घरात असावे एकमत

शेतकरी कुटुंबाने पुढे यायचे असेल तर पैसा हा सर्वस्व नाही. एकमेकांना धरून सहकार्याच्या भावनेतूनच पुढे जाता येते, हा मोलाचा संदेशकदम कुटुंब सर्वांना देत आहे.
agrowon editorial
agrowon editorial

‘शेतात खत, गावात पत अन् घरात एकमत असावे’ अशी एक म्हण प्रचलित आहे. खत याचा अर्थ इथे शेणखत असून त्यामुळे शेतकऱ्यांची जमीन सुपीक, समृद्ध होते. गावात पत असेल तर प्रतिष्ठा प्राप्त होते. प्रतिष्ठा असेल तर कोणतेही काम केवळ सांगण्यावरून होते. आणि सर्वांत शेवटी घरात एकमत असेल तर सर्व कामे सुरळीत होऊन प्रगतीच्या वाटा विस्तारत जातात.  आज आपण पाहतोय बहुतांश शेतकऱ्यांकडे जनावरेच शिल्लक नसल्याने शेतातील शेणखत कमी झाले आहे. गावातील पत-प्रतिष्ठा ही प्रामुख्याने सामाजिक कामांबरोबर शेतकरी आर्थिकबाबतीत किती संपन्न आहे, यावर ठरते. त्यात मागील अनेक वर्षांपासून शेती आर्थिकदृष्ट्या परवडणारी ठरत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांची गावातील पत-प्रतिष्ठाही कमी झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेक शेतकरी कुटुंबात घरात एकमत राहिलेले नाही. शेती काम तसेच इतर बाबतीतही वादविवाद वाढलेले आहेत. वाढत्या वादविवादातून शेतकरी कुटुंब विभक्त होताहेत. विभक्त कुटुंबामुळे शेती मजुरावलंबी झालेली असून मजूरटंचाई आणि वाढते मजुरीचे दर यांमुळे अनेक शेतकरी त्रस्त आहेत. शेतीच्या वाटण्या, बांधबंदिस्ती अन् शेतरस्त्यांसाठीच्या भांडणातून अनेक गावांत ‘सख्खे भाऊ पक्के वैरी’ झालेले आपण पाहतोय. अशा एकंदरीत वातावरणामध्ये सातारा जिल्ह्यातील साप या गावच्या जालिंधर व भगवान कदम या दोन बंधूंनी कुटुंबातील एकविचाराने शेतीत चांगलीच प्रगती साधली आहे. शेतीतील मजूरटंचाईने दोन-तीन एकर शेती कसणेसुद्धा अवघड होऊन बसलेले असताना कदम कुटुंब एकविचार आणि कुटुंबातील सदस्यांच्या एकत्रित मेहनतीने २५ एकर बागायती शेती सांभाळत दुग्धोत्पादन हा व्यवसाय यशस्वीपणे करीत आहेत.

कदम कुटुंबाने अगोदर आपल्या संपूर्ण शेतीचे सपाटीकरण केले. त्यानंतर जिरायती शेती बागायती केली. ऊस, हळद, ज्वारी ही प्रमुख पिके ते घेतात. शेतीत नवतंत्रज्ञान तसेच अत्याधुनिक यंत्रे-अवजारांचा वापर आवर्जून केला जातो. आज आपण पाहतोय, राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे आहे. काही शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्यादेखील करतात. परंतु, कदम कुटुंब कोणत्याही कामासाठी कर्ज काढत नाही. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून हळूहळू शेतीविकासाची कामे ते करतात. त्यांनी शेतात विहीर केली. त्यांच्याकडे ट्रॅक्टर, जीप आहे. गाव आणि शेतातही पक्के घर बांधले आहे. परंतु, या कोणत्याही कामासाठी त्यांनी कर्ज काढलेले नाही. गावातील सेवा सहकारी सोसायटीचे कर्जवाटप कोट्यवधीत आहे. परंतु, जालिंधर कदम यांच्या आजोबापासून ते आजपर्यंत कुटुंबातील कोणीही सोसायटीचे सभासद देखील नाही. त्यांचे हे आर्थिक नियोजन वाखाणण्यासारखे तसेच राज्यभरातील शेतकऱ्यांना दिशादर्शकच म्हणावे लागेल. राज्यातील बहुतांश शेतकरी कुटुंबात छुपी बेकारीसुद्धा पाहावयास मिळते. शेतकऱ्यांची मुलं शेतीत उतरतात. परंतु, असे करीत असताना कामाचे काहीही नियोजन नसते. त्यामुळे शेतात मनुष्यबळ वाढले तरी उत्पन्नात वाढ दिसून येत नाही.

कदम कुटुंबाने मात्र मुलं शेतीत उतरवताना शेतीत पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण, यंत्रे व अवजारे विभाग, शेती जोडव्यवसाय, मनुष्यबळ व्यवस्थापन असे विभाग पाडून प्रत्येकास कामे वाटून देऊन त्यांच्यावर संबंधित कामाची जबाबदारी टाकली. सर्व आर्थिक व्यवहार मात्र वडील जालिंधर कदम सांभाळतात. कुठे कुणाला शेती कामात अडचण आली तर एक-दुसऱ्याला मदतही केली जाते. त्यामुळे सर्व कामे वेळेत आणि सुरळीत पार पडतात. शेतकरी कुटुंबाने पुढे यायचे असेल तर पैसा हा सर्वस्व नाही. एकमेकांना धरून सहकार्याच्या भावनेतूनच पुढे जाता येते, हा मोलाचा संदेश हे शेतकरी कुटुंब सर्वांना देत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com