गोशाळा की निकृष्ट पशुधनाची कोठारे

गोशाळा राज्यातील गोवंश संवर्धन केंद्र ठराव्यात, अशी अपेक्षा अॅग्रोवनमधूनवेळोवेळी व्यक्त करण्यात आली आहे. मात्र अनेक पशुवंश आणि आरोग्यदृष्ट्या निकृष्ट पशुधनाची कोठारेच दिवसेंदिवस वाढत आहेत.
संपादकीय.
संपादकीय.

शेतीच्या विकासात उत्पन्न वाढविण्याबरोबर शेतीचा पोत सुधारणे गरजेचे असल्यामुळे पशुपालन आणि शेती हे परस्परपूरक व्यवसाय आहेत. राज्यात पशुपालनातील गोवंश अधिक प्राधान्याने सांभाळला जातो. नको असलेला गोवंश गोशाळांकडे वर्ग करून अनेकदा सुटका करून घेण्यात येते. मात्र, गोवंश विकासाचा मुद्दा फारसा गंभीरपणे घेतला जात नाही. यात गोसंवर्धन, गोवंश विकास, गुणप्रत वाढ यांचा दृष्टिकोन वगळल्यामुळे उपयुक्तता संपलेल्या गोसंख्येचा भार दिवसेंदिवस गोशाळेत वाढत आहे. राज्यात हजाराकडे जाणाऱ्या गोशाळांच्या संख्यांची गंभीरपणे दखल घेणे गरजेचे आहे. गोशाळेतील अर्धपोटी, विकलांग आणि रोगयुक्त जनावरे दिवसेंदिवस मोठ्या संकटाची नांदी ठरत आहेत. यात क्षय आणि ब्रुसेलोसीस या दोन रोगांचा प्रसार वाढतो आहे. या दृष्टीने गोशाळा वैज्ञानिकदृष्ट्या योग्य प्रकारे कार्यरत राहणे आणि त्यांना पशुवैद्यकीय तांत्रिक पाठबळ मिळणे अपेक्षित आहे. याच उद्देशाने नागपूरच्या पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठातर्फे (माफसू) विज्ञान सुलभ गोशाळा व्यवस्थापन याबाबतची कार्यशाळा महत्त्वाची ठरते. राज्यात पशुसंवर्धन विभागाचे गोशाळा कार्यक्षेत्राबाबत नियंत्रण अपुरे असून, सगळ्याच गोशाळा केवळ शासकीय अनुदानासाठी पशुसंवर्धन खात्याशी जोडल्या आहेत. गोशाळांकडे स्वतःच्या गरजेइतके चारा क्षेत्र नाही, चारा उत्पादन होत नाही आणि गोवंश पोषणही पूर्ण होत नाही. गोशाळा राज्यातील गोवंश संवर्धन केंद्र ठराव्यात, अशी अपेक्षा अॅग्रोवनमधून वेळोवेळी व्यक्त करण्यात आली आहे. मात्र अनेक पशुवंश आणि आरोग्यदृष्ट्या निकृष्ट पशुधनाची कोठारेच दिवसेंदिवस वाढत आहेत. राज्य शासनाने गोशाळांना दिलेला निधी कितपत पोचला आणि काय सुधारणा झाल्या याचा अजून तरी आढावा घेतलेला नाही. मात्र पुढच्या काळात भारतीय गोवंशाबाबत आंतरराष्ट्रीय संस्था उभारणी आणि त्याद्वारे भारतीय गोवंशाच्या गुणांबाबत पडताळणीसाठी लागणारा निधी पुरविण्याचा मानस राज्य शासनाच्या अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. विदर्भात चंद्रपूरचा भाकड गाई संशोधन प्रकल्प आणि गडचिरोलीमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय गोवंश संशोधन आणि संवर्धन प्रकल्प यातून भारतीय गाय संवर्धित होऊ शकेल, अशी अपेक्षा आहे.

राज्यातील गोसंवर्धनाबाबतचा गोशाळेतील वस्तुस्थितिजन्य अहवाल सादर झाल्यामुळे त्यातील तांत्रिक शिफारशी गंभीरपणे पडताळणे गरजेचे आहे. गाय विज्ञानापासून दूर असल्याचेच त्यात दिसून येत असल्यामुळे गोशाळेतील भौतिक सुधारणा आणि नियोजनाबाबत विचार होण्याची गरज आहे. चारा लागवड करणे याकडे गोशाळांचे लक्ष वाढविण्यासाठी आणि पशुसंवर्धनाच्या सेवा गोशाळेत विस्तारीत करण्यासाठी अजून मोठी मेहनत घ्यावी लागेल. राज्यातील गोशाळांबाबत एकूणच पुन्हा विचार करण्याची गरज समोर आल्यामुळे पशुसंवर्धन मंत्र्यांकडून याबाबत पुढाकार अपेक्षित आहे.

राज्यातील गोवंशाकडे तर्कशास्त्र दृष्टीने विचार करणारा वर्ग गोमूत्र आणि शेणाच्या औषधीबाबत नेहमी साशंक आहे. शेतकऱ्यांच्या दारातील गाय दुधाशिवाय आणि नियमित वेत मिळाल्याशिवाय गोमूत्र आणि शेणावर कितपत आर्थिकदृष्ट्या परवडू शकते, याचे स्पष्टीकरण व्हायला पाहिजे. मात्र त्यासाठी राज्य शासनाकडे किंवा विद्यापीठाकडे योग्य उत्तर आहे का? हा खरा लाख मोलाचा प्रश्न आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com