निर्यातवृद्धीचे शुभसंकेत

मागच्या वर्षी पहिल्यांदाच जहाजाने युरोपला आंबा निर्यातीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. जहाजाने आंबा निर्यातीस विमानाच्या तुलनेत ७० ते ८० टक्के कमी खर्च येतो. राज्याच्या अशा उपक्रमांना केंद्र सरकारनेदेखील चालना द्यायला हवी.
agrowon editorial
agrowon editorial

पावसाळ्यानंतरही सातत्याचे ढगाळ हवामान आणि अधूनमधून होणाऱ्या   अवकाळी पावसाने इतर फळपिकांबरोबर आंब्यालाही चांगलाच फटका बसला. बदलत्या हवामानाने मोहोर प्रक्रियेत आलेली बाधा आणि रोग-किडींचे आक्रमण यामुळे आंबा हंगाम लाबण्याबरोबर उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यातच लांबणाऱ्या हंगामामुळे बाजारपेठेत एकाचवेळी आंब्याची आवक वाढून त्याच्या दरावरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. असे असले तरी आंबा उत्पादनाच्या तुलनेत निर्यात मुळातच खूपच कमी होत असल्यामुळे निर्यातीवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. उलट मागील काही वर्षांपासून आंबा निर्यातीच्या बाबतीत नवनवे देश शोधून तेथे यशस्वीपणे निर्यात सुरू करण्यास पणन मंडळाला यश येत आहे. जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडनंतर या वर्षी अर्जेंटिना देशाची नवीनच बाजारपेठ आंबा उत्पादकांना उपलब्ध होणार असून, एकंदरीतच आंबा निर्यातवृद्धीसाठी हा शुभसंकेत मानला  जातोय.  

आंबाच नाही; तर इतर कोणत्याही शेतमालाची प्रामुख्याने निर्यात शेजारील देश; तसेच मध्य पूर्व (इराण, इराक, कुवैत, कतार, सौदी अरेबिया) देशांत होते. या देशांसाठी निर्यातीसाठीचे निकष फारसे कडक नाहीत. त्यामुळे या देशांना आपली निर्यात सुरू राहते; परंतु दर आणि आयातीबाबतदेखील या देशांकडून फारशी शाश्वती मिळत नाही. अमेरिकेसह युरोपियन देशांत शेतमाल निर्यातीसाठी निकष कठीण आहेत; परंतु हे देश शाश्वत निर्यात आणि दर्जानुसार अधिक दराची हमी देतात. त्यामुळे या देशांतील निर्यातवृद्धी ही आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरते.

विकसित देशांना आंबा निर्यातीकरिता क्रमप्राप्त असलेली मॅंगोनेट नोंदणी कृषी विभागाद्वारे करण्यात येते. कृषी व पणन विभागांमार्फत प्रशिक्षण कार्यक्रम, शेतीशाळा अशा उपक्रमांतून शेतकऱ्यांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. आजअखेर सात हजार ८००हून अधिक आंबा उत्पादकांनी मॅंगोनेटअंतर्गत नोंदणी केलेली आहे. हापूस आंब्याला वर्षभरापूर्वी ‘जीआय’ मिळाले असून, त्याअंतर्गतही साडे तीनशेहून अधिक आंबा उत्पादकांची नोंदणी झालेली आहे. याचबरोबर कृषी पणन मंडळाद्वारे आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्राची उभारणी करून त्याद्वारेही निर्यातवृद्धीसाठी चालना देण्याचा प्रयत्न आहे. आंब्यासाठी सर्वांत जास्त निर्यात सुविधा राज्यामध्ये उपलब्ध असल्याने राज्यातील आंबा निर्यातीस चांगलाच वाव आहे.  

मागच्या वर्षी पहिल्यांदाच जहाजाने युरोपला आंबा निर्यातीचा प्रयोग यशस्वी झाला. जहाजाने आंबा निर्यातीस विमानाच्या तुलनेत ७० ते ८० टक्के कमी खर्च येतो. राज्याच्या अशा उपक्रमांना केंद्र सरकारनेदेखील चालना द्यायला हवी. आपल्या शेजारील पाकिस्तानमध्येही चांगल्या आंब्याच्या जाती आहेत. पाकिस्तानमध्ये आंबा निर्यातीस ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. त्यामुळे पाकिस्तानमधील शेतकरी, निर्यातदारांना आंबा निर्यात स्वस्त पडते. असे अनुदान आपल्या देशाने दिल्यास आंबा निर्यात तर वाढेलच; मात्र त्याचा थेट फायदा उत्पादक, निर्यातदारांना होईल. लॅटिन अमेरिका, मेक्सिको; तसेच दक्षिण आशियातील काही देश जागतिक बाजारात आंबा पाठवितात; परंतु या देशांतील आंब्याचा दर्जा भारतापेक्षा फारच कमी असल्याने हे देश जेथे आंबा पाठवितात त्या बाजारपेठा आपल्याला काबीज करण्याची संधी आहे. मात्र, याकरिता अपेडा, पणन मंडळ, केंद्र-राज्य सरकारचे निर्यातसंबंधी विविध विभाग या सर्वांनी प्रयत्न वाढवायला पाहिजेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com