‘अढी’ला पिकलाय आंबा

फळे पिकवून विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचे बाजार समितीमध्ये केवळ गाळे असून चालणार नाहीत, तर त्यांचे रायपनिंग चेंबर्स पण असले पाहिजेत, अशी भूमिका बाजार समित्यांनी घ्यायला हवी.
agrowon editorial
agrowon editorial

पूर्वी एक आंबा पाडाला आला की त्या झाडावरील संपूर्ण फळांची काढणी करून अढी लावून ते पिकविले जात असत. आंब्याची अढी लावणे म्हणजे पक्व आंबे काढून एका बंद खोलीमध्ये विशिष्ट पद्धतीने रचून ते भाताचे तणस, भुईमुगाचे काड अथवा टेंभरीच्या पानांमध्ये पिकविण्यासाठी ठेवणे. नैसर्गिकरीत्या पिकविलेल्या अशा आंब्यांना चव, रंग, वास चांगला येतो. आता मात्र आंबे पिकविण्याची ही पद्धत मागे पडत आहे. परंतु अजूनही आदिवासी बहुल भागात अथवा काही गाव पाड्यांमध्ये अशा पद्धतीने आंबे पिकविले जातात. नाशिक जिल्ह्यातील एका आदिवासी पाड्यावर अढी लावून आंबे पिकवीत असल्याचे छायाचित्र ‘ॲग्रोवन’मध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले होते.

अढीमध्ये आंबे नैसर्गिकरीत्या पिकविली जात असली, तरी फळे पिकण्यास उशीर लागणे, काही फळे जास्त पिकून नुकसान होणे, अशा त्यास मर्यादा आहेत. पूर्वी प्रामुख्याने स्थानिक बाजारातच आंब्यांची विक्री होत असल्याने अशी पद्धत वापरली जात असे. आता मात्र अनेक शेतकरी व्यावसायिक पद्धतीने आंब्याची लागवड करीत आहेत. अशा बागा फळे काढणीपूर्वीच व्यापाऱ्यांना विकल्या जात आहेत. बाजारपेठेतही खूप मोठे बदल झाले आहेत. व्यापाऱ्यांतर्फे देशांतर्गत दूरच्या बाजारपेठेत आंबे पाठविली जात असून. निर्यातही वाढली आहे. अशावेळी झाडावरची फळे पक्व होईपर्यंत तसेच ती अढीमध्ये सातआठ दिवस पिकेपर्यंत वाट पाहण्याइतका वेळ कुणाकडेच नाही. त्यामुळे अनेक व्यापारी अपरिपक्व फळांचीच काढणी करतात. अशी फळे कॅल्शिअम कार्बाईडचा अनियंत्रित वापर करून (पुडी लावून) अशास्त्रीय, असुरक्षित पद्धतीने पिकवीत आहेत. पुडी लावल्याने फळे लवकर पिकतात. परंतु अशी फळे चवहीन असतात. मुख्य म्हणजे अशा फळांचे सेवन मानवी आरोग्यास घातक ठरत आहे.

फळे पिकविण्यासाठी कॅल्शिअम कार्बाईडच्या अनियंत्रित वापर आणि त्याचे आरोग्यावरील गंभीर दुष्परिणाम लक्षात घेता त्यावर फार पूर्वीच बंदी घातली आहे. कॅल्शिअम कार्बाईडवरील बंदीनंतर आंबा, केळीसह इतरही फळे पिकवायची कशी, अशी समस्या निर्माण झाली होती. त्या वेळी फळे पिकविण्यासाठी इथेलीन गॅसच्या वापरास परवानगी देण्यात आली. असे असले तरी आजही फळे पिकविण्यासाठी सर्रासपणे बंदी असलेल्या कॅल्शिअम कार्बाईडचा वापर होतो, हे वास्तव आहे. कॅल्शिअम कार्बाईडच्या वापराबाबत ‘एफडीए’ने (अन्न व औषध प्रशासन) प्रतिबंधात्मक काम केले पाहिजेत. कुठून तरी याच्या वापराबाबतची तक्रार आल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यापेक्षा आधीच धाडी टाकून या घातक रसायनाचा वापर थांबवायला हवा. हे करीत असताना फळे पिकविण्यासाठी गॅस अथवा द्रवरूपातील इथेलीनचा वापरही ठरावीक प्रमाणातच होतो, हे पाहायला हवे.

काही व्यापारी अथवा पणन मंडळाचे इथेलीन गॅसवर आधारित रायपनिंग चेंबर्स आहेत. परंतु याचे प्रमाण फारच कमी आहे. आंबा असो की केळी यांचे उत्पादन ज्या भागात अधिक होते, त्या भागात रायपनिंग चेंबर्स करून चालणार नाहीत, तर या फळांची मोठ्या प्रमाणात विक्री ज्या भागात होते, त्या भागात रायपनिंग चेंबर्स करायला पाहिजेत. त्याकरिता संबंधित विभागांतील बाजार समित्यांनी पुढाकार घ्यायला हवा. महत्त्वाचे म्हणजे आंबा, केळी, पपई अशी फळे पिकवून विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचे बाजार समितीमध्ये केवळ गाळे असून, चालणार नाही तर त्यांचे छोटे-मोठे रायपनिंग चेंबर्स असले पाहिजेत, अशी भूमिका बाजार समित्यांनी घ्यायला हवी. असे झाले तरच आकर्षक दिसणाऱ्या फळांची खऱ्या अर्थाने गोडी वाढलेली असेल आणि ते खाणाऱ्या ग्राहकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com