माळढोकच्या निमित्ताने...

माळढोकच्या बाबतीत बोलायचे झाले तर या पक्ष्याला मोठी झाडे आवडत नसून, त्यांना वाचविण्यासाठी मात्र माळरानावरील गवताळ भागात चुकीच्या पद्धतीने वृक्षारोपण केले गेल्याने हा पक्षी आपला अधिवास सोडत आहे.
संपादकीय.
संपादकीय.

मागच्या वर्षी प्रदर्क्षित झालेला २.० या विज्ञानाधारित ‘अॅक्शन थ्रिलर’ चित्रपटात मोबाईल टॉवरमुळे निर्माण होणाऱ्या घातक लहरींचा पक्ष्यांवर अत्यंत विपरीत परिणाम होत असल्याचे दाखविण्यात आले आहे. त्या वेळी अनेकांना ही अतिशोयक्ती वाटत होती. परंतु काही पक्ष्यांच्या बाबतीत असेच अहवाल आता पुढे येत आहेत. आधीच अस्तीत्व धोक्यात असलेला माळढोक पक्षी उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालातून समोर आली आहे. देशात माळढोकची संख्या मागील तीन दशकांमध्ये ७५ टक्क्यांनी घटली असून, असेच चालू राहिले तर हा पक्षी नामशेष होण्यास वेळ लागणार नाही. जगातील अतिदुर्मीळ प्रजातींपैकी माळढोक हा एक पक्षी आहे.

उडणारा सर्वांत मोठा डौलदार सुंदर पक्षी म्हणून याकडे पाहिले जाते. हा पक्षी खासकरून काटेरी गवताळ वनांत आढळतो. भारतात माळढोकचे वास्तव्य प्रामुख्याने गुजरात, राजस्थानच्या गवताळ माळरानात असून, तेथे आता केवळ १५० पक्षी उरले आहेत. महाराष्ट्रात २०१७ मध्ये भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून व राज्य वन विभागाने केलेल्या सर्वेक्षणात माळढोक पक्षी आढळलाच नाही. राज्यात माळढोक, घार, साळुंखी या पक्ष्यांसह सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळणारे पोपटही दुर्मीळ होत असल्याचे एका अभ्यातातून पुढे आले आहे. निसर्गात प्रत्येक जिवाला महत्त्व आहे. निसर्गातील एखादा जीव घटक धोक्यात आला तर पूर्ण निसर्गचक्र बदलते, पर्यावरणाचा समतोल बिघडतो. हे लक्षात घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी नष्ट होणाऱ्या पक्षी, कीटकांच्या प्रजाती वाचवायलाच हव्यात.

जेथे जंगल, जैवविविधता अधिक तेथे जगण्याचा आनंदही जास्त, हे अनेक देशांमध्ये सिद्ध झाले आहे. असे असताना निसर्गाला वाचवायचे सोडून त्याला ओरबडण्याचे काम करतोय. शेतीतील किडींचे ३३ टक्क्यांपर्यंत नियंत्रण निसर्गतः पक्ष्यांमार्फत होऊ शकते. गायबगळे, वेडा राघू, चिमण्या, कोतवाल यांसारखे अनेक पक्षी पिकांना घातक अळ्या व किडी वेचून खातात. परंतु या सर्वच पक्ष्यांची संख्या घटल्याने किडीवरील नियंत्रण अवघड होत चालले आहे. शेतातील बांधावर झाडे राहिली नाहीत. शेतीत कीडनाशकांचा अनियंत्रित वापरानेसुद्धा पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. पक्ष्यांचे स्थानिक अधिवास समजले जाणारे मोठे देशी वृक्ष, नदी, नाले, ओढे, माळरान जमिनी, जंगले नष्ट होत आहेत. बोर, बाभूळ, वड, उंबर अशा झाडांची फळे पक्षी खातात. अशा झाडांवरच ते आपली घरटी बांधतात. या झाडांच्या तोडीने पक्ष्यांना अन्न मिळत नसून, ते उघड्यावर पडत आहेत. माळढोकच्या बाबतीत बोलायचे झाले तर या पक्षाला मोठी झाडे आवडत नसून, त्यांना वाचविण्यासाठी मात्र माळरानावरील गवताळ भागात चुकीच्या पद्धतीने झाडे लावली गेल्याने हा पक्षी आपला अधिवास सोडत आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन पक्ष्यांच्या स्थानिक नैसर्गिक अधिवासांचे संवर्धन करायला पाहिजेत. विकासकामात जी झाडे तोडली जात आहेत, तीच झाडे तोडलेल्या प्रमाणाच्या दुपटीने नव्याने लावायला हवीत. शेतीतील कीडनाशकांचा वापर हा सर्वांगाने सुरक्षित कसा होईल, हे पाहायला हवे. पक्ष्यांची अनधिकृत शिकार थांबायला हवी.

माळढोकच्या संवर्धनासाठी ते आढळून येत असलेल्या भागात त्यांना पूरक अधिवास मिळण्याबाबत वन-पर्यावरण विभागाने प्रयत्न वाढवायला हवेत. माळढोकसाठी अभयारण्य घोषित करताना स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध होतो. त्यास कारण म्हणजे अभयारण्य घोषित केलेल्या भागात स्थानिकांना शेती करण्यासाठी अनेक अडचणी येतात. अभयारण्याच्या नावाखाली हजारो हेक्टर जमीन पडीक राहते, त्याच वेळी स्थानिक शेतकऱ्यांवर मात्र उपासमारीची वेळ येते. त्यामुळे माळढोकला वाचविण्यासाठी संरक्षित क्षेत्र घोषित करताना स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, ही काळजीही घ्यायला हवी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com