मनोविकाराचा विळखा

मानसिक विकाराबाबतचे सर्व गैरसमज आणि अंधश्रद्धा लोकशिक्षणातून दूर करण्याची मोहीमच हाती घ्यावी लागेल. कोणत्याही शारीरिक विकाराप्रमाणे मानसिक विकाराचे निदान व उपचार जितक्या लवकर होतील, तेवढे चांगले, हे लोकांना पटवून द्यावे लागेल.
agrowon editorial
agrowon editorial

प्रत्येक सात भारतीयांमध्ये एका व्यक्तीस मानसिक विकार जडला असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. देशात २०११ च्या दरम्यान १० टक्के लोक मानसिक आजाराने त्रस्त होते, हे प्रमाण २०१७ मध्ये १४ टक्क्यांवर पोचले आहे. मागील दोन वर्षांत हा टक्का निश्चितच वाढला असेल, यात शंका नाही. एकंदरीतच लोकल ते गोबल (स्थानिक पातळी ते जागतिक स्तरावर) बदललेली जीवनशैली मानसिक आजार वाढीस कारणीभूत आहे. मानसिक विकार २०० हून अधिक प्रकारचे असले तरी नैराश्य, अतिचिंता, स्किझोफ्रेनिया आणि आत्ममग्नता हे विकार प्रामुख्याने पाहावयास मिळतात. भारतातील वयोवृद्धांमध्ये वाढत्या शारीरिक, मानसिक, आर्थिक ताणतणावातून अतिचिंता, नैराश्य असे मनोविकार वाढत आहेत. परंतू लहान मुले, तरुणांमध्येसुद्धा मोबाईल, इंटरनेटच्या अतिवापरातून मानसिक आजार वाढत आहेत, ही अधिक चिंताजनक बाब म्हणावी लागेल. मुलांमधील मोबाईल-इंटरनेट अॅडिक्शन मानसोपचार तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात असताना यावर गांभीर्याने विचार होणे गरजेचे वाटते.

शारीरिक विकाराप्रमाणेच मानसिक विकारानेदेखील व्यक्ती शक्तीहीन आणि कोणतेही उपयुक्त कार्य करण्यास असमर्थ बनतो. मानसिक विकारांचे आजारनिहाय आणि व्यक्तीपरत्वे परिणाम भिन्न असतात. तथापि सर्व मानसिक विकारांमुळे रुग्णांच्या विचारात, भावनांत किंवा वागण्यात फरक पडतो. काहींची शारीरिक प्रकृती बिघडते, अनेकांचे परिस्थितीबाबतचे विचार वास्तव नसतात. इतरांच्या भावना प्रसंगाला अनुरुप नसतात किंवा अतिरेकी होतात. मानसिक विकारात लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलदेखील उचलले जाऊ शकते. अलीकडे लहान मुले, विद्यार्थी तसेच तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. दुर्दैवी बाब म्हणजे मनोविकार हा आजार असू शकतो अन् त्यावर शास्त्रीय उपचार केले जाऊ शकतात, हा समजच भारतीयांमध्ये (खासकरून खेड्यापाड्यात) अजूनही रूढ झालेला नाही. मनोरुग्णाच्या वागण्यात बदल झाला की त्यास वेड्यात काढले जाते. काही जण तर यास देवाचा कोप, करणी, भुताटकी अशा अंधश्रद्धा समजून अंगारे, धुपारे, तथाकथित साधू, बाबा यांच्या दृष्टचक्रात अडकतात. त्यातून मनोरुग्ण बरा तर होतच नाही, उलट कुटुंबाचेच आर्थिक शोषण होते. 

मानसिक विकाराबाबत समाजात व्यापक प्रबोधनाची गरज आहे. मानसिक विकाराबाबतचे सर्व गैरसमज आणि अंधश्रद्धा लोकशिक्षणातून दूर करण्याची मोहीमच हाती घ्यावी लागेल. कोणत्याही शारीरिक विकाराप्रमाणे मानसिक विकाराचे निदान व उपचार जितक्या लवकर होईल, तेवढे चांगले, हे लोकांना पटवून द्यावे लागेल. सौम्य मानसिक आजार तर नियमित औषधोपचार आणि समुपदेशन यांनी पूर्णपणे आटोक्यात येऊ शकतात, काही रुग्णांमध्ये तर औषधं पूर्ण बंदही होऊ शकतात. तीव्र मानसिक आजारातही रुग्ण शास्त्रशुद्ध उपचाराने चांगले आयुष्य जगू शकतो. आता खेडोपाडीसुद्धा मनोरुग्णांची संख्या वाढत असताना याबाबतच्या उपचाराच्या सेवासुविधा ग्रामीण रुग्णालयात वाढवायला पाहिजेत. लहान मुलांमध्ये वाढत असलेले मानसिक आजार घालविण्यासाठी कुटुंबातील थोर व्यक्तींनी त्यांना प्रथम समजून घेणे गरजेचे आहे. त्यानंतर त्यांच्या मोबाईल व इंटरनेटच्या वापरावर हळूहळू मर्यादा आणायला पाहिजेत. सोशल मीडियासह ब्लू व्हेल, कटिंग चॅलेंज, पब-जी यांसारख्या गेम्सचा वापर तर पूर्णपणे बंदच व्हायला पाहिजे. विविध प्रकारच्या मैदानी खेळाची रुची मुलांमध्ये निर्माण करावी लागेल. अशा प्रकारचे उपचार आणि खबरदारीतून मनोरुग्ण आणि त्यांचे कुटुंबीयपण सर्वसामान्य जीवन जगू शकतात, हे लक्षात घ्यायला हवे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com