गंध फुलांचा गेला सांगून 

मोहफुलांमध्ये सर्वाधिक प्रोटिन्स असल्याचे कृषितज्ज्ञांचे मत आहे. मोहफुलांसह पाने, खोड, फळे आणि बिया या सर्वांचा उपयोग आदिवासी बांधव आपल्या दैनंदिन जीवनात करतात.
agrowon editorial
agrowon editorial

मोहफुले म्हटले की आपल्याला केवळ दारूच आठवते. परंतु मोहफुलात मानवी पोषणमूल्ययुक्त अनेक घटक सामावलेले आहेत. मोहफुलांचे झाड हे आदिवासी लोकांसाठी कल्पवृक्षच आहे. या वृक्षाची फुले, पाने, खोड, फळे आणि बिया या सर्वांचा उपयोग आदिवासी बांधव आपल्या दैनंदिन जीवनात करतात. मोहफुलांपासून आदिवासी बांधव बनवीत असलेले पारंपरिक पेय अनेक प्रकारच्या आजारांवरचे औषध म्हणून वापरले जाते. परंतु मोहफुलांपासून दारूही होते. शहरी मानसिकतेला मोहफुले वेचणारे आदिवासी बांधव दिसले, की दारू पिऊन तारवटलेली माणसेच दिसतात. याच मानसिकतेतून राज्य सरकारने दारूबंदी कायद्यानुसार मोहफुलांवर बंदी आणली होती. या बंदीमुळे एकंदरीतच मोहफुलांच्या मूल्यवर्धनास चांगलीच खीळ बसली आहे. आदिवासी बांधवांच्या उत्पन्नावर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे, यातील जाणकारांनी हे राज्य सरकारच्या वेळोवेळी लक्षात आणून दिले. त्याच्या अभ्यासासाठी एक समितीदेखील नेमली होती. या समितीच्या शिफारशीनुसार उद्धव ठाकरे सरकारने मोहफुलांवरील दारूबंदी कायद्याचे निर्बंध हटविले आहेत. या निर्णयामुळे मोहफुले गोळा करणे, त्याची साठवणूक, खरेदी-विक्री, वाहतूक यासाठी आता परवान्याची आवश्यकता लागणार नाही. 

मोहाची फुले आदिवासींसाठी अंतिम अन्नसुरक्षा आहे. पराकोटीची अन्नटंचाई असलेल्या दुष्काळात काहीही उपलब्ध नसताना केवळ मोहफुलांच्या भाकरी खाऊन आदिवासी समाज जगला. साखर-गूळ या समाजास सहज उपलब्ध नव्हता, तेव्हा मोहाची राब काकवीसारखी वापरून गोडाचे पदार्थ केले जात. बाळंतपणात शरीराची झीज भरून निघण्यासाठी आईला मोहाची राब देतात. लहान मुलांनाही मोहाची फुले शक्तिवर्धक म्हणून दिली जातात. मोहफुलांमध्ये सर्वाधिक प्रोटिन्स असल्याचे कृषितज्ज्ञांचे मत आहे. मोहफुलाच्या राबेपासून मुरमुऱ्याचे पोष्टिक लाडूही तयार करतात. मोहाच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण ५० टक्के इतके असते. या तेलात सॅपोनीनचे प्रमाण असल्यामुळे ते अखाद्य तेलाच्या यादीत येते. आदिवासी समाज पारंपरिक ज्ञानाने काही विशिष्ट प्रक्रियेमार्फत हे विषारी घटक काढून या तेलाचा उपयोग खाद्यतेल म्हणूनही करतात. मोहाचे तेल त्वचेसाठी औषधी आहे. मोहाचे फूल हे जनावरांसाठी उच्च कॅलरी, उच्च प्रथिनयुक्त खुराक आहे. विशेषत: गाभण गायींना व नांगरट, पेरणीच्या काळात बैलांना मोहाची फुले खाद्य म्हणून दिली जातात. 

मोहफुलांवरील निर्बंध हटल्याने या आणि अशा अनेक मोहफुलांच्या प्रक्रिया उद्योगाला आता राज्यात चालना मिळायला हवी. पूर्व विदर्भातील वनक्षेत्र, तसेच इतर ठिकाणच्या जंगलात मोहफुले भरपूर प्रमाणात आढळतात. विदर्भ, मराठवाड्यात शेताचे बांध, नदीनाल्यांकाठी मोहाची झाडे आहेत. आदिवासी बांधवांसह शेतकऱ्यांनी सुद्धा मोहफुलांकडे एक उत्पन्नाचे साधन म्हणून पाहायला पाहिजेत. मोहफुलातील प्रथिने व उच्च उष्मांक यांचा उपयोग आदिवासी भागातील आश्रमशाळा, अंगणवाड्यांमध्ये मुलांना पोषक आहारासाठी केला जाऊ शकतो. यासाठी त्या भागातील महिला बचत गटांचा सहयोग घेता येईल. मोहाच्या उत्पादनांना सरकारी संस्था पुरस्कृत उद्योगाची जोड मिळण्याची गरज आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था यात मोठी भूमिका घेऊ शकते. मोहफुलांचे मूल्यवर्धन करून त्याचा आदिवासी बांधवांना अधिक लाभ देण्यासाठी आदिवासी विकास आणि वन विभागांनी आता एकत्रित काम करायला हवे. यामध्ये कौशल्यविकास प्रशिक्षण, जाळे लावून आधुनिक पद्धतीने मोहफुलांचे संकलन, शास्त्रीय पद्धतीने साठवणूक, कोल्ड स्टोअरेज उभारणी, ‘वनधन-जनधन शॉप’च्या माध्यमातून मोहफुलांच्या मूल्यवर्धित उप-उत्पादनांची विक्री आदी विविध बाबींवर एकत्रितपणे आराखडा तयार करून तो प्रत्यक्ष कृतीत उतरले हे पाहावे. राज्यात मोहफुलांच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी संकलन, साठवणुकीबरोबर रास्त दराचा आधार तसेच खरेदी-विक्रीच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायला हवा. मोहफुलांच्या दारूशिवाय इतर प्रक्रियेबाबत प्रबोधन वाढवायला पाहिजेत. असे झाले तर निर्बंध हटविल्याचा हेतू साध्य होऊन रानोमाळ दरवळणारा मोहफुलांचा गंध आता आदिवासी बांधवांच्या जीवनातही दरवळेल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com