agriculture news in marathi agrowon agralekh on maharashtra assembly election results | Agrowon

जमिनीवर राहा, जमिनीकडे पाहा

आदिनाथ चव्हाण
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

शेतीसाठी खूप काही केले असे सांगणारे कोटींचे आकडे जाहिरातींमधून लोकांच्या अंगावर फेकले गेले. प्रत्यक्षात शिवारात काही पोचलेच नव्हते. हा विरोधाभास आणि रेटून केलेला प्रचार भाजपवर बूमरँगसारखा उलटलेला दिसतो आहे.

भाजपची महत्त्वाकांक्षी गृहीतके, त्याची पुष्टी करणारा कंठाळी प्रचार आणि त्याला पूरक ठरणाऱ्या मतदानोत्तर जनमत चाचण्यांच्या अंदाजांना जोरदार धक्का देणारा निकाल महाराष्ट्राच्या सुजाण जनतेने गुरुवारी नोंदवला. विधानसभेतील सत्तेचा सोपान एकहाती काबीज करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना त्यामुळे मोठी खीळ बसलीच, पण त्याचबरोबर ‘अबकी बार दो सौ पार' ही घोषणाही फोल ठरली. प्रसंगी युतीतला जोडीदार शिवसेनेला लाथाडून स्वबळावरच सरकार स्थापन करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या पक्षाला शंभर जागांच्या आगेमागेच खेळावे लागले. महाराष्ट्राच्या भूमीत उपजतच असलेले सामुदायिक शहाणपण अद्याप शिल्लक असल्याचा दिलासा देणारा हा कौल मानावा लागेल. हे असे होणार याचा अंदाज भल्याभल्यांना बांधता आला नाही. दुसरं म्हणजे लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडून घाऊक प्रमाणात घडवून आणलेली पक्षांतरे भाजपच्या आणि शिवसेनेच्याही कामी आली नाहीत. सत्ताकांक्षा किंवा चौकशीच्या भयापोटी सत्ताधारी पक्षांत दाखल झालेल्या यापैकी बहुतेक आयारामांना पराभवाची चव चाखावी लागली हे विशेष! त्यामुळे इतःपर जनतेला शेंड्या लावता येणार नाहीत, हाही ठोस संदेश सुजाण मतदारांनी दिला आहे.

पंकजा मुंडे, राम शिंदे, विजय शिवतारे, अर्जुन खोतकर, अनिल बोंडे आदी मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या प्रत्येकाच्या पराभवाची कारणमीमांसा वेगवेगळी असली तरी या मोठ्या नेत्यांना अपयश का आले याचे चिंतन युतीच्या नेत्यांना करावे लागेल. छत्रपतींना बरोबर घेतले तर पश्चिम महाराष्‍ट्रातील सगळे मराठे खिशात घालता घेतील हा भाजपचे चाणक्य चंद्रकांतदादा पाटील यांचा भाबडा समज कसा चुकीचा आहे, हेही जनतेने दाखवून दिले. चार महिन्यांत पक्षांतर करून लोकसभेची निवडणूक पुन्हा लादणाऱ्या उदयनराजेंना सातारच्या मतदारांनी चांगलाच धडा शिकवला. शिवरायांविषयीचा आदर ही वेगळी गोष्ट आणि त्यांचे वारस म्हणवून घेणाऱ्यांचे ‘कर्तृत्व' ही वेगळी गोष्ट असल्याचे लोकांनी मतपेटीतूनच दाखवून दिले. कारखानदारांना आपल्या खेम्यात घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला पश्चिम महाराष्ट्र ताब्यात घेण्याच्या चंद्रकांतदादांच्या मनसुब्यावरही पाणी फेरले गेले. उलट कोल्हापूर या त्यांच्या होमपीचवरील पक्षाच्या दोन्ही जागा गमावण्याची नामुष्की त्यांच्यावर आली.

विरोधी पक्ष नेत्यालाच आपल्या गोटात सामील करून घेणे, ही भाजपची सर्वांत मोठी खेळी ठरली. त्या धक्क्यातून काँग्रेस शेवटपर्यंत सावरू शकली नाही. विशेष म्हणजे शक्य असूनही काँग्रेसला आपल्या शिडात वारे भरता आले नाही. राहुल गांधी वगळता काँग्रेसचा एकही राष्ट्रीय नेता महाराष्ट्रात फिरकला नाही. विशेषतः सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांनी महाराष्ट्रातील प्रचाराकडे पाठ फिरवून जणू पराभव आधीच मान्य केला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन घसरणीला लागलेल्या अर्थव्यवस्थेबद्दल सरकारवर कोरडे ओढले तेवढेच. त्यापलीकडे काँग्रेसच्या गोठात सामसूमच राहिली. राज्य पातळीवरचे बहुतेक नेते पराभवाच्या भीतीने आपापल्या मतदारसंघातच जखडून राहिले. त्यामुळे लोकांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रचाराची राज्यव्यापी राळ उडवून देण्यात काँग्रेसला अपयश आले. ते काम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकहाती करण्याचा प्रयत्न केला. उतारवयात पायाला झालेली जखम सांभाळत, पक्षाचा पाया वाढवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल लोकांनाच नव्हे, तर सत्ताधारी पक्षालाही घ्यावी लागली. विशेषतः साताऱ्यात भरपावसात त्यांनी केलेले धडाडीचे भाषण सर्वांनाच भावले. समाज माध्यमांमध्ये निवडणुकीत सर्वाधिक चर्चिला गेलेला हा विषय ठरला. पवारांच्या या विजिगिषू वृत्तीमुळेच सुरवातीला एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणुकीत खरे रंग भरले गेले. पवार संपले, त्यांचे राजकारण कालबाह्य झाले म्हणणाऱ्यांना, त्यांनी ज्या पद्धतीने ही निवडणूक फिरवली त्यामुळे मोठी चपराक बसली असेल. निवडणुकांमध्ये जय-पराजय होतच असतात. त्या जिंकण्याच्या ईर्षेने लढणे महत्त्वाचे असते. पवारांनी ते करून दाखवले. त्यांचा पक्ष सत्तेच्या जवळपास पोचला नसला तरी आजही चर्चा होते आहे ती त्यांच्या करिष्म्याची!

निवडणुकीसाठी किंवा कोणत्याही निवडीसाठी किमान दोन चांगले पर्याय हवे असतात. ते राहू नयेत यासाठी भाजपने जे काही केलं ते ‘न भूतो’ अशा प्रकारचं होतं. घाऊक पक्षांतरं घडवून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातील सारेच मोठे सरदार भाजपने आणि काही प्रमाणात शिवसेनेने आपल्या पलटणीत सामावून घेतले. दोन्ही काँग्रेसचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. त्यामुळे सत्ताधारी नको तर मग दुसरे कोण, हा पर्याय मतदारांना काही मतदारसंघांतच आणि काही प्रमाणातच उपलब्ध होता. चांगला पर्याय नसल्याने अनेक मतदारसंघांत लोकांनी ‘नोटा’चा वापर मोठ्या प्रमाणावर केला. विरोधी पक्षांचे खच्चीकरण करण्याच्या खेळीमुळे स्थिर सरकार कोण देणार, या प्रश्नाचे उत्तरही युतीकडेच अंगुलीनिर्देश करेल असा सत्ताधाऱ्यांचा आडाखा होता. तसे झाले, पण ते जितक्या प्रमाणात अपेक्षित होते त्या प्रमाणात झाले नाही. त्यामुळे २०१४ च्या तुलनेत भाजपच्या जागा वाढायच्या सोडून मोठ्या प्रमाणावर घटल्या. स्वाभाविकपणे सत्ता जरी युतीकडे येणार असली तरी शिवसेनेची भाजपला जेरीस आणण्याची क्षमता मात्र अनेक पटींनी वाढली. गेल्या पाच वर्षांत भाजपने जे काही शिवसेनेबरोबर केले त्याचा हिशोब चुकता करण्याची मोठी संधी या पक्षाला मिळणार आहे आणि तिचा पुरेपूर फायदा शिवसेना उठवेलच!

समस्यांच्या जंजाळात फसलेली शेती, बेरोजगारी, आर्थिक मंदी, अनेक समस्यांनी पिचलेला आणि उदरनिर्वाहाच्या भरवशाच्या साधनांअभावी उदध्वस्त झालेला ग्रामीण भाग या साऱ्या समस्या गंभीर असल्या तरी निवडणुकीच्या गावकीत काहीच स्थान न मिळाल्याने त्या अंग चोरून गावकुसाबाहेरच राहिल्या होत्या. गेल्या पाच वर्षांत शेतीची पुरती वाताहत झाली, तरी शेती खात्याला एक चांगला मंत्री देणे मुख्यमंत्र्यांना जमले नाही. शेतीसाठी खूप काही केले असे सांगणारे कोटींचे आकडे जाहिरातींमधून लोकांच्या अंगावर फेकले गेले. प्रत्यक्षात शिवारात काही पोचलेच नव्हते. हा विरोधाभास आणि रेटून केलेला प्रचार भाजपवर बूमरँगसारखा उलटलेला दिसतो आहे.

मंदीबाबत तर केंद्रातील मोदी सरकारने विश्वामित्री पवित्रा स्वीकारला आहे. मंदी आहे, रोजगार घटताहेत, अर्थव्यवस्था रुळावरून घसरते आहे हेच सरकारला मान्य नाही. शरद पवार यांनी या भ्रमाच्या फुग्यांना टाचणी लावली. विरोधी पक्षांना मिळालेले जे काही यश आहे ते त्याचेच फळ! सत्तारूढ युती खूप मोठ्या जागांसह सत्तेवर येईल आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत होईल असे आभासी चित्र रंगवण्यात भाजपला मोठे यश मिळाले. मात्र प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. युती खूप मागे गेली आणि आघाडी अपेक्षेपेक्षा पुढे गेली. फक्त हवेतला प्रचार कामी येत नाही, लक्ष सातत्याने जमिनीवरच असावे लागते; लोकांच्या पोटापाण्याचा, त्यांच्या जगण्यामरण्याचा प्रश्न महत्त्वाचा असतो, हा संदेश या निकालांनी दिला. सत्तेवर येणारे सरकार हा संदेश समजून घेईल, अशी आशा करूया!


इतर अॅग्रो विशेष
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...