agriculture news in marathi agrowon agralekh on latur pattern of dispute settlement of farmers | Agrowon

अजून एक `लातूर पॅटर्न’

विजय सुकळकर
शुक्रवार, 10 जुलै 2020

शेतीचे तंटे लॉकडाउन काळात वाढत असताना ते बांधावर जाऊन मिटविण्याच्या ‘लातूर पॅटर्न’चे कौतुक करावे तेव्हढे कमी आहे. 

कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर एप्रिल, मे, जून हे तीन महिने देशभर कडक लॉकडाउन होते. या काळात शहरांतील उद्योग-व्यवसाय बंद होते. उद्योग-व्यवसायातील मजूर-कामगार वर्ग, खासगी कंपन्यातील कंत्राटी तसेच तात्पुरता कामावरील कर्मचारी वर्ग यांचा रोजगार गेला. शहरातील पोट भरण्याचे साधनच हिरावल्याने बहुतांश कामगार-नोकरदार वर्गाने गावचा रस्ता धरला. यातील अनेकांची शेतीवाडी गावी आहे. पूर्वी त्यांची शेती मक्ता-बटाईने भावकीतील अथवा गावातील कोणी ना कोणी करत होते. मक्ता-बटाईने शेत कसणारे प्रत्यक्ष शेतमालक नसल्याने ते धुऱ्या-बांधाकडे, शेतरस्त्याकडे फारसे लक्ष देत नसत. त्यामुळे त्यावर काहींनी अतिक्रमण केले. परंतू लॉकडानमध्ये अनेक जण गावी परतल्याने त्यांच्या हे लक्षात येताच वाद-विवाद, मारामारीचे प्रकार वाढले. त्यातून पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण पण वाढत होते. ही बाब लातूरच्या पोलिस अधिक्षकांच्या लक्षात आली. त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन तंटे मिटविण्याची मोहीम आखली. त्याला बऱ्यापैकी यश देखील आले आहे. पोलिसांनी त्यांच्यावरील लॉकडाउन बंदोबस्ताच्या तणावात ५०० हून अधिक गावात जाऊन शेतीचे ३०६ तंटे मिटविण्याचे काम केले. 

खरे तर शेताचे बांध कोरण्यावरून, शेतरस्त्याच्या समस्येवरुन भाऊबंदकी अथवा शेजारील शेतकऱ्यांमध्ये कायमच वाद सुरु असतात. वाढत्या वादविवादातून भांडणे-मारामाऱ्या होतात. अशा प्रकारच्या मारामाऱ्यात राज्यात काही जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. अशी प्रकरणे पुढे न्यायालयात जातात. तेथे खटले वर्षानुवर्षे चालतात. यांत दोन्ही पक्षांकडील शेतकरी कुटुंबांचा अमाप पैसा तर खर्च होतो वरून भयंकर मानसिक ताप देखील होत असतो. वादाचा मुद्दा अत्यंत किरकोळ असतो, पण क्षणीक रागाच्या भरात घडणाऱ्या घटनांमुळे राज्यात अनेक कुटुंबे उध्वस्त झालेली पाहावयास मिळतात. त्यामुळेच असे तंटे लॉकडाउन काळात वाढत असताना ते बांधावर जाऊन मिटविण्याच्या ‘लातूर पॅटर्न’चे कौतुक करावे तेव्हढे कमी आहे. लातूर पोलिसांना केवळ शेतीचे तंटेच मिटविले नाही तर वादविवाद करणाऱ्या शेतकऱ्यांची मने जुळविण्याचे देखील काम केले, हे या पॅटर्नचे मोठे यश म्हणावे लागेल.

शिक्षणात लातूरचा पॅटर्न प्रसिद्ध आहे. दहावी असो की बारावी लातूरच्या शिक्षण पॅटर्नमुळे गुणवत्तेत अव्वल येथीलच विद्यार्थी असतात. त्यामुळेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून खासकरुन विदर्भ, मराठवाड्याच्या ग्रामीण भागातून मुला-मुलींना शिक्षणासाठी लातूरलाच पाठविले जाते. शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचा आदर्शही याच जिल्ह्याने राज्याला घालून दिला. दशकभरापूर्वी तत्कालिन लातूरचे जिल्हाधिकारी एकनाथ डवले (सध्याचे कृषी सचिव) यांनी जिल्ह्यातील अतिक्रमण असलेले शेतरस्ते लोकसहभागातून मोकळे करण्याचा निर्णय घेतला. एकमेकांना सहकार्य करीत त्यांनी अतिक्रमणमुक्त शेतरस्त्याची लोकचळवळ उभी केली. ही चळवळ त्यांच्यानंतरच्या प्रशासनानेही यशस्वीपणे राबविली. यांत जिल्ह्यातील हजारो किलोमीटर शेतरस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. ही चळवळ पुढे राज्यातील अनेक जिल्ह्यात राबवून तेथीलही रस्ते अतिक्रमण मुक्त झाले. शेतीसंबंधीत तंटे लोकसहभागातून मिटविण्याची लातूर पोलिसांनी मोहीम लॉकडाउन काळात हाती घेतली असली तरी ती कायमच सुरु राहायला पाहिजे. तसेच हा आदर्श राज्यभरातील पोलिसांनी घेऊन प्रत्येक जिल्‍ह्यात अशी मोहीम राबविली तर यातून बहुसंख्य तंटे गावातच मिटतील. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा पैसा, कष्ट अन् महत्वाचे म्हणजे मनस्ताप वाचेल. असे झाले तर गावागावांत सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे चांगले कामही पोलिसांकडून होईल.


इतर संपादकीय
उद्दिष्ट - मुदतवाढीत अडकवू नका मका...‘‘आ धी नोंदणी केल्यानंतर ११ जुलैला एसएमएस...
रेशीम शेतीला संजीवनीकोरोना लॉकडाउनचा फटका दुग्धव्यवसाय, कोंबडीपालन...
नव्या शिक्षणाची मांडणी शरद जोशींच्या...शरद जोशी जे म्हणतात ते महत्वाचे आहे की...
शरद जोशींचे शिक्षण स्वातंत्र्यशरद जोशींचे तत्वज्ञान एका शब्दात सांगायचे म्हटले...
बदलत्या व्यापार समिकरणांचा अन्वयार्थशेती क्षेत्रात नुकत्याच आम्ही काही सुधारणा केल्या...
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
आता हवी भरपाईची हमी चालू खरीप हंगामातील पीकविमा भरण्यासाठीची काल...
शेतीचा गाडा रुळावर कसा आणणार?   कोरोना महामारी संपूर्ण जगाला नुकसानकारक...
शेतकरी संघटनांना ‘संघटीत’ कसे करावे?  एकत्रीकरणाचा लाभ काय?  मतभेद बाजुला सारुन...
इंडो-डच प्रकल्प ठरावा वरदान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर जवळपास तीन महिने...
पीककर्ज प्रक्रिया वेळखाऊ अन्...नेकनूर (ता. जि. बीड) गावचे शेतकरी संदिपान मस्के...
वॉटर बॅंकेद्वारे साधू जल समृद्धी! सोलापूर जिल्ह्यातील कृषिभूषण शेतकरी अंकुश पडवळे...
ऊर्ध्व शेतीचे प्रयोग वाढले पाहिजेतएकविसाव्या शतकाच्या आरंभापासूनच शेती व्यवहार...
कापूस विकासाची खीळ काढावाढलेला उत्पादन खर्च आणि कमी दरामुळे मागील अनेक...
दिलासादायक नवनीत   दूध दर पडले, यावर आंदोलन भडकले की...
कोरोना नंतरचे शेळी-मेंढी-कुक्कुटपालन  फक्त कोरोना विषाणूलाच आपल्या स्वतःमध्ये बदल...
इथेनॉल उद्दिष्टपूर्तीसाठी...  पुढील वर्षातील संभाव्य साखर उत्पादन पाहता...
इंधनाच्या भडक्यात  होरपळतोय शेतकरी राज्यात डिझेलचे दर प्रतिलिटर ८० तर पेट्रोलचे दर...
कोरोना नंतरचा दुग्धव्यवसाय कोरोना विषाणूने जगाचे रूप पालटून टाकले आहे, अशा...
दरवाढाचा फायदा साठेबाजांनाच!  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या...