भूगर्भ तहानलेलाच!

पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण हे त्या त्या भागातील भूस्तर कशा प्रकारचा आहे, भूजल स्तराची रचना कशी आहे, मुख्य म्हणजे भूजल उपसा कसा आहे, यांवर अवलंबून असते.
agrowon editorial
agrowon editorial

रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत अतिवृष्टी, अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही होतेय. मात्र, त्याच वेळी राज्याच्या अनेक भागांत चांगला पाऊस होऊनही भूगर्भातील पाणीपातळीत फारशी वाढ झालेली नाही. गंभीर बाब म्हणजे चार हजारांहून अधिक गावांत पाण्यावाचून भूगर्भ तहानलेला असून, या गावांत पुढील काळात पाणीटंचाई उग्र रूप धारण करू शकते, अशी परिस्थिती आहे. भूजलपातळीतील घटीमध्ये प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील गावे आहेत. या भागात उर्वरित राज्याच्या तुलनेत पाऊसमान कमी तर आहेच; परंतु मागील उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या उपशाने भूगर्भपातळी वाढली नसल्याचे पुढे आले आहे. 

आपल्याकडे पाऊसमान जास्त, तर भूगर्भात पाणी मुरण्याचे प्रमाणही जास्त, असा एक सर्वसामान्य समज झालेला आहे. परंतु, पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण हे त्या त्या भागातील भूस्तर कशा प्रकारचा आहे, भूजल स्तराची रचना कशी आहे, मुख्य म्हणजे भूजल उपसा कसा आहे, यांवर अवलंबून असते. पावसाच्या पाण्यापैकी केवळ १० ते १५ टक्क्यांपर्यंतच पाणी जमिनीत मुरते. बेसॉल्टने आच्छादित भूप्रदेश, तसेच भूपृष्ठावरील काळ्या मातीमुळेसुद्धा पाणी मुरण्यास भूशास्त्रीय परिस्थिती बऱ्याच भागात अनुकूल नाही. असे असतानासुद्धा सगळीकडे सरधोपट पाणी अडविणे, जिरविण्याचे एकच उपाय अवलंबिले जातात. त्यातून आजपर्यंत तरी फारसे काही साध्य झाले नाही.

दुर्दैवाची बाब म्हणजे मागील अनेक दशकांच्या अनुभवातून आपल्या शासन-प्रशासनाच्या लक्षात ही बाब आलेली नाही. राज्यात पाणलोट क्षेत्रनिहाय भूस्तर, भूजल स्तर रचनांचा अभ्यास करून पाणी मुरविण्याचे शास्त्रशुद्ध उपाय योजावे लागतील. त्याशिवाय भूगर्भपातळीत अपेक्षित वाढ होणार नाही. यासोबतच विहीर, कूपनलिका पुनर्भरणाच्या पद्धतींविषयी शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती निर्माण करावी लागेल.  

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भूगर्भाच्या अतिउपशाने भूजल स्तर कोरडे पडत जातात. उपसा करीत जसजसे आपण खाली जाऊ, तशी भूजल स्तराची साठवणशक्ती कमी होत जाते. अशा अतिउपशाच्या भागात कालांतराने पुनर्भरणही कमी होते. विशेष म्हणजे मागील अडीच-तीन दशकांपासून राज्यात भूजलाचा अतिउपसा पद्धतशीरपणे सुरू आहे. राज्यात विहिरींची संख्या वाढली. कूपनलिकांनी तर भूगर्भाची चाळणच केली आहे. एक हजार फूट खोलपर्यंत कूपनलिका घेऊन तेथून पाणीउपसा चालू आहे. यामुळेसुद्धा भूजल स्तराची रचना आणि पाणी साठवण क्षमतेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. अशा वेळी एका वर्षीच्या चांगल्या पावसाने भूजल स्तर पूर्वपदावर येणार नाही. 

भूजलाचा उपसा हा प्रामुख्याने पीकपद्धतीवरही अवलंबून आहे. पाण्याची उपलब्धता असेल तर शेतकरी लगेच ऊस, केळी किंवा भाजीपाला अशा अधिक पाणी लागणाऱ्या पिकांकडे वळतात. त्यात गैरही काही नाही. परंतु, अधिक पाणी लागणारी पिके जेव्हा घेतली जातात तेव्हा त्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब आवर्जून व्हायलाच हवा. देशात, राज्यात मागील पाच दशकांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी अशी तृणधान्ये, तर काही पारंपरिक कडधान्ये आणि तेलबिया पिकांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

सुदैवाने तृणधान्यात आपली अन्नसुरक्षा अजूनही कायम आहे. परंतु, डाळी आणि खाद्यतेल आपल्याला दरवर्षी आयात करावे लागत आहे. तेलबिया आणि कडधान्ये ही पिके कमी कालावधीची, तसेच कमी पाण्यावर येणारी आहेत. डाळी आणि तेलबियांना खरेदीची हमी आणि किफायतशीर हमीभाव मिळाला, तर शेतकरी ही पिके घेऊ लागतील. शेवटी शेतकऱ्यांचा कल त्यांना ज्या पिकांत अधिक फायदा त्या पिकांकडे असतो. अशा वेळी डाळी आणि तेलबिया ही पिके शेतकऱ्यांना किफायतशीर ठरतील, अशी ध्येयधोरणे शासनाने राबवायला हवीत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com