डोळ्यातल्या पाण्याचे मोल

शासन-प्रशासन खरेच संवेदनशील असेल तर त्यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात तराळत असलेल्या पाण्याचे मोल जाणून त्यांना योग्य ते साह्य करायला हवे.
agrowon editorial
agrowon editorial

ऑ क्टोबरचा दुसरा पंधरवाडा चालू आहे. मूग, उडीद, सोयाबीन, भात, ज्वारी, मका आदी खरीप पिकांची काढणी झाल्यावर रानाची मशागत करून त्यात रब्बी ज्वारी, हरभरा, करडई, गहू आदी पिकांच्या पेरणीच्या लगबगीची ही वेळ आहे. परंतू राज्यातील शेतशिवारात सध्या वेगळेच चित्र पाहावयास मिळतेय. कुणी शेतात रचून ठेवलेली सोयाबीन गंजी वाहून जात असताना तिला रोखण्याचा प्रयत्न करीत आहे, कुणी शेतात साचलेल्या पाण्याच्या डोहात तरंगत असलेले भाताचे पीक गोळा करु पाहत आहे, कुणी पावसाच्या माऱ्याने गळून पडलेला कापूस वेचत आहेत, तर कुणी जमीनदोस्त झालेल्या फळे-भाजीपाल्याच्या बागा उभ्या करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये शेतकरी यशस्वी झाले तरी त्यांच्या हाती काहीही लागणार नाही, हे त्यांना माहीत आहे. परंतू शेत भरून आलेल्या पिकाला शेतकरी लक्ष्मी मानतो. आणि अशा लक्ष्मीची डोळ्यादेखत होत असलेली वाताहात शेतकरी पाहू शकत नाही.  

एप्रिल-मे मधील कडक उन्हाने तप्त जमीन आणि खरीपाच्या पेरणीसाठी आस लावून बसलेला शेतकरी हे दोघेही मॉन्सूनच्या आगमनाची वाट पाहत असतात. जूनमध्ये दाखल होत असलेला मॉन्सूनचा पाऊस सप्टेंबरमध्ये राज्यातून कधी काढता पाय घेतो, हे अनेक वेळा लक्षात देखील येत नाही. यावर्षी मात्र लांबलेल्या परतीच्या पावसाने शेतशिवारात हाहाकार उडविला आहे. ‘‘आता बरसणे बस कर रे राजा, नाही तर शेतात पिके तर सोडा मातीचा कण देखील शिल्लक राहणार नाही,’’ अशी विनवणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसाशिवाय शेती पिकत नाही, माणूस टिकत नाही. तहानेचा जन्म तर पावसाच्या पोटातूनच झालेला आहे. सगळी समृद्धीच पावसात सामावलेली आहे. जसा हवा तसा, बेताचा, लागेल तेवढा पाऊस हा जगाच्या सुख आणि समृद्धतीसाठी असतो. मात्र, पावसाने रौद्र रुप धारण केले तर तो किती विनाशकारी ठरतो, याचा प्रत्यय आज शेतकऱ्यांना येतोय.

‘‘सोयाबीन गंजी वाहून जाताना पाहून डोळ्यात पाणी येत असून सध्याच्या अतिवृष्टीने आमचे जीवनच उध्वस्त केले आहे,’’ ही प्रतिक्रिया लातूर जिल्ह्यातील शाहुराज बाबळसुरे या शेतकऱ्याची आहे. तर ‘‘दोन एकर कांदा, एक एकर केळी पाण्यात बुडाली. गेल्या दोन दिवसांत पावसाने केलेल्या नुकसानीमुळे पुढे काय करायचे ते सध्यातरी काही सूचक नाही,’’ हे उद्गार आहेत उत्तर सोलापूर मधील नागेश नन्नवरे या शेतकऱ्याचे! शेतकरी कष्टाला कमी पडत नाही, संकटातही खचून जात नाही. परंतू यावेळच्या पावसाच्या माऱ्याने तो खूपच हतबल झालेला आहे. त्यास कारण म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी खरीप हंगाम उभा केला होता. हंगाम उभा करण्यासाठी त्याने उपसलेले कष्ट आणि केलेल्या खर्चाला तोडच नाही. अशा खरीप हंगामाचे सततच्या पावसाने ऑगस्टपासूनच नुकसान होत असून आता तर शेवटच लावलाय. झालेल्या नुकसानीचे पाहणी, पंचनामे करुन शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याबाबत विविध माध्यमांतून बऱ्याच वेळा सांगून झाले आहे. काही ठिकाणी तर यासाठी शेतकऱ्यांना आंदोलन देखील करावे लागत आहे. शासन-प्रशासन खरेच संवेदनशील असेल तर त्यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात तराळत असलेल्या पाण्याचे मोल जाणून त्यांना तत्काळ योग्य ते साह्य करायला हवे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com