दिलासादायक दरवाढ 

साखरेचे दर वाढत असताना आम्हाला आता इथेनॉल करून परवडणार नाही, अशी भूमिका कोणत्याही कारखान्यांनी घेऊ नये.
agrowon editorial
agrowon editorial

खरे तर यंदाच्या साखर हंगामात साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करावी, अशी मागणी उद्योगाकडून होत होती, लॉकडाउनमुळे स्थानिक तसेच जागतिक बाजारातून साखरेला घटती मागणी, मिळणारा कमी दर हे किमान विक्री दरात वाढ करण्याच्या मागची कारणे होती. परंतु आता लॉकडाउन बऱ्यापैकी उठले आहे. त्यातच सणावारांचा हंगाम सुरू झाल्यामुळे साखरेला बऱ्यापैकी मागणी आणि उठाव देखील आहे. त्यातच ब्राझीलमध्ये साखरेचे उत्पादन कमी होण्याचे संकेत मिळताहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातूनही मागणी आणि दर वाढले आहेत. त्यामुळे अनुदानाशिवाय साखरेची निर्यात आपण करू शकू, असे दर सध्या मिळत आहेत. भविष्यातील कच्च्या साखरेचे सौदे ३२५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होत आहेत. अर्थात, हा पक्क्या साखरेला ३३५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्यासारखेच आहे. अशा दरामुळे कारखानदार निर्यातीचे करार करताहेत. भविष्यात असे करार वाढण्याची शक्यताही आहे. महत्त्वाचे म्हणजे व्यापारी सध्या जोखीम घ्यायला तयार झालेले आहेत. पुढे अजून दर वाढून आपला फायदा होईल, असे व्यापाऱ्यांना वाटत आहे. या सर्वांचा सकारात्मक परिणाम साखर बाजारावर होऊन दर वधारत आहेत.

दुसऱ्या बाजूला इथेनॉलकडेही सुमारे ३५ लाख टन साखर वळेल, असा अंदाज आहे. जवळपास ७० लाख टन साखरनिर्यातही होईल. अर्थात, उत्पादित साखरेपैकी १०५ लाख टन साखर कमी होणार आहे. ३२० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. त्यातून इथेनॉलनिर्मितीला जाणारी आणि निर्यात होणारी साखर कमी केली, तर २१५ लाख टन साखर हाती असेल. शिल्लक साठा ९० लाख टनांचा आहे. अर्थात, ३०५ लाख टन उपलब्ध साखरेपैकी २६० लाख टन देशांतर्गत खप होऊन जवळपास ६० ते ६५ लाख टन शिल्लक साठा पुढच्या ऑक्टोबरमध्ये राहील. हा साठा फारसा म्हणता येणार नाही. त्यातच या वर्षीच्या मॉन्सूनमुळे पुढील वर्षी उसाचे पीक कसे असेल साखर उत्पादन किती होईल, याचा अंदाज सध्यातरी देता येत नाही. एवढेच उत्पादन पुढील वर्षी देखील झाले तर इथेनॉलचे उत्पादन आपण वाढवू शकतो. 

कारखानदारांना आता साखरेचा ३३०० ते ३४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असला तरी त्यांनी २९०० रुपयांप्रमाणे (प्रतिक्विंटल) उचल घेतली आहे. ही उचल त्यांना व्याजासह बॅंकेला भरावी लागणार असल्याने त्यांच्या हाती प्रतिक्विंटल १०० ते २०० रुपयेच शिल्लक राहतील. त्यामुळे पूर्वी हंगामात उचलच फिटेल की नाही, ही जी भीती राहत होती, ती मात्र आता राहणार नाही, उलट कर्जाचा बोजा कमी होईल. महत्त्वाचे म्हणजे ठरावीक कोट्यानुसार साखरेची विक्री होईल. साखरेचे दर अजून वाढत गेले तर हाती येणारा पैसा कारखान्यांना चालू खर्चासाठी वापरता येईल. थकीत एफआरपीही देता येईल. त्यामुळे सध्या वाढीव दराने साखर विकली जात असली तरी सारेच आलबेल झाले असे नाही. बहुतांश कारखान्यांकडे थकीत देणी बरीच आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे पुढील चित्र आशादायक दिसत असल्यामुळे साखर दरात पुढे देखील वाढ संभवते. साखरेचे दर वाढत असताना आम्हाला आता इथेनॉल करून परवडणार नाही, अशी भूमिका कोणत्याही कारखान्यांनी घेऊ नये. हे सर्व साखरेच्या दराचे गणित इथेनालकडे जाणारी साखर आणि होणारी निर्यात यावर आधारित आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com