शुभवार्तांकनावर शिक्कामोर्तब

मागील चार वर्षांपासून देशात सरासरी पावसाचा अंदाज वर्तविला जातोय. त्यात दोन-चार टक्क्यांच्या कमी-अधिक फरकाने तो पडतही आहे. असे असतानासुद्धा दरवर्षी आपल्याला पावसाचे दुर्भिक्ष जाणवतेय.
संपादकीय
संपादकीय

अर्धा देश दुष्काळाने आपल्या कवेत घेतला आहे. राज्यातही दुष्काळाच्या झळा वाढत आहेत. उन्हाचे चटके आणि वाढलेला उकाडा सर्वांनाच असह्य होतोय. अशा वेळी आगामी मॉन्सून कसा असेल, या विचारचक्रात सर्व जण असताना स्कायमेट या खासगी हवामान सर्वेक्षण संस्थेने देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवून चिंतेत टाकले होते. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) या वर्षीच्या प्राथमिक अंदाजाने मात्र सर्वांची चिंता दूर केली आहे. देशात या वर्षी चांगला पाऊस तर पडणारच आहे; परंतु त्याचे सर्वत्र समान वितरण असेल, असे शुभवार्तांकन आयएमडीने केले आहे. शेतकरी असो की शहरी नागरिक प्रत्येकाला पाऊस हवाहवासा वाटतो. पाऊस कोसळण्याबद्दलच्या अपेक्षा मात्रा सर्वांचा वेगळ्या आहेत. त्यामुळे पाऊस कसाही पडला तरी सर्वांचे समाधान तो करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

मॉन्सूनवर केवळ शेतीच नाही तर देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून आहे. देशातील ५४ टक्के तर राज्यातील ८२ टक्के जिरायती शेती क्षेत्र हे पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मॉन्सूनचा पाऊस चांगला पडला नाही तर बागायती शेतीही धोक्यात येते, हे या वर्षीच्या तसेच मागील दुष्काळातही सिद्ध झाले आहे. चांगला पाऊस म्हणजे खरीप, रब्बी या दोन्ही हंगामात पेरणीखालील क्षेत्रात वाढ, अन्नधान्यांपासून ते नगदी पिकांच्या लागवडीत समतोल आणि एकंदरीतच उत्पादन वाढ असे आशादायक चित्र निर्माण होते. देशातील कृषी निविष्ठांचा बाजार फुलतो. शेतीचे उत्पादन वाढले म्हणजे सर्वसामान्यांच्या हाती पैसा येतो. साखर, कापड असे अनेक शेतीआधारित उद्योग-व्यवसाय भरभराटीला येतात. सर्वसामान्य वर्गाच्या हाती पैसा म्हणजे सेवा आणि वस्तूंच्या बाजारामध्ये चैतन्यमय वातावरण पसरते. एकंदरीतच बाजार व्यवस्थेला चालना मिळते. त्यामुळेच केवळ चांगल्या पावसाच्या अंदाजाने अनेकदा शेअर मार्कटने उसळी घेतली आहे. एवढे महत्त्व भारतीय मॉन्सूनला आहे.

मागील चार वर्षांपासून देशात सरासरी पावसाचा अंदाज वर्तविला जातोय. त्यात दोन-चार टक्केच्या कमी-अधिक फरकाने तो पडतही आहे. असे असतानासुद्धा दरवर्षी आपल्याला पावसाचे दुर्भिक्ष जाणवतेय. या वर्षी देखील सरासरीइतक्या आणि समान वितरणाचा अंदाज असला तरी पावसाला देशव्याप्तीसाठी दीड महिन्याचा (१ जून ते १५ जुलै) कालावधी लागतो. आपल्या देशात प्रदेशनिहाय भौगोलिक रचनेतही खूपच भिन्नता आहे. भौगोलिक रचनेबरोबर अनेक स्थानिक घटकही पडणाऱ्या पावसाला प्रभावित करीत असतात. त्यामुळे प्रदेशनिहाय पाऊस कमी-अधिक पडतो. राज्यात तर मॉन्सूनच्या सरासरी पर्जन्यमानातही फारच विविधता आढळून येते. कोकणात धो-धो पाऊस पडतो. सह्याद्रीचा पूर्व भाग पर्जन्यछायेत मोडत असून तेथे पावसाचे प्रमाण कमी असते. विदर्भात पावसाचा जोर वाढत असला तरी मराठवाडा नैसर्गिकरीत्या कमी पावासाचा प्रदेश आहे. त्यामुळे या सर्व विभागांने सरासरीचा एकच अर्थ घेऊन बसता येत नाही. हवामानबदलाच्या सध्याच्या काळात अंदाज काही असला तरी मॉन्सूनची वाटचाल आपल्या गरजेनुसार होत नाही. तशी अपेक्षा करणे सुद्धा व्यर्थ आहे. त्यामुळे पडणाऱ्या पावसाशी जुळवून घेणेच आपल्याला शिकावे लागेल. मॉन्सूनपासून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा अधिकाधिक वापर कसा करुन घेता येईल, हे पाहावे लागेल. विशेष म्हणजे दरवर्षी विपरित मॉन्सूनमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर मात करण्याचे तंत्र अवगत केल्याशिवाय आपल्याला आता गत्यंतर नाही, हेही लक्षात घ्यायला हवे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com