फटका वादळाचा अन् चुकीच्या निकषांचा! 

मुळात आंब्यासाठीच्या फळपीक विमा भरपाईबाबतचे निकष चुकीचे आहेत. हे निकष ठरविताना कोकणचे एकंदरीत हवामान तसेच भौगोलिक परिस्थिती लक्षातच घेतली गेली नाही
agrowon editorial
agrowon editorial

मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक फटका हा हापूस आंब्याला बसला आहे. गेल्या वर्षीचा लांबलेला पाऊस आणि थंडीच्या कमी प्रमाणामुळे हापूसची मोहोर प्रक्रिया बाधित झाली. फेब्रुवारीपासूनच्या सततच्या वादळी पावसाने लहान आंबे गळण्याची प्रक्रिया चालूच होती. आंबा गळीस पूर्णविराम दिला तो तोक्ते या चक्रीवादळाने! तौक्ते वादळ येण्याच्या आधीच विविध आपत्तींनी ५० टक्के (उत्पादनक्षम क्षेत्राच्या) आंबा उत्पादन घटणार, असे भाकित वर्तविले होते. अशावेळी शेवटच्या टप्प्यातील थोडाबहुत तरी आंबा हाती लागेल, अशी उत्पादकांना आशा होती. त्यावर तौक्ते चक्रीवादळाने पाणी फिरवण्याचे काम केले आहे. त्यामुळे या वर्षी एकूण आंबा उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट होणार आहे. तौक्ते वादळाने पडलेले बहुतांश आंबे खराब झाले, त्यातील काही कॅनिंगसाठी गेले असून, त्यांना अत्यंत कमी दर मिळाला आहे. अधिक दुर्दैवी बाब म्हणजे कोकणातील आंबा बागायतदारांनी हापूस आंब्याचा पीकविमा उतरविला आहे. परंतु विमा उतरवून नुकसान झाले तरी चुकीच्या निकषांमुळे आंबा बागायतदार भरपाईपासून वंचित राहतात की काय, असे वाटत आहे. 

मुळात आंब्यासाठीच्या पीकविमा भरपाईबाबतचे निकष चुकीचे आहेत. हे निकष ठरविताना कोकणचे एकंदरीत हवामान तसेच भौगोलिक परिस्थिती लक्षातच घेतली गेली नाही. महत्त्वाचे म्हणजे कोकणातील आंबा उत्पादक, आंबा बागायतदार संघ यांना देखील विश्‍वासात घेतले गेले नाही. त्याच्या परिणामस्वरूप संरक्षण कालावधीच्या केवळ एक दिवस उशिरा येणाऱ्या वादळाने आंब्याचे एकूणच विमा संरक्षण धोक्यात आले आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत मॉन्सूनचा पाऊस पडल्यानंतर उर्वरित कालावधीत (ऑक्टोबर ते मे) पडणारा पाऊस हा अवेळी, अवकाळीच असतो. अशावेळी आंब्यासाठी अवेळी पावसाचा कालावधी १ डिसेंबर ते १५ मे असा का ग्राह्य धरण्यात आला, याचे उत्तर मिळायला हवे. फळपिकांत विमा संरक्षण कालावधी हा फळ लागल्यापासून ते काढणीपर्यंत असला तरी इतर वेळी पडलेला पाऊस, थंडीचे कमीअधिक प्रमाण यांनी देखील ताण तुटणे, बहर नियोजन विस्कळित होणे, कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढणे यामुळे बागेचे नुकसान होते. त्यामुळे याबाबींचा सुद्धा धोके आणि विमा संरक्षणात विचार व्हायला हवा. पाऊसमानाप्रमाणेच कोकणचे मागील चार-पाच वर्षांतील बदलते हवामान लक्षात घेऊन विमा संरक्षणात कमी-अधिक तापमानाचा कालावधी आणि त्याचे प्रमाण यात बदल होणे गरजेचे आहे. हवामान आधारित फळपीक विम्यासाठी हवामान केंद्र हे महसूल केंद्रात उभारली गेली आहेत. त्यावरच्या नोंदीवरून पाऊसमान, तापमान ठरविले जाते. कोकणात मात्र कातळावरच्या बागा आणि समुद्रकिनारच्या बागा यांच्या तापमानासह इतरही हवामानात मोठा फरक असतो. अशावेळी एका ठिकाणचे हवामान केंद्र नुकसानीच्या वेळी विम्याचा लाभ देण्यास असमर्थ ठरतात, ही बाबही विचारात घ्यायला हवी.  गेल्या वर्षीचा हापूस हंगाम लॉकडाउनमध्ये सापडला. आंब्याच्या वाहतूक, विक्रीत अडचणी आल्या. या वर्षी तर नैसर्गिक आपत्तींमुळे आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले.

लॉकडाउनमुळे या वर्षी देखील वाहतूक-विक्री खोळंबली आहे. हापूसच्या निर्याती या वर्षी देखील फटका बसला आहे. युरोप, आखाती देश वगळता अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आदी देशांना हापूसचा गोडवा चाखताच आला नाही. त्यामुळे आंबा उत्पादक प्रचंड आर्थिक अडचणीत आहेत. अशावेळी विमा उतरविलेल्या आंबा उत्पादकांना तौक्ते वादळात झालेल्या नुकसानीत भरपाई मिळायलाच हवी. शिवाय ज्यांनी विमा उतरविलेला नाही, अशा आंबा उत्पादकांना शासनाने मदतीचा हात द्यावा. महत्त्वाचे म्हणजे आंब्यासह इतरही फळपिकांत विम्याच्या निकषांत उत्पादकांना विश्‍वासात घेऊन आवश्यक ते बदल तत्काळ करायला हवेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com