मावळच्या महिलांचा ‘मॉडेल’ प्रकल्प

राज्यभरातील महिला गाव, तालुकानिहाय एकत्र आल्या, तर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून त्यांना शेती तसेच पूरक व्यवसाय उत्पादनांचे मूल्यवर्धन, विक्री यांत रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. मावळच्या महिलांनी हा आदर्श राज्यापुढे ठेवला आहे.
agrowon editorial
agrowon editorial

सततचा दुष्काळ अन् कधी अतिवृष्टी, महापुराने राज्यातील दुग्ध व्यवसाय प्रचंड अडचणीत आहे. त्यातच चारा-खाद्य, मजुरीचे वाढते दर आणि दुधास मिळत असलेले कमी दर यामुळे उत्पादकांचे अर्थशास्त्र पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक दूध उत्पादकांनी आपले दुधाळ जनावरे विकून गोठे रिकामे केले आहेत. दुग्धजन्य उत्पादकांची घटती मागणी आणि घसरलेल्या दराने तर काही ठिकाणी ढिसाळ व्यवस्थापनाने राज्यातील बहुतांश दूध संघ डबघाईला आलेले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा काही शेतकरी कुटुंबे नेटाने हा व्यवसाय करीत आहेत. दुग्धोत्पादन असो, शेळी-मेंढी-कोंबडी पालन असो की रेशीम शेती यात प्रामुख्याने शेतकरी कुटुंबातील महिलांचाच सहभाग दिसून येतो. आता तर ग्रामीण भागातील महिला शेती तसेच पूरक व्यवसायांतील उत्पादन घेण्याबरोबर त्यांचे मूल्यवर्धन करून विक्री साखळीतही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. गावोगाव महिला बचत गट स्थापन करून त्याद्वारे गरजू सभासद महिलांना आर्थिक मदत तर काही महिला लोणचे, पापड, मसाले यांसह विविध अन्नप्रक्रिया उद्योगात उतरत आहेत. अशा व्यवसाय-उद्योगातील नवनवी उत्पादने स्वःत विक्री करून कुटुंबाला चांगलाच आर्थिक आधार देत आहेत.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील महिलांनी तर शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून दूध डेअरी प्रकल्प सुरू केला आहे. महत्त्वाचे म्हणजे महिलांनी सुरू केलला हा राज्यातील पहिलाच डेअरी प्रकल्प असून मावळच्या महिलांनी राज्यातील शेतकरी महिलांपुढे एक वेगळा आदर्श तर ठेवलाच आहे, त्याचबरोबर नेमका कोणता व्यवसाय करायचा या विचारात अडकलेल्या अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांना एक वेगळी दिशा दाखविण्याचे कामही केले आहे.

मावळ तालुक्यातील महिला एकत्र आल्या. त्यातून त्यांनी बचत गटाऐवजी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा वेगळा विचार केला. उत्पादक कंपनी स्थापन झाल्यानंतर दूध डेअरी सुरू करण्याचा विचारही चौकटी बाहेरचाच म्हणावा लागेल. एखादा प्रकल्प उभा करायचा म्हणजे भागभांडवल लागते. शेतकऱ्यांचे बहुतांश प्रकल्प भागभांडवलाअभावीच रखडतात. येथे मात्र महिलांची चिकाटी आणि बचत हे गुण कामाला आले. यातून बऱ्यापैकी निधी जमा झाला तरी प्रकल्प उभा करण्याकरिता तो पुरेसा नव्हता. परंतु, चांगला निर्णय घेऊन कामास सुरुवात केली की इतरांचीही मदत, सहकार्य लाभते आणि काम आडत नाही. याचाच प्रत्यय मावळच्या महिलांनाही आला असून डेअरी प्रकल्प उभारणीसाठी टाटा पॉवरने ‘सीएसआर’मधून प्रकल्पासाठीचा निधी उपलब्ध करुन दिला.

दूध उत्पादन, संकलन, प्रक्रिया, विक्री एवढेच नव्हे तर दुधाळ जनावरांना लागणारे पशुखाद्य विक्रीही महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्याच माध्यमातून होते. या महिलांनी दुधाचा ‘क्रेयो’ ब्रॅंड विकसित केला असून हा ब्रॅंड मुंबई-पुण्याच्या घराघरात पोचविण्यासाठी ऑनलाइन विक्रीचेही नियोजन केले आहे. त्यामुळेच लवकरच हा ब्रॅंड नावारूपाला येऊ शकतो. महिलांच्या या डेअरी प्रकल्पातून स्थानिक दूध उत्पादकांना चांगला दर मिळेल, स्थानिक शेतकरी महिलांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. ग्राहकांनाही चांगल्या ब्रॅंडचे निर्भेळ दूध मिळू शकते. पश्चिम महाराष्ट्रात दूध उत्पादन अधिक होते. राज्यभरातील महिला गाव, तालुका निहाय एकत्र आल्या तर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून त्यांना शेती तसेच पूरक व्यवसाय उत्पादनांचे मूल्यवर्धन, विक्री यात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. शेती विकासाबरोबरच एकंदरीतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला यातून चालना मिळू शकते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com