विजेचे भय

या वर्षी संपूर्ण पावसाळ्यालाच अवकाळीचे रूप आले असून, कुठे ना कुठे सातत्याने विजा पडून जीवित-वित्तहानी होत आहे.
संपादकीय.
संपादकीय.

जुलैअखेरपासून राज्यात सुरू झालेला पाऊस नोव्हेंबर महिना लागला तरी सुरूच आहे. या पावसाने शेतीची अपरिमित हानी तर केलीच; परंतु त्याहूनही गंभीर बाब म्हणजे विजा कोसळून मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडाही राज्यात वाढत आहे. ३० ऑक्टोबरला अकोला जिल्ह्यात पडलेल्या विजांमुळे चार शेतकरी, शेतमजूर दगावले, तर त्या एकाच दिवशी राज्यात विविध ठिकाणी वीज पडून मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा १० वर गेला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यात अजूनही आठवडाभर पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे अवकाळीचे नुकसान आणि विजेचे भय अजूनही संपलेले नाही. खरे तर वादळ, अवकाळी पाऊस, विजा कोसळणे असे प्रकार पूर्वी राज्यात क्वचित घडत होते. परंतु, मागील दीड वर्षापासून राज्यातील नैसर्गिक आपत्तींत खंडच पडलेला नाही. या वर्षीच्या मॉन्सूनबाबत तर हवामान तज्ज्ञांनासुद्धा नीटसा अंदाज बांधता येत नाही. समुद्र-महासागरांत वरचेवर तयार होणारी चक्रीवादळे आणि त्यातून विजांच्या कडकडाटासह होणारी अतिवृष्टी हेही या वर्षीच्या मॉन्सूनचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

वीज पडणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. राज्यात पूर्वहंगामी (वळीव) आणि परतीच्या पावसाच्या वेळी वीज पडून जीव गमवावा लागणाऱ्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. या वर्षी मात्र संपूर्ण पावसाळ्यालाच अवकाळीचे रूप आले असून, कुठे ना कुठे सातत्याने विजा पडून जीवित-वित्तहानी होत आहे. कोणत्याही नैसर्गिक आपत्तींचे बळी हे ग्रामीण भागात आणि त्यातही गरिबांचे अधिक असतात. शहरातील उंच इमारतींवर विद्युतवाहक बसविलेले असतात. त्यामुळे अशा इमारतींवर वीज पडली तरी फारशी हानी होत नाही. खेड्यात मात्र अशी व्यवस्था नसते. मुख्य म्हणजे शेतात काम करणारे शेतकरी, शेतमजूर पावसापासून स्वतःला वाचविण्यासाठी झाडाचा आश्रय घेतात. शेतातील उंच झाडांवर वीज पडण्याचे प्रमाण अधिक असल्याने अशा झाडांखाली थांबलेले शेतकरी-शेतमजूर वीज पडून दगावतात. अलीकडच्या काळात वीज पडून दगावण्याच्या घटना राज्यात वाढत असताना, वीज पडण्याचे पूर्वअंदाज, पडताना घ्यावयाची काळजी, पडल्यानंतरचे प्रथमोपचार आणि यात दिली जाणारी मदत या सर्व बाबींकडे तेवढेच दुर्लक्ष होत आहे.  

चीन, अमेरिका, आस्ट्रेलिया या प्रगत देशांनी वीज कोसळून बळी जाणाऱ्यांचे प्रमाण अभ्यास आणि संशोधनातून कमी केले आहे. ढगांचा नीट अभ्यास करून त्यावरील नियंत्रक रडारद्वारा काही तास अगोदर वीज कुठे पडणार, हे कळू शकते. विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना असे रडार राज्यात लावा, असे आदेश त्यांनी दिले होते. या प्रकल्पावर मोठा निधीही खर्च झाला आहे. राज्यात काही ठिकाणी असे रडार बसविण्यातही आले आहेत. मात्र, या यंत्रणेचा पाठपुरावा पुढे झाला नाही. आता तर या यंत्रणेचे काय झाले, हा संशोधनाचाच विषय ठरेल. त्यानंतर मे २०१७ मध्ये वीज पडण्याच्या २४ तास आधी याची पूर्वसूचना मिळू शकेल, असे मॉडेल विकसित केले जात असल्याचे भारतीय हवामान खात्याने स्पष्ट केले होते. हे मॉडेल अजून किती जणांचे विजेने बळी घेतल्यावर विकसित होणार आहे, ते तरी आता हवामान विभागाने एकदाचे स्पष्ट करावे.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वीज पडल्यानंतर नेमके काय प्रथमोपचार करायला पाहिजेत याबाबत शेतकऱ्यांसह एकूणच राज्याच्या जनतेमध्ये प्रबोधन नाही. प्रथमोपचाराच्या योग्य सोयीसुविधा ग्रामीण भागातील रुग्णालयांत नाहीत. त्यामुळेही अनेकांना प्राण गमवावे लागतात, नाहीतर कायमचे अपंगत्व तरी येते. वीज पडून मृत्यू पावलेल्यांच्या वारसदारास तसेच अपंगत्व आल्यास मिळणारी शासकीय मदत फारच तुटपुंजी आहे. ते मिळण्यासाठीचे नियम-निकषही अत्यंत क्लिष्ट आहेत. या ज्वलंत विषयावर अपवादात्मक काही लोकप्रतिनिधी सोडले तर कोणी आवाज उठवत नाही, या सर्वच बाबी अत्यंत दुर्दैवी आहेत. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात विजेबाबत पूर्वसूचना, प्रथमोपचार आणि बाधितांची मदत वाढवून काहींचे प्राण वाचवून इतरांना चांगला दिलासा दिला जाऊ शकतो. त्याकरिता हा विषय शासन-प्रशासनाला आपल्या ‘रडार’वर मात्र घ्यावा लागेल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com