agriculture news in marathi agrowon agralekh on honey production and export | Agrowon

मधाचा गोडवा

विजय सुकळकर
शनिवार, 21 मार्च 2020

हर्बल हनी, हनी मिल्क, हनी वाइन, हनी क्यूब अशा नवनवीन मूल्यवर्धित उत्पादनांना जगभरातून मागणी वाढतेय.
 

गे ल्या पाच वर्षांत देशात मधाच्या उत्पादनात ५८ टक्के, तर निर्यातीत ११६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. भारतात उत्पादित होणाऱ्या मधाला देशांतर्गत तसेच विदेशी बाजारपेठांमधून मोठी मागणी आहे. आपले मधाचे उत्पादन जेवढे वाढेल, तेवढा तो बाहेर देशांत पाठविण्यास आपल्याला वाव आहे. मध औषध म्हणून घेण्यापेक्षा पौष्टिक अन्न म्हणून जास्त उपयोगी आहे. अनेक देश दैनंदिन आहारात मधाचा अन्न म्हणून मोठ्या प्रमाणात वापर करतात. आपल्या देशात मात्र अजूनही एक औषध म्हणूनच मधाला घरात स्थान आहे. त्याचमुळे भारतात इतर अनेक देशांच्या तुलनेत प्रतिव्यक्ती सरासरी मध सेवन करण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. मधामुळे शारीरिक रोगप्रतिकारशक्ती वाढते. अन्न शोषन व पचन करण्याची क्षमताही वाढते. नवजात बालकांच्या चांगल्या वाढीसाठी मध उपयुक्त ठरतो. तसेच वयोवृद्धांसाठी मध शक्तिवर्धक असतो. सर्दी, खोकल्यावर मध गुणकारी आहे. त्वचा, डोळे, तोंड, घसा, पोटाच्या अनेक विकारांवर मध उपयुक्त आहे. अनेक औषधांमध्ये मधाचा उपयोग होतो. बहुतांश आयुर्वेदिक औषधे तर मधासोबतच घेण्याचा सल्ला दिला जातो. अशा प्रकारच्या उपयुक्त मधाचे देशात दैनंदिन सेवन वाढायला हवे. याबाबत जागरूकताही निर्माण करावी लागेल.

मधमाश्या मानवाला मध देतात. फुलांमधून मकरंद (मध) गोळा करण्याची कला निसर्गाने फक्त मधमाश्यांना दिली आहे. मधमाश्यांचे नैसर्गिक कार्य परागीभवन होय. जगभरात घेतल्या जाणाऱ्या अनेक पिकांपैकी ७५ ते ८० टक्के पिके परागीभवनासाठी परागसिंचक कीटकांवर अवलंबून असतात. आणि या परागीभवन प्रक्रियेत मधमाश्यांचे ७० ते ८० टक्के योगदान असते. त्यामुळे मधाच्या उत्पादनाबरोबर शेतकऱ्यांच्या विविध पिकांच्या उत्पादनवाढीसाठी मधमाश्या हातभार लावतात. यासह परागकण, मेण, रॉयल जेली, प्रॉपॉलिस आणि बी व्हेनम यांचेही उत्पादन मधमाश्यांपासून मिळते. असे असताना देशात अजूनही मधमाश्या पालन या व्यवसायाकडे गंभीरतेने पाहिले जात नाही. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरणाच्या नादात नैसर्गिक जीवसृष्टीवर आपण कुऱ्हाड चालवून नष्ट करीत आहोत. पिकावर रासायनिक कीडनाशकांच्या अनियंत्रित फवारण्या करून मधमाश्यांच्या संख्येत आपण घट करीत आहोत. जंगल परिसरातील आदिवाशी बांधवांकडून पारंपरिक पद्धतीने मध संकलन केले जाते. परंतु जंगलेच नष्ट होत असल्याने आदिवासी बांधवांच्या मध संकलनावर विपरीत परिणाम होत आहे. अधिक दुर्दैवी बाब म्हणजे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा करून देणारा मधमाश्यापालन हा व्यवसाय त्यांच्यामध्येच अजूनही रुळलेला नाही.

देशातून मधाचे उत्पादन वाढविण्यासाठी जंगलतोड थांबवून असंघटित आदिवाशींना एकत्र करून त्यांना शास्त्रशुद्ध मध गोळा करण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यासाठीचे आवश्यक सर्व साहित्य त्यांना पुरविले पाहिजे. शेतकऱ्यांनीही पीक उत्पादनवाढीसाठी एक महत्त्वाची निविष्ठा म्हणून मधमाश्यापालनाकडे पाहिले पाहिजे. हंगाम व पीकनिहाय शास्त्रीय पद्धतीने शेतकऱ्यांनी मधमाश्यापालन व्यवसाय केल्यास पिकांच्या उत्पादनवाढीबरोबर मधापासूनही चांगली आर्थिक मिळकत त्यांना होऊ शकते. अनेक प्रगत देशांत मधपेट्या शेतात भाड्याने ठेवल्या जातात. अशा देशांत भाडेतत्त्वावर मधपेट्या पुरविण्याचा व्यवसायही वाढत आहे. मध संकलन, शुद्धीकरण, ब्रॅंडिंग, पॅकिंग विक्री, निर्यात यातही तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी आहेत. मधाचे मूल्यवर्धन करून त्यापासून अनेक पदार्थ निर्माण केले जातात. हर्बल हनी, हनी मिल्क, हनी वाइन, हनी क्यूब अशा मूल्यवर्धित उत्पादनांना जगभरातून मागणी वाढतेय. मध आणि मधाचे मूल्यवर्धित उत्पादनांतील सर्व संधी शोधून यात शेतकरी, तरुणांनी योग्य वाटचाल केली तर निर्यातीत आपण जगात आघाडी घेऊ शकतो. असे झाले तर आपल्या देशातील शेती आणि ग्रामीण भागाचे चित्र बदलू शकते.


इतर अॅग्रो विशेष
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
काजूबोंडावरील प्रक्रियेसाठी आवश्यक...काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. कोकणात काजूपासून...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...
मॉन्सूनने कर्नाटक किनारपट्टी व्यापली;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
पुणे जिल्ह्यात पॉलिहाऊसचे मोठे नुकसानपुणेः कोरोना टाळेबंदीमध्ये बाजार समित्यांसह...
कापसाची ३७१ लाख क्विंटल खरेदीनागपूर ः राज्यात आतापर्यंत कापसाची हमीभावाने ३७१....
कापूस नोंदणीला उद्यापर्यंत मुदतवाढअमरावती ः शासकीय हमीभाव योजनेअंतर्गंत कापूस...
लॉकडाउनमध्ये गजबजली ई-चावडीपुणे: शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात...
संकटाच्या मालिका सोसून द्राक्ष हंगामाची...नाशिक: यंदा जिल्ह्यातील द्राक्ष हंगामावर सतत...
राज्यात गुरांचे बाजार सुरु करण्याचे आदेशअकोला ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने...
रेशीम शेतीतून टाकळीने बांधले प्रगतीचे...यवतमाळ जिल्हयात रेशीम शेतीच्या माध्यमातून आर्थिक...
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
प्रवाह सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....