आता भीती ओल्या दुष्काळाची

राज्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने दाणादाण उडविली आहे. त्यातच हा पाऊस अजून तीन-चार दिवस असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष ओल्या दुष्काळाचे असेल, अशी भीती काही शेतकरी व्यक्त करीत आहेत.
संपादकीय.
संपादकीय.

ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत पूर व अतिवृष्टीने चार लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा बसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले होते. अर्थात या सरकारी आकड्यापेक्षा प्रत्यक्ष पूर व अतिवृष्टीबाधित क्षेत्र जास्त होते, हे वेगळे सांगणे न लगे. खरे तर ऑगस्ट शेवटी येणाऱ्या पोळ्यानंतर राज्यात पाऊस कमी होतो. सप्टेंबरमध्येही पाऊस पडतो परंतु तो तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असतो. यालाच परतीचा पाऊसही म्हणतात. यावर्षी मात्र सप्टेंबरच्या सुरवातीपासून राज्यात सुरू झालेला जोरदार पाऊस थांबायचे नावच घेत नाही. उलट मागील चार दिवसांपासून धुंवाधार वृष्टी सुरू आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र अशा पाचवी विभागातील नद्यांना पूर आलेले आहेत. बहुतांश भागातील धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने त्यातून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे देखील पुराचा धोका वाढला आहे. नदी-नाल्याला आलेल्या पुराने अनेक ठिकाणी जमिनीसह पिकेही खरडून गेली आहेत. सखल भागातील जमिनीत पाणी साठून तेथील पिकेही वाया गेली आहेत. या दोन्ही परिस्थितीमध्ये पिकांचे नुकसान १०० टक्के आहे. 

शेतातील उभी पिकेही सततच्या पावसाने संकटात आहेत. मूग, उडीद या लवकर येणाऱ्या पिकांची अनेक ठिकाणी सततच्या पावसाने काढणीच करू दिली नाही. तर काढणी केलेले मूग, उडीद पांढरे पडले असून त्यांना बाजारात अत्यंत कमी भाव मिळतोय. वेचणीला आलेला पूर्वहंगामी कापूस भिजून खराब होत आहे. कापसाची बोंडे सडत आहेत. काढणीला आलेल्या सोयाबीनच्या शेंगा झाडालाच कोंब धरत आहेत. अधिक ओलाव्याने शेंगा कमी भरण्याची शक्यता आहे. विदर्भात संत्रा फळगळही वाढली आहे. नाशिक भागात लवकर छाटणी केलेल्या द्राक्ष बागेतील घडावर कूज, डावणी रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. सततच्या पावसाने नियमित द्राक्ष हंगामही लांबेल. दक्षिण महाराष्ट्रात ऑगस्टमधील महापुरानेच दाणादाण उडवून दिली होती. आत्ताचा पाऊस या भागातही चांगलाच बरसत असल्याने तेथील ऊस, भात आणि भाजीपाला पिकांना पुराचा दुसऱ्यांदा मोठा तडाखा बसला आहे. सध्याचा पाऊस मराठवाड्यास मध्य महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यातही पडत आहे. त्यामुळे त्यांना हा पाऊस दिलासादायक ठरला असला तरी आता मात्र उघडीप पाहिजे, अशा या भागातील शेतकऱ्यांना पण वाटत आहे. गंभीर बाब म्हणजे अजून तीन-चार दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहून बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष ओल्या दुष्काळाचे ठरेल, अशी भीती काही शेतकरी व्यक्त करीत आहेत.

सध्याचा पाऊस हा प्रामुख्याने सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी पडत आहे. सप्टेंबर शेवटी होत असलेली अशाप्रकारची अतिवृष्टी जागतिक हवामान बदलाबरोबरच स्थानिक वातावरणातील बदलाचा परिणाम असल्याचे हवामानतज्ज्ञ सांगत आहेत. सप्टेंबर महिना संपत आला तरी परतीच्या पावसास अजूनही पोषक हवामान नाही त्यामुळे मॉन्सूनचा मुक्काम देशात लांबेल, असे मतही हवामान विभागाने नुकतेच व्यक्त केले होते. सध्याचे चक्रीवादळ, कमी दाबाचा पट्टा हे निवळल्यानंतर परतीचा पाऊसही बरसला तर खरिपातील पिकांचे नुकसान अजून वाढू शकते. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन पूर, अतिवृष्टीने राज्यात झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळायला हवी. मागील पूर परिस्थितीत सुरू करण्यात आलेली पाहणी आचारसंहितेमुळे बऱ्याच ठिकाणी थांबलेली आहे. खरे तर नैसर्गिक आपत्तींमध्ये शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळणे अपेक्षित असते. अशावेळी आचारसंहितेमध्ये सुद्धा प्रशासन पातळीवर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना शक्य तेवढ्या लवकर कशी मदत मिळेल, हे पाहायला हवे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com