प्रक्रियेला पर्याय नाही

ताज्या फळे-भाजीपाल्याच्या निर्यातीपेक्षा प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्यात करणे सोपे आहे.
agrowon editorial
agrowon editorial

कोरोना संक्रमणाच्या काळात सर्वच क्षेत्रांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. सेवा, उद्योग क्षेत्र तर ठप्पच झाले आहे. शेतीच्या बाबतीत बोलायचे झाले तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही हे क्षेत्र थांबलेले नाही. मागच्या खरीप हंगामात देशपातळीवर विक्रमी क्षेत्रावर पेरणी झाली. रब्बी, उन्हाळी क्षेत्रही वाढलेले आहे. याच काळात ट्रॅक्टरच्या खपातही विक्रमी वाढ झाल्याचे दिसून आले. कोरोना संकटकाळात देशाच्या अर्थव्यवस्थेला शेती क्षेत्राने सावरण्याचे काम केले. शेती क्षेत्राबाबत अजून एक दिलासादायक बाब म्हणजे एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२० या वर्षभराच्या तुलनेत एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या काळात आपल्या देशातून प्रक्रियायुक्त पदार्थांच्या निर्यातीत २६ टक्केहून अधिक वाढ झाली असल्याचे केंद्र सरकारने नुकतेच स्पष्ट केले आहे. 

कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्यानंतरच्या लॉकडाउनमध्ये नाशिवंत शेतीमालाचे खूपच नुकसान होत आहे. फळे-भाजीपाल्याच्या काढणी देशांतर्गत विक्रीही प्रभावित झाली आहे. अनेक देशांनी खबरदारी म्हणून या शेतीमालाची आयात थांबविली आहे. काही देशांत ताज्या फळे-भाजीपाला पाठवायचे म्हटले तर विमानतळे, बंदरापर्यंतच्या वाहतुकीत अडसर येत आहेत. कंटेनर उपलब्ध होत नाहीत. अनेक देशांतील बंदरे तर बंदच आहेत. विमानाने निर्यात करायचे म्हटले तर त्याचे दर दुप्पट झाले आहेत. हे दर उत्पादकांसह निर्यातदारांना सुद्धा परवडणारे नाहीत. निर्यात थांबल्याने तसेच देशांतर्गत खपही कमी झाल्याने ताज्या फळे-भाजीपाल्याची उपलब्धता वाढली. कमी दरात उपलब्ध होणाऱ्या या शेतीमालाच्या प्रक्रियेवर उत्पादकांच्या काही गट-समुहांसह प्रक्रियादारांनी भर दिला. त्यामुळे कांदा, टोमॅटो, केळी, द्राक्ष, आंबा अशा फळे भाजीपाल्यावर प्रक्रिया वाढली.

ताज्या फळे-भाजीपाल्याच्या निर्यातीपेक्षा प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्यात करणे सोपे आहे. प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थांमध्ये कीडनाशकांच्या उर्वरित अंशाबाबतची महत्तम मर्यादेची अडचण राहत नाही. प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थांचे तुलनात्मक वजन कमी असते, त्यांना साठवण, निर्यात वाहतुकीत जागाही कमी लागते. ताज्या फळे-भाजीपाल्यासारखी यांस शीतवाहतुकीची गरज भासत नाही. प्रक्रियेमुळे साठवणुक कालावधी वाढतो. निर्यातीचा खर्चही कमी येतो. त्यातच मागील वर्षभरात अपेडासह केंद्र सरकारने आपल्या देशातील निर्यातदार, विविध देशांतील आयातदार यांच्या ऑनलाइन बैठका, वेबिनार घेऊन प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांचे चांगले ब्रॅंडींग केले. निर्यातीची प्रक्रियाही थोडी सुलभ केली. त्यामुळेच अडचणीच्या काळातही निर्यातवृद्धी साधता आली आहे. अलिकडच्या काळात मोठ्या प्रक्रियादारांबरोबरच देशात लहान ते मध्यम प्रक्रियादारांचे प्रमाणही वाढत आहे. अशा प्रक्रियादारांकडून सुद्धा व्यवस्थित पॅकिंग, ब्रॅंडींग करून तसेच लॉकडाउनसह निर्यातीबाबतचे देशनिहाय निकषांचे तंतोतंत पालन करून ते खाद्यपदार्थ निर्यात करीत आहेत. 

असे असले तरी देशात अन्नप्रक्रियेला अजून बराच वाव आहे. आजही देशात अन्नधान्यापासून ते फळे-भाजीपाल्यापर्यंत शेतीमाल प्रक्रियेविना पडून असतो. शेवटी खराब होऊन त्यास फेकून द्यावे लागते. देशात केवळ ५ ते १० टक्के शेतीमालावरच प्रक्रिया होते. प्रगत देशात हे प्रमाण आपल्या पाच ते सहा पटीने अधिक आहे. देशात नाशवंत शेतीमालाचे उत्पादन अधिक होते तेव्हा त्यावर प्रक्रिया केली असता देशांतर्गत नाहीतर विदेशी बाजारात योग्य दरात विक्री करता येते. हे लक्षात घेऊन गावपातळीपासून शेतीमाल प्रक्रिया युनिट वाढवायला हवेत. देशात शेतीमाल प्रक्रिया युनिट उभारणीपासून ते शेतीमालाची निर्यात करेपर्यंत उत्पादक, प्रक्रियादार आणि निर्यातदार यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी राज्यात एक खिडकी योजना सुरू करायला पाहिजे. केंद्र-राज्य सरकारच्या निर्यातीसंदर्भातील योजना, अनुदान, सोयीसुविधा यांचेही मार्गदर्शन येथेच झाले पाहिजे. असे झाले तर जगभरातील प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांच्या बाजारपेठेत आपण आघाडी घेऊ शकतो. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com