संकट टोळधाडीचे

आपल्या राज्यात सहसा टोळधाड येत नाही आणि सध्याही आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. परंतु, या संकटाबाबत सर्वांनी सजग असलेले केव्हाही बरे!
agrowon editorial
agrowon editorial

पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतात टोळधाडीने धुडगूस घातल्यानंतर मे-२०१९ मध्ये आपला मोर्चा भारताकडे वळविला आहे. मे ते ऑगस्ट या काळात टोळधाडीने राजस्थानमधील बारमेर, जैसलमेर, श्री गंगासागर आणि जोधपूर या जिल्ह्यांमध्ये पिके फस्त केली. याच काळात उत्तर गुजरातमध्येसुद्धा टोळधाडीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. डिसेंबर २०१९ पर्यंत गुजरातमधील बसानकांठा, मेहसानासह पाच जिल्ह्यांत टोळधाडीने तेथील शेतकऱ्यांना फारच त्रस्त केले. राजस्थानमध्ये टोळधाडीचे अधूनमधून आक्रमण सुरू असले, तरी गुजरातमध्ये मात्र मागील दहा वर्षांत टोळधाड आली नव्हती, असे तेथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जून ते डिसेंबर २०१९ दरम्यान राजस्थान आणि गुजरातमध्ये टोळधाडीने केलेले नुकसान हे गेल्या दोन दशकांतील सर्वाधिक मानले जाते. राजस्थानमधील टोळधाडीच्या आक्रमणाचे व्हिडिओ महाराष्ट्रातही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातच गुजरातमार्गे टोळधाड महाराष्ट्रातही येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आधीच वाढत्या नैसर्गिक आपत्तीने राज्यातील शेतकरी हैराण झालेला आहे. त्यातच बोंड अळी तसेच लष्करी अळीचा सामना करता करता येथील शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आलेले आहेत. त्यातच टोळधाड या घातक संकटाची भर पडते की काय? अशा चिंतेत राज्यातील शेतकरी आहेत.   

अॅक्रिडीई या कुळातील नाकतोड्यासारख्या दिसणाऱ्या कीटकाला टोळधाड (लोकस्ट) म्हणून सर्वत्र ओळखले जाते. टोळ आपल्या पंखांचा आधार घेत मोठ्या थव्याने कित्येक मैल दूर प्रवास करतात. टोळधाडीचा थवा हिरव्या शेतात बसला की काही वेळात पूर्ण पीक फस्त करतात. त्यामुळे जगभरातील शेतीमध्ये टोळधाड गंभीर संकट मानले जाते. वाळवंटी प्रदेशात प्रामुख्याने ही कीड आढळून येते. प्रजनन, अन्नाचा शोध आणि सुरक्षिततेसाठी टोळधाड एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात. दमट वातावरण टोळधाडीचे प्रजनन अन् अंडी घालण्यासाठी अनुकूल असते. आपल्या राज्यात सहसा ही कीड येत नाही आणि सध्याही आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. 

देशात टोळ संरक्षण यंत्रणा आहे. ही यंत्रणा टोळधाडीवर लक्ष ठेवून असते. एखाद्या राज्यात टोळधाडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली, की ही यंत्रणा त्या राज्याला सजग करून नियंत्रणासाठी सर्वतोपरी मदत करीत असते. परंतु, अशा प्रकारची यंत्रणा आहे म्हणून आपल्या राज्यातील कृषी विभागाने स्वस्थ बसून चालणार नाही. टोळधाडीच्या झुंडी नेमक्या कशा, कुठून येतात, यावर शेतकऱ्यांनी कसे लक्ष ठेवायचे, टोळधाडीच्या झुंडी दिसून आल्यास नेमके कुणाला कळवायचे, त्यांचा हल्ला कसा परतवून लावायचा, याबाबत कृषी विभागाने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन वाढवायला पाहिजे. टोळधाड आल्यास त्याचा सामना परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र करायला हवा, हेही शेतकऱ्यांना पटवून द्यावे लागेल. जमीन आणि हवा अशा दोन्ही मार्गाने टोळधाडीच्या झुंडी येत असतात. राज्यात (खासकरून गुजरात सीमेलगतच्या जिल्ह्यांत) अशा प्रकारच्या झुंडी आढळून आल्यास तत्काळ कृषी विभागाला कळवायला हवे. टोळधाडीचा हल्ला झाल्यास तो परतवून लावण्यासाठी शेतांमध्ये टायर जाळणे, ड्रम किंवा भांडी वाजविणे, शेतात गाणी वाजविणे असे उपाय शेतकऱ्यांच्या पातळीवर करायला हवेत. शासन यंत्रणेद्वारे जमिनीवर आणि हवेमध्ये कीडनाशकांची फवारणी करून टोळधाडीला नियंत्रणात आणले जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com