agriculture news in marathi agrowon agralekh on integrated Agricultural family Jalindhar Kadam | Agrowon

घरात असावे एकमत

विजय सुकळकर
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

शेतकरी कुटुंबाने पुढे यायचे असेल तर पैसा हा सर्वस्व नाही. एकमेकांना धरून सहकार्याच्या भावनेतूनच पुढे जाता येते, हा मोलाचा संदेश कदम कुटुंब सर्वांना देत आहे.

‘शेतात खत, गावात पत अन् घरात एकमत असावे’ अशी एक म्हण प्रचलित आहे. खत याचा अर्थ इथे शेणखत असून त्यामुळे शेतकऱ्यांची जमीन सुपीक, समृद्ध होते. गावात पत असेल तर प्रतिष्ठा प्राप्त होते. प्रतिष्ठा असेल तर कोणतेही काम केवळ सांगण्यावरून होते. आणि सर्वांत शेवटी घरात एकमत असेल तर सर्व कामे सुरळीत होऊन प्रगतीच्या वाटा विस्तारत जातात. 
आज आपण पाहतोय बहुतांश शेतकऱ्यांकडे जनावरेच शिल्लक नसल्याने शेतातील शेणखत कमी झाले आहे. गावातील पत-प्रतिष्ठा ही प्रामुख्याने सामाजिक कामांबरोबर शेतकरी आर्थिकबाबतीत किती संपन्न आहे, यावर ठरते. त्यात मागील अनेक वर्षांपासून शेती आर्थिकदृष्ट्या परवडणारी ठरत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांची गावातील पत-प्रतिष्ठाही कमी झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेक शेतकरी कुटुंबात घरात एकमत राहिलेले नाही. शेती काम तसेच इतर बाबतीतही वादविवाद वाढलेले आहेत. वाढत्या वादविवादातून शेतकरी कुटुंब विभक्त होताहेत. विभक्त कुटुंबामुळे शेती मजुरावलंबी झालेली असून मजूरटंचाई आणि वाढते मजुरीचे दर यांमुळे अनेक शेतकरी त्रस्त आहेत. शेतीच्या वाटण्या, बांधबंदिस्ती अन् शेतरस्त्यांसाठीच्या भांडणातून अनेक गावांत ‘सख्खे भाऊ पक्के वैरी’ झालेले आपण पाहतोय. अशा एकंदरीत वातावरणामध्ये सातारा जिल्ह्यातील साप या गावच्या जालिंधर व भगवान कदम या दोन बंधूंनी कुटुंबातील एकविचाराने शेतीत चांगलीच प्रगती साधली आहे. शेतीतील मजूरटंचाईने दोन-तीन एकर शेती कसणेसुद्धा अवघड होऊन बसलेले असताना कदम कुटुंब एकविचार आणि कुटुंबातील सदस्यांच्या एकत्रित मेहनतीने २५ एकर बागायती शेती सांभाळत दुग्धोत्पादन हा व्यवसाय यशस्वीपणे करीत आहेत.

कदम कुटुंबाने अगोदर आपल्या संपूर्ण शेतीचे सपाटीकरण केले. त्यानंतर जिरायती शेती बागायती केली. ऊस, हळद, ज्वारी ही प्रमुख पिके ते घेतात. शेतीत नवतंत्रज्ञान तसेच अत्याधुनिक यंत्रे-अवजारांचा वापर आवर्जून केला जातो. आज आपण पाहतोय, राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे आहे. काही शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्यादेखील करतात. परंतु, कदम कुटुंब कोणत्याही कामासाठी कर्ज काढत नाही. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून हळूहळू शेतीविकासाची कामे ते करतात. त्यांनी शेतात विहीर केली. त्यांच्याकडे ट्रॅक्टर, जीप आहे. गाव आणि शेतातही पक्के घर बांधले आहे. परंतु, या कोणत्याही कामासाठी त्यांनी कर्ज काढलेले नाही. गावातील सेवा सहकारी सोसायटीचे कर्जवाटप कोट्यवधीत आहे. परंतु, जालिंधर कदम यांच्या आजोबापासून ते आजपर्यंत कुटुंबातील कोणीही सोसायटीचे सभासद देखील नाही. त्यांचे हे आर्थिक नियोजन वाखाणण्यासारखे तसेच राज्यभरातील शेतकऱ्यांना दिशादर्शकच म्हणावे लागेल.
राज्यातील बहुतांश शेतकरी कुटुंबात छुपी बेकारीसुद्धा पाहावयास मिळते. शेतकऱ्यांची मुलं शेतीत उतरतात. परंतु, असे करीत असताना कामाचे काहीही नियोजन नसते. त्यामुळे शेतात मनुष्यबळ वाढले तरी उत्पन्नात वाढ दिसून येत नाही.

कदम कुटुंबाने मात्र मुलं शेतीत उतरवताना शेतीत पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण, यंत्रे व अवजारे विभाग, शेती जोडव्यवसाय, मनुष्यबळ व्यवस्थापन असे विभाग पाडून प्रत्येकास कामे वाटून देऊन त्यांच्यावर संबंधित कामाची जबाबदारी टाकली. सर्व आर्थिक व्यवहार मात्र वडील जालिंधर कदम सांभाळतात. कुठे कुणाला शेती कामात अडचण आली तर एक-दुसऱ्याला मदतही केली जाते. त्यामुळे सर्व कामे वेळेत आणि सुरळीत पार पडतात. शेतकरी कुटुंबाने पुढे यायचे असेल तर पैसा हा सर्वस्व नाही. एकमेकांना धरून सहकार्याच्या भावनेतूनच पुढे जाता येते, हा मोलाचा संदेश हे शेतकरी कुटुंब सर्वांना देत आहे.
 


इतर संपादकीय
रेशीम संजीवनीरेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या...
ऑनलाइन बॅंकिंग करताय, सावधान!आधुनिक युगात विज्ञानामुळे नवनवीन शोधांमुळे मानव...
शेतकरीहितालाच हवे सर्वोच्च प्राधान्यसहकार क्षेत्रात पूर्वीपासूनच काँग्रेस,...
सोशल मीडिया आणि बॅंकिंग जगात आज कोट्यवधी लोक संवाद करणे आणि माहिती...
मटण दरवाढीचा लाभ पशुपालकांना कधी?शेळीपालनाबरोबरच मेंढीपालनातही समस्यांचा ऊहापोह...
जैवविविधतेची नोंदणी गांभीर्याने घ्याराज्यातील खेड्यापाड्यांसह शहरांमध्ये असलेल्या...
चार आने की मुर्गी...केंद्र सरकारने मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर...
मटणाचे वाढते दर अन् शेळी-मेंढीपालन मागणी, पुरवठा आणि किंमत या बाबींच्या...
चिंता पुरे; हवी थेट कृती ग्रामीण कुटुंबाचे उत्पन्न वाढल्याशिवाय देशाचा...
बदल ठरावेत लाभदायकयवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील हजारो...
हवामान बदल हेच सर्वांत मोठे आव्हानआ ज जगभरात हवामान बदल आणि त्याचे होणारे परिणाम हा...
पशुधन विकासाची वसाहत वाटपशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाची...
रस्ते की मृत्यूचे सापळेआपला देश संपूर्ण विश्वात रस्ते अपघातात अव्वल आहे...
‘अटल योजने’द्वारे शाश्‍वत करूया भूजलजल म्हणजेच पाणी अर्थात अमृत. जलाचे वर्गीकरण आपण...
वेध भविष्यातील शेतीचाआपल्या देशात आणि राज्यात सुद्धा आजही बहुतांश...
शेतकऱ्यांच्या व्यापक हिताचे कार्य कधी?शेती उत्पादनाची वाढ व्हावयाची असेल, वाढत्या...
निर्यातवृद्धीचा रोडमॅपभारतात प्रदेशनिहाय माती, हवामान बदलते. अनेक...
दुबई वारी फलदायी ठरावी संत्रा हे जगभरातून मागणी असलेले फळपीक आहे....
उद्योगाप्रमाणे हव्यात शेतीला सवलतीशेती हा एक उद्योग आहे, याची जाणीव करून देण्याची...
गोड बोलण्यासारखी स्थिती नाही!गेल्या सहा वर्षांत भारतात एक नवी ‘भक्त-परंपरा’...