agriculture news in marathi agrowon agralekh on integrated approch of farmer for sustainable development | Page 2 ||| Agrowon

जिरायती शेतीचा शाश्वत विकास

विजय सुकळकर
बुधवार, 22 एप्रिल 2020

शेतीत सर्वत्र समस्याच समस्या आहेत. परंतू काही शेतकरी समस्यांचे रुपांतर संधीत करतात. यवतमाळ जिल्ह्यातील अनिल जाधव त्यापैकीच एक शेतकरी.
 

विदर्भ, मराठवाड्याचा बहुतांश भाग हा जिरायती शेतीचा आहे. ही शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अशा शेतीत पिके घेण्यास खूपच मर्यादा असतात. जिरायती शेतीत बहुतांश पारंपरिक पिकेच घेतली जातात. अशा पिकांवर हंगामभर खर्च करुन शेवटी उत्पादन कमी मिळते. मिळालेल्या उत्पादनास बाजारात चांगला दर मिळत नाही. त्यामुळे उत्पन्नही कमीच मिळते. त्यामुळे जिरायती शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती जेमतेमच असते. कमी उत्पन्नामुळे कर्जबाजारीपणातून या भागात शेतकरी आत्महत्या सुद्धा अधिक होतात. अशावेळी अशाश्वत अशा जिरायती शेतीचा कायापालट करायचा असेल तर या शेतीस कायमस्वरुपी अथवा हंगामी पाण्याची सोय निर्माण करावी लागेल. काही जिरायती शेतीत कितीही प्रयत्न केले तर सिंचनाची सोय होऊ शकत नाही. अशा शेतीत एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकासाची कामे करुन पडलेला पाण्याचा थेंब जागीच जिरवून पिकांची कांही अंशी पाण्याची गरज भागविता येते. यातून उत्पादनाची हमी मिळू शकते. शिवाय हंगामी मिळकती ऐवजी दररोज, दर आठवड्याला, दर महिन्याला उत्पन्न मिळेल, अशा पर्यायी पूरक व्यवसायाची जोड शेतीस द्यावी लागेल.

अनिल जाधव यांचे विदर्भ, मराठवाड्याच्या सिमेलगत (टाकळी ता. उमरखेड जि. यवतमाळ) गाव आहे. इसापूर धरणाचा कालवा आणि पैनगंगा नदीमुळे या गावात शेतीला पाणी उपलब्ध आहे. जाधव यांची एकत्रित कुटुंबात अकरा एकर शेती आहे. या शेतीत ते प्रामुख्याने सोयाबीन, हरभरा अशीच पिके घेतात. या पिकांपासूनच्या उत्पन्नातील अनिश्चिततेमुळे त्यांनी शेतीला दुग्धव्यवसाय व रेशीम शेतीची जोड दिली आहे. सध्या मजुरटंचाईने शेतीची कामे वेळेवर होत नाहीत. मजुरीचा खर्चही अधिक होतो. त्यामुळे उत्पादनखर्च वाढतो. यावर पर्याय म्हणून त्यांनी बाहेरील मजुराविना शेतीचा पॅटर्न अवलंबिला आहे. शेती असो की पुरक व्यवसाय त्यात काम तर करावेच लागते. जाधव यांचे एकत्रित कुटुंब असल्यामुळे शेती, दुग्धव्यवसाय, रेशीम शेतीतील सर्व कामे कुटुंबातील सदस्यच करतात. त्यामुळे मजुरटंचाईची झळ त्यांना कधी बसली नाही शिवाय खर्चात बचत होऊन उत्पन्नात वाढ झाली आहे. शेतीत सर्वत्र समस्याच समस्या असतात. परंतू काही जण समस्यांचे रुपांतर संधीत करतात. अनिल जाधव त्यापैकीच एक.

दुग्धव्यवसायामुळे त्यांना दररोज अथवा आठवड्याला पैसा मिळतो तर रेशीम शेती महिनेवारी पैसा देणारा व्यवसाय आहे. हंगामी पिकांमुळे शेतकऱ्यांच्या हाती हंगामाच्या शेवटी एकदाच पैसा येतो. यातून दैनंदिन खर्च भागविण्यास शेतकरी कुटुंबाला अडचणी येतात. पूरक व्यवसाय शेतकऱ्यांच्या हाती पैसा खेळत ठेवतात. त्यामुळे आर्थिक चणचण फारशी भासत नाही. विदर्भ, मराठवाड्यातील अशाश्वत शेतीला शाश्वत करण्याचे एक चांगले मॉडेल जाधव यांनी विकसित केले आहे. अशी अनेक मॉडेल्स आपल्या आजुबाजुला पाहावयास मिळतात. त्यांचा आदर्श गाव परिसरातील इतर शेतकऱ्यांनी घ्यायला हवा. विविध पिकांवर आधारीत पीकपद्धती तसेच जोड व्यवसायातून शाश्वत शेतीचे असे अनेक मॉ़डेल विकसित झाल्याशिवाय विदर्भ, मराठवाड्यातील शेतीचा विकास अन् शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणार नाही. कृषी विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी गावपरिसरातील शाश्वत शेतीचे असे मॉडेल्स शोधून त्याचा प्रसार इतरत्र करायला हवा. असे झाल्यास या भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या देखील कमी होतील.


इतर संपादकीय
बांधावरच्या तरुणाईला गरज स्व-संवादाची!अभिनेता सुशांतसिंह राजपूतने नुकताच टोकाचा निर्णय...
आरोग्य निर्भरतेसाठी पशुधन गाळतेय ‘लाळ’ राज्यात पशुरोग निर्मूलन करण्यासाठी लसीकरणाचा...
राजर्षींचे आपत्ती व्यवस्थापन कौशल्य दोन एप्रिल १८९४ रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर...
आपत्ती शिकविते नियोजनप्रभावी विस्तार शिक्षण यंत्रणा नसल्याने शाश्वत...
सडेवाडीचा आदर्शया वर्षी चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने...
शेतकऱ्यांना हवी थेट आर्थिक मदतकोरोना विषाणू चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेमधून...
दुबार पेरणीस शेतकऱ्यांना उभे करा राज्यातील खरीप हंगामातील महत्त्वाचे नगदी पीक...
श्रमाचा बांध  ऐन पावसाळ्यात चांगला पाऊस पडल्यानंतर...
पर्यटन पंढरीचा ‘निसर्ग’  निसर्ग आणि कोकण यांचे अतिशय जवळचे नाते आहे....
सुधारित तंत्रा’चा सरळ मार्ग  आपल्या देशात एचटीबीटी कापूस, बीटी वांगे, जीएम (...