agriculture news in marathi agrowon agralekh on innovative project of yevatmal district agriculture officer | Agrowon

योजना माझ्या हाती

विजय सुकळकर
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

व्हॉट्सॲपद्वारे कृषी विभागाच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचा उपक्रम उल्लेखनीय आहे. हा उपक्रम केवळ यवतमाळ जिल्ह्यापुरता मर्यादित नसून, राज्यभरातील शेतकरी योजनांची माहिती ऑनलाइन मिळवू शकतो.
 

कृषी विभागाच्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाहीत. शेतकऱ्यांना योजनेची माहिती पाहिजे असल्यास तालुका, मंडळस्तरावरील कृषी विभागाच्या कार्यालयात जावे लागते. अथवा कृषी सहायकाला तरी गाठावे लागते. कार्यालयात अधिकारी व कर्मचारी भेटतीलच, याची खात्री नसते. कृषी विभागात त्यातही खासकरून कृषी तंत्रज्ञानविस्तार यंत्रणेला अपुऱ्या मनुष्यबळाने ग्रासले आहे. कार्यालयात कृषीचे अधिकारी भेटले, तरी एखाद्या योजनेची एकाच वेळी इत्थंभूत माहिती शेतकऱ्यांना मिळेल, याची खात्री देता येत नाही. काही वेळेस एखाद्या योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे अथवा अनुदानाच्या टक्क्यांमध्ये अनावधानाने चुकीची माहितीसुद्धा दिली जाऊ शकते. योजनेची माहिती मिळाली, तरी त्यासाठीचा विहित नमुन्यातील अर्ज, लागणारी कागदपत्रे, याबाबतची माहिती आणि त्यांची जुळवाजुळव यासाठीही शेतकऱ्यांना अनेक चकरा माराव्या लागतात. शिवाय, ही सर्वच कामे खर्चीक, वेळखाऊ आणि कष्टदायक आहेत. अशावेळी यवतमाळचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांना लागणारा वेळ, पैसा आणि कष्ट कमी करण्यासाठी अनोखी शक्कल लढविली आहे. ते कृषीच्या सर्वच योजनांची इत्थंभूत माहिती, ऑनलाइन पद्धतीने अगदी पारदर्शीपणे आणि तत्काळ शेतकऱ्यांना पोचवितात.

आज आपण पाहतोय मोबाईल फोन राज्याच्या खेड्यापाड्यांत पोचले आहेत. व्हॉट्सॲप, फेसबुक यांचा वापर खेड्यापाड्यांतील शेतकऱ्यांची मुले करताना दिसताहेत. शेती-हवामान-शेतीमाल बाजार असे शेतकऱ्यांना उपयुक्त अनेक अॅप्स् आलेले आहेत. शेतकरी तसेत गाव, विभाग परिसरातील शेतीतज्ज्ञांनी एकत्र येऊन व्हॉट्सॲप, फेसबुक ग्रुप तयार करून त्यावर शेती तंत्रज्ञान, हवामान अंदाज तसेच विविध ठिकाणचे शेतीमालाचे बाजारभाव याबाबतची माहिती शेअर केली जातेय. याचा फायदा त्या-त्या भागातील शेतकऱ्यांना होतोय.

९४०४३९६११९ या क्रमांकावर आपल्या व्हॉट्सॲपवरून योजना किंवा स्कीम असा संदेश पाठविल्यास लगेच केंद्र-राज्य शासनाच्या कृषीच्या जवळपास सर्वच म्हणजे ५१ योजनांची प्राथमिक माहिती कोडसह मिळते. आपल्याला हव्या असलेल्या योजनेचा कोड परत त्याच क्रमांकावर पाठविल्यास संबंधित योजनेची पूर्ण माहिती मराठी भाषेमध्ये मिळते. योजनेचा कोड चुकला, तर बरोबर कोड काय, हेही कळविले जाते. योजनेच्या माहितीमध्ये योजनेसाठीचे नियम-निकष, आवश्यक कागदपत्रे, मार्गदर्शक सूचना, अर्ज कुठे करायचा, यासह अधिक माहितीची लिंक दिली जाते. योजनेचा लाभ ऑनलाइन पद्धतीने घ्यावयाचा असल्यास यातील लिंकद्वारे ऑनलाइन अर्जदेखील करता येतो अथवा व्हॉट्सॲपवरील माहितीनुसार अर्ज नमुन्यासह सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करून शेतकरी थेट संबंधित कार्यालयात अर्ज दाखल करू शकतो.

११ ऑक्टोबर २०१९ रोजी सुरू झालेल्या या उपक्रमास अल्पावधीतच राज्यभरातून चांगला प्रतिसाद लाभला आहे. आत्तापर्यंत १६ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी व्हॉट्सॲपवर विविध योजनांची माहिती मिळविली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश भाग हा जिरायती शेतीचा आहे. शेतीच्या बाबतीत हा जिल्हा मागास मानला जातो. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मर्यादित जिरायती पिकांशिवाय उत्पन्नाची फारशी साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे कर्जबाजारीपणातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या याच जिल्ह्यात अधिक होतात. अशावेळी किमान शेतीसंबंधित योजना तरी शेतकऱ्यांपर्यंत तत्काळ पोचाव्यात म्हणून हा व्हॉट्सॲपद्वारे माहिती पाठविण्याचा उपक्रम कोळपकर यांनी सुरू केला आहे. त्याचा लाभ मात्र राज्यभरातील शेतकऱ्यांना देखील होतोय. 


इतर संपादकीय
रेशीम संजीवनीरेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या...
ऑनलाइन बॅंकिंग करताय, सावधान!आधुनिक युगात विज्ञानामुळे नवनवीन शोधांमुळे मानव...
शेतकरीहितालाच हवे सर्वोच्च प्राधान्यसहकार क्षेत्रात पूर्वीपासूनच काँग्रेस,...
सोशल मीडिया आणि बॅंकिंग जगात आज कोट्यवधी लोक संवाद करणे आणि माहिती...
मटण दरवाढीचा लाभ पशुपालकांना कधी?शेळीपालनाबरोबरच मेंढीपालनातही समस्यांचा ऊहापोह...
जैवविविधतेची नोंदणी गांभीर्याने घ्याराज्यातील खेड्यापाड्यांसह शहरांमध्ये असलेल्या...
चार आने की मुर्गी...केंद्र सरकारने मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर...
मटणाचे वाढते दर अन् शेळी-मेंढीपालन मागणी, पुरवठा आणि किंमत या बाबींच्या...
चिंता पुरे; हवी थेट कृती ग्रामीण कुटुंबाचे उत्पन्न वाढल्याशिवाय देशाचा...
बदल ठरावेत लाभदायकयवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील हजारो...
हवामान बदल हेच सर्वांत मोठे आव्हानआ ज जगभरात हवामान बदल आणि त्याचे होणारे परिणाम हा...
पशुधन विकासाची वसाहत वाटपशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाची...
रस्ते की मृत्यूचे सापळेआपला देश संपूर्ण विश्वात रस्ते अपघातात अव्वल आहे...
‘अटल योजने’द्वारे शाश्‍वत करूया भूजलजल म्हणजेच पाणी अर्थात अमृत. जलाचे वर्गीकरण आपण...
वेध भविष्यातील शेतीचाआपल्या देशात आणि राज्यात सुद्धा आजही बहुतांश...
शेतकऱ्यांच्या व्यापक हिताचे कार्य कधी?शेती उत्पादनाची वाढ व्हावयाची असेल, वाढत्या...
निर्यातवृद्धीचा रोडमॅपभारतात प्रदेशनिहाय माती, हवामान बदलते. अनेक...
दुबई वारी फलदायी ठरावी संत्रा हे जगभरातून मागणी असलेले फळपीक आहे....
उद्योगाप्रमाणे हव्यात शेतीला सवलतीशेती हा एक उद्योग आहे, याची जाणीव करून देण्याची...
गोड बोलण्यासारखी स्थिती नाही!गेल्या सहा वर्षांत भारतात एक नवी ‘भक्त-परंपरा’...