कसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष?

वन्यप्राण्यांना राहण्यासाठी आपण त्यांना त्यांचे नैसर्गिक घर ठेवले नाही. त्यांची नैसर्गिक अन्नसाखळीही आपण तोडली आहे.
संपादकीय
संपादकीय

अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान वाढले आहे. रोही, हरणे, वानरे, रानडुकरे, अस्वल, हत्ती या वन्यप्राण्यांनी केलेल्या पिकांच्या नुकसानीच्या बातम्या राज्यभरातून येत आहेत. तर रानडुकरे, अस्वल आणि बिबटे शेतशिवाराबरोबर मानवी वस्तीत येऊन शेतकऱ्यांसह पाळीव प्राण्यांवर हल्ले करीत आहेत. मागील काही दिवसांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्याने अनेक शेतकऱ्यांना तसेच गुरा-ढोरांना प्राण गमवावा लागला, तर बरेच जण यात जखमीही झाले आहेत. अनेक गावांत वन्यप्राण्यांच्या केवळ अफवेने रात्री तर सोडाच, दिवसाही शेतकरी शेतात जाण्यास टाळत आहेत. अशा अफवांचा फायदा चोरटे घेत असून, वीजपंपांचे केबल्स, सूक्ष्म सिंचन संच आदी साहित्य चोरीचे प्रमाणही वाढले आहे. मानव वन्य प्राण्यांतील हा वाढता संघर्ष शेतकऱ्यांबरोबर ग्रामीण-शहरी लोकांसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबास तसेच गाय, बैल, म्हैस आदी पाळीव प्राण्यांची शिकार केल्यास अलीकडेच आर्थिक मदत राज्य शासनाने वाढविली आहे. तसेच वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाल्यास १५ दिवसांत भरपाईची घोषणादेखील शासनाने केली आहे. मानव असो की पाळीव प्राणी; त्याच्या जिवाचे मोल पैशात होऊच शकत नाही. पीक नुकसानीच्या बाबतीतही मिळणारी मदत अत्यंत कमी असून, त्यासाठीच्या नियम-निकषांमुळे तीही बहुतांश शेतकऱ्यांना मिळत नाही, हे वास्तव आहे. या सर्व बाबी विचारात घेता मानव-वन्य प्राणी संघर्ष कसा कमी होईल, यावरच शासनासह सर्वांनी लक्ष केंद्रित करायला हवे. 

खरे तर मानव-वन्यप्राणी संघर्ष वाढण्यास मानवजातच जबाबदार आहे. पूर्वी सर्वत्र विपुल वनसंपदा आणि भरपूर जैवविविधता होती. अशा परिसंस्थेमध्ये वन्यप्राण्यांसाठीचा आदिवास (राहण्याची जागा) आणि अन्न-पाणी या गरजा भागत होत्या. वन या परिसंस्थेमध्येच वन्यजीवांची अन्नसाखळी पूर्ण होत होती. त्यामुळे मानव-वन्यप्राणी हा संघर्ष जवळपास नव्हताच. आपले पूर्वज वन्यप्राण्यांचे महत्त्व जाणून होते, ते त्यांचे संरक्षणच करायचे. यातून निसर्ग संतूलन साधले जात होते. मागील काही वर्षांमध्ये वाढत्या लोकसंख्येची गरज भागविण्यासाठी वनजमिनीवर शेतीचा विस्तार वाढलाय. दुष्काळामुळे जंगलातील पाणवठेसुद्धा आटत आहेत. औद्योगिक विकासासाठी तर मोठ्या प्रमाणात जंगलतोड होऊन त्यावरील अतिक्रमणे वाढत आहेत. वनांमध्ये अवैध आणि अनियंत्रित गुरेचराई होते. वाघ, बिबट, चित्ते, रान डुकरे, अस्वल यांची अवैध शिकारसुद्धा केली जाते. अर्थात वन्यप्राण्यांना राहण्यासाठी आपण त्यांना त्यांचे नैसर्गिक घर ठेवले नाही. त्यांची नैसर्गिक अन्नसाखळी आपण तोडली आहे. वानरे, हरणे शेती पिकांचे नुकसान करून अथवा बिबट्या, अस्वल मानवी वस्तीमध्ये येऊन हाच संदेश आपल्याला देत आहेत. पारंपरिक पिकांचे क्षेत्र घटून राज्यात उसाचे क्षेत्र वाढले आहे. बिबट्यासारखे प्राणी जंगल सोडून उसाच्या क्षेत्रात राहावयास येत असल्यानेसुद्धा हा संघर्ष वाढलाय.

मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी उपलब्ध वनांचे संरक्षण करावे लागेल. तसेच जिथे शक्य आहे तिथे वनांमध्ये वृक्ष लागवड करून, त्यांचे संवर्धन करणेही गरजेचे आहे. राष्ट्रीय धोरणानुसार राज्यात संरक्षित क्षेत्रांचे प्रमाण जवळपास निम्मेच आहे. त्यामुळे वन्यप्राण्यासांठी संरक्षित क्षेत्रेसुद्धा निर्माण करावी लागतील. मानवाचे वनावरील अवलंबित्व कमी करणे हासुद्धा संघर्ष टाळण्यासाठीचा प्रभावी उपाय ठरू शकतो. वनक्षेत्रातील गावांमधील लोकांच्या संपूर्ण गरजा वनाबाहेर भागल्या तरच हे शक्य आहे. पुणे-नाशिक जिल्ह्यांत उसाला पर्यायी पिकांच्या क्षेत्रात वाढ व्हायला हवी. मानव-वन्यप्राणी संघर्षाबाबत व्यापक जनजागृतीही हवी. वन्यप्राण्यांचे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व पटवून देऊन संघर्ष टाळण्यासाठीच्या उपाययोजना तसेच मिळणाऱ्या नुकसानभरपाईबाबत शेतकऱ्यांना अवगत करावे लागेल. वन्यप्राण्यांकडून झालेल्या जीवित-वित्तहानीची भरपाई तत्काळ मिळायला हवी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com