संशयाचे मळभ व्हावे दूर

रशियाने तक्रारीत नोंद केलेल्या किडी देशात आढळून येत नाहीत, तर निर्यातीच्या द्राक्षात त्या कशा आढळून आल्या, प्रादुर्भाव नेमका झाला कुठे, हे उत्पादकांसह निर्यातदारांना कळायला हवे.
agrowon editorial
agrowon editorial

मागच्या हंगामातील पॅकहाऊसमधील द्राक्ष नाशिकहून रशियाला  निर्यात केली असता तेथील प्लॉंट क्वारंटाईन विभागाने त्यातील ४१ कंटेनरमध्ये किडी आढळून आल्याचे सांगितले. ही माहिती भारतीय प्लॉंट क्वारंटाईन विभागाला कळताच त्यांनी द्राक्षे निर्यात करणाऱ्या १४ निर्यातदारांचे (फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट) परवाने निलंबित केले. निर्यातीमधून कोणत्याही नवीन कीड-रोगांचा, मनुष्यामध्ये घातक आजारांची लागण होऊ नये म्हणून सर्वच देश आता सजग झाले आहेत. ते गरजेचे पण आहे. परंतू रशियाला द्राक्ष निर्यात करताना त्याच पॅकहाऊसमधील द्राक्ष युरोप, युके, कॅनडा आदी देशांनाही पाठविण्यात आले. रशियाशिवाय इतर देशांना मात्र संबंधित द्राक्षाबाबत काहीही अडचण आलेली नाही. रशियाच्या प्लॉंट क्वारंटाईन विभागाने ज्या किडींचा तक्रारीत उल्लेख केला त्या किडी राज्यातील द्राक्ष पिकांवर आत्तापर्यंत कधीही आढळून आलेल्या नाहीत, असे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्थेने स्पष्ट केले आहे. रशियाच्या तक्रारीचे प्रकरण गुंतागुंतीचे वाटत असताना केंद्रीय प्लॉंट क्वारंटाईन विभागाने राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्था तसेच संबंधित निर्यातदार यांच्याकडून माहिती घेऊन तपासणीअंती निर्णय घेणे अपेक्षित होते. तसेही झाले नाही. शेतमालाच्या निर्यातीमध्ये कधी उत्पादक शेतकऱ्यांना तर कधी निर्यातदारांना चांगला दर मिळू नये म्हणून बाहेरचे व्यापारी, आयातदार अनेक क्लृप्त्या लढवत असतात. या सर्व बाबींचा विचार करुन रशियात नेमके काय घडले, याचा सोक्षमोक्ष लागायलाच हवा.

भारतीय द्राक्षांबाबत रशियाने केलेल्या तक्रारीची गंभीर दखल निर्यातीमधील सर्वच घटकांनी घ्यायला हवी. तक्रारीत नोंद केलेल्या किडी महाराष्ट्रात, भारतात आढळून येत नाहीत, तर निर्यातीच्या द्राक्षात त्या कशा आढळून आल्या, हे उत्पादकांसह निर्यातदारांना कळायला हवे. महत्वाचे म्हणजे रशियाच्या तक्रारीवर अपेडा, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्था, निर्यातदार यांचे म्हणणे काय आहे, हेही जाणून घ्यावे लागेल. अर्थात हा सर्व संशय सखोल तपासणीअंतीच दूर होणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने यातील जाणकारांची एक त्रयस्थ समिती नेमायला हवी. आज रशियाने आपल्या द्राक्षात नवीनच किडी आढळल्याची तक्रार केली, उद्या इतर देश अशीच काहीतरी तक्रार करून आपले द्राक्ष ‘रिजेक्ट’ करु शकतात. त्यामुळे द्राक्षासह इतरही शेतमाल निर्यातीसाठी हे घातक ठरु शकते, हे लक्षात घ्यायला हवे.

राज्यातील द्राक्ष उत्पादक प्रतिकूल परिस्थितीत निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात सातत्य ठेऊन आहेत. मागील दशकभरापासून कधी दुष्काळ, कधी अतिथंडी, कधी गारपीट तर कधी अतिवृष्टी-वादळी पाऊस अशा नैसर्गिक आपत्तींनी द्राक्ष उत्पादकांना हैरान करुन सोडले आहे. अशा परिस्थितीमध्ये योग्य नियोजन आणि व्यवसाथापनातून येथील शेतकरी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करतो. भारतीय द्राक्षांना युरोप, युके, चीन, रशिया, कॅनडा या देशांसह जगभरातूनच मागणी वाढत आहे. देशातील निर्यातदार सुद्धा निर्यातीबाबतचे संपूर्ण नियम, निकष यांचे काटेकोर पालन करतो. अशावेळी द्राक्ष उत्पादक असो की निर्यातदार त्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये. रशियाबाबत बोलायचे झाले तर तो त्यांच्या प्रत्येक आयातदार देशांबाबत असेच वागत आला आहे. दशकभरापूर्वी आपल्या येथील तीळामध्ये कीड सापडली म्हणून रशियाने संपूर्ण शेतमाल आयात खांबविली होती. रशियाने युरोपियन शेतमालावर सुद्धा यापूर्वी अनेक वेळा बंदी घातली आहे. अशा देशांसोबत शेतमाल आयात-निर्यातीत येथून पुढे सर्वांनीच काळजी घेतलेली बरी!  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com