जल‘प्रलय’

निसर्गापुढे कुणाचे काही चालत नाही, हे सत्य असले तरी वेळीच सावध होऊन योग्य त्या सर्व खबरदाऱ्या घेतल्या तर होणारी हानी थोडीफार कमी नक्कीच करता येते.
agrowon editorial
agrowon editorial

शेती हा पूर्वीपासूनच जोखीमयुक्त व्यवसाय आहे. परंतु हवामान बदलाच्या   काळात शेती क्षेत्रातील जोखीम फारच वाढली आहे. नैसर्गिक आपत्ती वाढल्या, त्यांची तीव्रता वाढली. पाऊसमान असो की तापमान याचे नवनवे उच्चांक स्थापित होत आहेत. मागचे वर्ष हे सर्वाधिक वादळांचे ठरले. त्यामुळे मागच्या वर्षी वर्षभर पाऊस पडत राहिला. यांत खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाच्या सुरुवातीच्या अंदाजाने बळिराजा सुखावला. मॉन्सूनने वेळेवर हजेरी लावून अंदाजाला साजेसे वर्तन सुद्धा दाखविले. परंतु हा पाऊस सर्वदूर नव्हता. सुरुवातीच्या हजेरीनंतर राज्यातून २० ते २५ दिवस पाऊस गायब झाला. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या. काही भागांत शेतकऱ्यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी राज्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली. हा पाऊस सर्वदूर आहे. दोन दिवसांपासून कोकणसह राज्यभर कोसळधार सुरू आहे. कोल्हापूर, महाबळेश्‍वर या भागांत विक्रमी पावसाच्या नोंदी झाल्या आहेत. या पावसामुळे अनेक गावशहरांत पाणी शिरले. घर-गोठे पडले, गुरे-ढोरे वाहून गेले. दरडी कोसळल्या, पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक जण बेपत्ता असल्याच्याही बातम्याही येत आहेत. बहुतांश धरणांची पाणीपातळी वाढली. त्यातून विसर्ग सुरू आहे. नदी-नाल्याकाठची पिके वाहून गेली, जमीन खरडली. अतिवृष्टी झालेल्या भागातील पिके पाण्यात बुडाली. हे सर्व झालेले नुकसान खूप मोठे आहे. अजून तीन दिवस राज्यभर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे नुकसानीत वाढच होणार आहे. 

खरे तर अतिवृष्टी, मुसळधार पावसाचा अंदाज असताना सुद्धा शासन-प्रशासन थोडे गाफील राहिले. निसर्गापुढे कुणाचे काही चालत नाही, हे सत्य असले तरी वेळीच सावध होऊन योग्य त्या खबरदाऱ्या घेतल्या तर आपत्तीचा एवढा फटका बसला नसता. नदी-नाल्याकाठची गावे, धरणातून विसर्ग करताना त्या खालील गावांना आधीच सतर्क करून सुरक्षित ठिकाणी हालविले असते तर जीवित-वित्तहानी नक्कीच थोडी कमी झाली असती. अजूनही तीन दिवस अतिपावसाचे असल्याने मदत-बचाव कार्याची गती आणि व्याप्ती वाढवावी लागेल. तसेच पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर घर-गोठ्यांची झालेली पडझड, जनावरे, शेती पिकांचे झालेले नुकसान यांची पाहणी पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळायला हवी. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आधीच अत्यंत बिकट असताना या मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, ही काळजी घ्यायला हवी. अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे. अशा शेतकऱ्यांना नुकसानीचे फोटो तुम्हीच पाठवा, जिल्हा प्रशासन अथवा विमा कंपनीला नुकसानीबाबत तुम्हीच कळवा, असे परस्पर सांगू नये. विमा कंपनी प्रतिनिधी तसेच शासकीय गावपातळीवरील कर्मचाऱ्यांनी नुकसानीची पाहणी करून त्यांना भरपाई मिळवून द्यावी. 

सध्याच्या वाढत्या नैसर्गिक आपत्ती हे काही अचानक कोसळलेले संकट नाही. २०१२ ते २०१४ हे तीन वर्षे तीव्र दुष्काळाची होती. २०१५ ते २०१८ ही चार वर्षे कमी पाऊसमान आणि टंचाईची होती. २०१९ पासून ते २०२१ आतापर्यंत हे तीन वर्षे अतिवृष्टी महापुराने गाजत आहेत. परंतु दुष्काळ असो की महापूर ते संकट आल्यावर चार-दोन दिवस त्याची चर्चा होते. परंतु हे संकट तात्पुरते टळले की त्याचा सर्वांना विसर पडतो. खरे तर अशा सर्व प्रकारच्या नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी अल्प आणि दीर्घकालीन उपाय, प्रतिबंधात्मक उपाय यांवर आधारित कृती आराखडे निर्माण करावे लागतील. नैसर्गिक आपत्तीत त्यावर अंमलबजावणी होईल, हे पाहावे लागेल. असे केले तरच भविष्यात अशा संकटांचा सामना आपण करू शकू, हे लक्षात घेतले पाहिजे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com