agriculture news in marathi agrowon agralekh on mechanization of cotton farming in india | Agrowon

कापूस शेतीत राबावा ‘रोबोट’

विजय सुकळकर
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

कापसात लागवड ते वेचणीपर्यंतची कामे यंत्राने अथवा यंत्रमानवाकडून झाली, तर उत्पादकांसाठी हे फारच दिलासादायक ठरू शकते. 
 

आपल्या देशात कापूस लागवडीखाली १३० लाख हेक्टर क्षेत्र आहे. शेतीमाल उत्पादनांवर आधारित देशातील सर्वांत मोठा उद्योग म्हणून कापड उद्योगाकडे पाहिले जाते. महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील शेतकऱ्यांचे कापूस हेच मुख्य नगदी पीक आहे. असे असताना आज देशातील कापूस उत्पादक इतर पिकांच्या तुलनेत सर्वांत अडचणीत आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. कापूस उत्पादन घेणे हे खर्चीक नाही तर अधिक कष्टदायक काम देखील आहे. त्यामुळेच कधी कापसावर फवारणी करताना शेतकऱ्यांचा मृत्यू होतो, तर कधी कापसाची शेती तोट्याची ठरत असल्याने उत्पादक आत्महत्या करतात. कापूस उत्पादकांचा मृत्यू असो की आत्महत्या यामागचे कारण नीट तपासून पाहिले, तर यांत्रिकीकरणाच्या बाबतीत सर्वाधिक दुर्लक्षित कापसाचे पीक राहिले असल्याचे दिसून येते.

भात, गहू, ज्वारी, सोयाबीन या धान्य पिकांबरोबर उसाच्या शेतीतही पेरणी-लागवड, आंतरमशागत, फवारणी, काढणी-मळणी अशी कामे आता यंत्राने होत आहेत. मशागतीची बहुतांश कामेही ट्रॅक्टरचलित यंत्रानेच केली जात आहेत. अशावेळी कापसाची टोकण, आंतरमशागत, फवारणी आणि वेचणी अशी सर्वच कामे मजुरांच्या साह्यानेच करावी लागतात. या कामांच्या ऐन हंगामात मजुरांची गरज जास्त असते. मजूर गरजेप्रमाणे वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे कापूस शेतीतील कामे खोळंबतात. मग अव्वाच्या सव्वा मजुरी देऊन कामे करून घ्यावी लागतात. यात कापसाचा उत्पादन खर्च वाढतो. 

कापसाच्या यांत्रिकीकरणाबाबत (खासकरून वेचणी) नागपूर येथील ‘सीआयसीआर’च्या साह्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे थोडेफार काम झाले. परंतु ते अनेक कारणांनी अपूर्ण राहिले आहे. त्याचा उत्पादकांना काहीही फायदा झालेला नाही. अशावेळी कापूस पिकात विविध कामे करणारा यंत्रमानव (रोबोट) निर्मिती संदर्भात ठाण्यातील एक कंपनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासोबत काम करीत असेल, तर ही बाब निश्चितच चांगली म्हणावी लागेल. परंतु सध्या तरी त्यांचे हे काम अगदीच प्राथमिक अवस्थेत आहे. यंत्रमानव तयार असला तरी कापसातील विविध प्रात्यक्षिकांची कामे अजून बाकी आहेत. औद्योगिक यंत्रमानव बनविणे, त्याच्याकडून कामे करून घेणे हे सोपे आहे. परंतु प्रत्यक्ष कापसाच्या शेतात यंत्रमानवाकडून कामे करून घेताना अनेक अडचणी येणार आहेत. प्रात्यक्षिकावेळी प्रत्येक कामात येणाऱ्या अडचणी सुधारत पुढे गेल्यास यश पदरी पडणार आहे.

यंत्रमानवाकडून कापसाची टोकण झाली तर ती ठरावीक अंतरावर होईल. एकसमान टोकन झाल्याने एकरी झाडांची संख्या योग्य राखली जाईल. कापसातील तण नियंत्रण हे किचकट, कठीण काम. योग्य वेळी कापसातील तण नियंत्रण होऊ न शकल्याने अनेक शेतकऱ्यांना कमी उत्पादन मिळते. यंत्रमानवाने हे काम सोपे होईल. कापसातील फवारणी ही तर अलीकडे फारच धोकादायक ठरतेय. तीन-चार वर्षांपूर्वी आपल्या राज्यात कापसात फवारणी करताना विषबाधा होऊन शंभरहून अधिक शेतकरी-शेतमजुरांना आपले प्राण गमवावे लागले होते. यंत्रमानव कापसात जाऊन अगदी सुरक्षित फवारणी करू शकतो. मजूरटंचाईच्या सध्याच्या काळात कापसाची वेचणी कष्टदायक आणि फारच खर्चीक ठरत आहे. यंत्रमानव कमी खर्चात, कमी वेळेत कापसाची वेचणी करू शकतो. थोडक्यात, कापसात लागवड ते वेचणीपर्यंतची सर्व कामे यंत्राने अथवा यंत्रमानवाकडून झाली तर उत्पादकांसाठी हे फारच दिलासादायक ठरू शकते. महत्त्वाचे म्हणजे यंत्रमानवाच्या वापराने कापसाचा उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना हे पीक आर्थिकदृष्ट्या किफायतशीरही ठरू शकते.


इतर संपादकीय
हा तर मत्स्य दुष्काळाच! जगातील आघाडीच्या ‘ब्लू इकॉनॉमी’मध्ये भारताचा...
तो’ आला, ‘त्याने’ राज्यही व्यापले मागील वर्षी भारतीय हवामानशास्त्र विभागाने...
बेरोजगारीची लाट थोपवागेल्या वर्षी कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्यानंतर...
‘अढी’ला पिकलाय आंबापूर्वी एक आंबा पाडाला आला की त्या झाडावरील...
उत्पन्नवाढीसाठी‘हिरवे सोने’  जगामध्ये १९७४ पासून ५ जून हा जागतिक...
इथेनॉलला प्रोत्साहन  सर्वांच्याच हिताचे  केंद्र सरकारने इंधनावरील आपले अवलंबित्व कमी...
समृद्धीचा मार्ग स्वतःच शोधायेत्या खरीप हंगामात चांगला पाऊस पडेल, भरघोस पीक...
तक्रार निवारणाची  योग्य प्रक्रिया  चालू खरीप हंगामात महाराष्ट्रातील ...
‘खतवापर क्रांती’च्या दिशेने एक पाऊल  ‘इफ्को’ने (इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-...
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणारी धोरणे... ग्रामीण भागात कोरोना विषाणूचे थैमान चालू आहे....
तिढा शिल्लक साखरेचा!  दिवाळीनंतर उन्हाळ्यातील लग्नसमारंभ, धार्मिक...
वेगान दूध -  गाईम्हशींच्या दुधाची जागा...‘वेगान’ हा शब्दच मुळात व्हेजिटेरियन (Vegetarian)...
शेती प्रगती अन्  धोरण विसंगती चार दिवसांपूर्वीच केंद्रीय कृषी मंत्रालयाचा २०२०-...
एक पाऊल मुस्कटदाबीच्या दिशेने मोदी-२.० राजवटीला दोन वर्षे पूर्ण झाली. ...
खरीप पिकांचे  हमीभाव कधी कळणार?  कोणत्याही कंपनी उत्पादनांचे दर उत्पादनासाठीचा...
पेच हळद विक्रीचा! कोरोना विषाणूला प्रतिबंधात्मक तसेच लागण झाल्यावर...
एक उपेक्षित  फ्रंटलाइन योद्धा! कोरोनाची दुसरी लाट आली. वर्षभर गढूळ झालेले...
फटका वादळाचा अन् चुकीच्या निकषांचा!  मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या नैसर्गिक...
पीककर्जाचे वाटप  वेळेवरच करा .  मॉन्सून २२ मेला अंदमानात दाखल झाला असून...
जमिनीची सुपीकता आणि  खतांची कार्यक्षमता...शेती उत्पादन, शेतकऱ्‍यांना मिळणारा फायदा,...