारपेठेत त्याच नावाने बनावट माल विक्रीला आळा बसतो. जीआय शेतमाल अधिक दर देऊन ग्राहक खरेदी करतात. असे याचे अनेक फायदे असले तरी प्रत्यक्ष लाभक्षेत्रात मात्र ते दिसून येत नाहीत. त्याचे कारण म्हणजे अधिकृत वापरकर्ता शेतकऱ्यांची राज्यात वानवा आहे. त्यामुळे जीआय शेतमालाचे उत्पादन घेऊन देखील ते याची खात्री ग्राहक अथवा व्यापाऱ्यांना करुन देऊ शकत नाहीत.  एखाद्या शेतमालास जीआय मानांकन मिळाल्यानंतर त्या भागातील उत्पादक संघ अथवा शेतकऱ्यांना हा टॅग वापरायचा असेल तर अधिकृत वापरकर्ता म्हणून स्वतःची नोंद केंद्र सरकारच्या भौगोलिक उपदर्शन नोंदणी विभागाकडे करणे आवश्यक असते. अशी नोंद केल्यानंतरच उत्पादक संघ अथवा शेतकऱ्याला हे प्रमाणपत्र मिळते. असे प्रमाणपत्र मिळाल्यावर उत्पादक आपल्या उत्पादनास जीआय क्वालिटी टॅग लावून अधिक दर पदरात पाडून घेऊ शकतो.

शेतकऱ्यांना केवळ दहा रुपयांमध्ये अधिकृत वापरकर्ता होण्याची सुविधा केंद्रीय कृषी मंत्रालयाने उपलब्ध करुन दिली आहे तर राज्यातील फलोत्पादन विभागाने याबाबतचे अर्ज भरुन घेण्याची मोहीम उघडली आहे. अशावेळी ही माहिती राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोचवून अधिकृत वापरकर्ता होण्यासाठी त्यांना प्रोत्साहीत करायला पाहिजेत. शेतकऱ्यांनी सुद्धा याकरीता पुढाकार घ्यायला हवा. महत्वाचे म्हणजे ह्या नोंदी करुन घेताना, शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देताना विशेष काळजी घ्यायला हवी. काही संस्थांना याबाबत आधी केलेल्या नोंदीमध्ये गडबड होत असल्याचे, चुकीचे अर्ज सादर केले जात असल्याचा अनुभव आला आहे. तसे या मोहिमेत होणार नाही, हे पाहावे लागेल. जीआय अधिकृत वापरकर्ता म्हणून प्रमाणपत्र देताना सातबारा उतारा, त्यावर संबंधित शेतमालाची नोंद, आधारकार्ड, प्रतिज्ञापत्र, नमुना अर्ज आदी कागदपत्रांची पुर्तता तर आवश्यकच आहे. परंतू त्याचबरोबर संबंधित पिकाखालील क्षेत्र, त्यातून मिळणारे एकूण उत्पादन याच्याही स्पष्ट नोंदी असायला हव्यात. असे झाले तरच शेतकरी आणि ग्राहक या दोघांचीही फसवणूक टळेल.


इतर संपादकीय
‘सूक्ष्म उद्योग’ घडवतील मोठा बदल पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन...
मूळ दुखण्यावर इलाज कधी?सरकार कितीही सांगत असले की आम्ही शेतकऱ्यांना...
हमीभाव ः वादीवाल्यांचा सापळालातूरला पुर्वी वादीवाले लुटारु टोळके असायचे. ते...
संवादातून मिटेल संघर्षकृषी व पणन सुधारणांबाबतच्या तीन नव्या...
खासगीकरणाचा वारू किती उधळणार?सरकारने उद्योगधंद्यात सामील असता कामा नये, अशी...
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मकखरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या...
भार व्यवस्थापनाचे बळीजालना जिल्ह्यातील पळसखेडा पिंपळे येथील तिघे...
सहकारी अंकेक्षण कालबाह्य ठरतेय काय? ‘हिशेबांच्या पुस्तकाचे बुद्धिकौशल्याने सखोल...
ऊस उत्पादकांनो, समजून घ्या ‘एफआरपी‘चे...राज्यातील साखर उद्योगातील सर्व घटक ‘एफआरपी‘भोवती...
देर आए दुरुस्त आएजीआय (जिओग्राफिकल इंडिकेशन) अर्थात ‘भौगोलिक...
शाश्‍वत सेंद्रिय शेतीविश्‍वजगभरातील १८६ देशांतून एकूण ७१.५ दशलक्ष हेक्टर...
‘विजे’खालचा अंधारकृषिदराने वीजपुरवठ्याची मागणी करणाऱ्या जालना...
विजेखालचा अंधारषिदराने वीजपुरवठ्याची मागणी करणाऱ्या जालना...
मेळघाटातील आदिवासी बांधवांची दिवाळीनुकताच १४ नोव्हेंबर २०२० रोजी लक्ष्मीपूजन या...
शेतीला आधार हवा सर्वंकष विम्याचाराज्यातील अनेक भागांत परतीच्या तुफान...
‘दान समृद्धीचे पडो कष्टाच्या पदरी’दिवाळी सणास सुरुवात होऊन दोन दिवस झाले आहेत. अजून...
आरआरसी’ म्हणजे काय रे भाऊ...?राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर...
रब्बी पीकविमादेखील असतो ना भाऊ!रब्बी हंगामासाठी पीककर्ज असते, हे जसे राज्यातील...
शास्त्रशुद्ध अभ्यासातून वाढवूया देशी...देशी गाईंमध्ये दुष्काळी आणि टंचाईच्या काळात तग...
शेतकरी हित सर्वप्रथमराज्यात मागील दोन दशकांपासून कापसाचे संकरित बीटी...