agriculture news in marathi agrowon agralekh on monsoon long term prediction of IMD | Page 2 ||| Agrowon

पावसाची शूभ वार्ता; पण...

विजय सुकळकर
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

यावर्षी कोरोना लॉकडाउनमुळे प्रदुषण बरेच कमी झाले आहे. त्यामुळे देखील पाऊस वेळेवर दाखल होऊन तो चांगला बरसेल, असे मत हवामान आणि पर्यावरणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. ही यावर्षीच्या मॉन्सूनबाबत एक नवीनच सकारात्मक बाब म्हणावी लागेल.
 

मागील काही महिन्यांपासून कोरोना अन् अवकाळी पाऊस या दोनच बाबींची चर्चा सुरु आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शहरी आणि ग्रामीण भागात भितीचे वातावरण आहे. तर शेतकऱ्यांना कोरोनाच्या फटक्याबरोबर अवकाळी पाऊस-गारपीटीचा मारही बसत आहे. राज्याच्या बऱ्याच भागात पूर्वमोसमी पावसास पोषक वातावरण असून अधून मधून होणाऱ्या पावसाने रब्बी - उन्हाळी पिके तसेच फळे-भाजीपाल्याचे नुकसान होतेय. जानेवारी पासून सातत्याने कुठे ना कुठे अवकाळी पाऊस पडत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तापमान कमीच होते. त्यामुळे यावर्षीच्या मॉन्सूनबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. ज्यावर्षी कडक उन्हाळा नाही, त्यावर्षी पाऊसमान कमीच असतो, असे शेतकऱ्यांचे सर्वसाधारण अनुमान असते. यास शेतकऱ्यांच्या दांडग्या अनुभवाबरोबर शास्त्रीय आधार देखील आहे. त्यातच एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यातील अनेक भागात तापमान ४० अंश सेल्शिअसच्या वर गेले असून काही ठिकाणी तर ४५ अंश सेल्शिअसच्या जवळ पोचले आहे. लॉकडाउनच्या फटक्यात उन्हाचा चांगला चटकाही बसतोय. कोरोना लॉकडाउन, अवकाळी करीत असलेली अवकळा अशा निराशाजनक वातावरणात आगामी मॉन्सूनबाबत एक शूभ वार्ता आलेली आहे. यावर्षीचा मॉन्सून सर्वसाधारण म्हणजे १०० टक्के बरसणार, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह शेतीशी संबंधित सर्वच घटकांमध्ये दिलासादायक वातावरण आहे.

नुकताच वर्तविण्यात आलेला हवामान अंदाज हा जून ते सप्टेंबर असा लांब पल्ल्याचा असून संपूर्ण देशासाठीचा आहे. महत्वाचे म्हणजे ३३ टक्के क्षेत्र कमी पावसाचे अन् उर्वरित ६७ टक्के क्षेत्र सरासरी एवढ्या किंवा त्यापेक्षा अधिक पावसाचे आहे. परंतू पाऊस नेमका कमी कुठे आणि अधिक कुठे पडणार, याबाबत काहीही स्पष्टता नाही. त्यामुळे यावर्षी सरसकट सगळीकडे चांगला पाऊस आहे, असे समजू नये. अन्यथा मॉन्सूनपर्यंत शेतकरी आनंदात राहतो, मॉन्सून काळात अनेक भागांत पाऊस चकवा देत राहतो, त्यात शेतीचे नुकसान होत जाते, हे लक्षात घ्यावे लागेल. पुढील काळात पाऊस नेमका कमी कुठे पडेल आणि अधिक कुठे असेल, कुठली धरणे भरतील, कुठली भरणार नाहीत, अशी या मॉन्सूनच्या अंदाजाची खोली तपासत जावे लागेल. त्यानुसार शेतीसाठीचे नियोजन शासन आणि शेतकरी पातळीवर करावे लागेल. या शिवाय हवामान विभागाकडून अल्पकालीन अंदाज अधिक स्पष्टपणे यायला हवेत. भारतासह जगभरातील बहुतांश देशांत लॉकडाउन सुरु आहे. वाहने बंद आहेत, कारखानेही बंद आहेत. वातावरणात कार्बन डायऑक्साईड वायूचा प्रभाव असणार नाही. प्रदुषण बरेच कमी झाले आहे. त्यामुळे देखील यावर्षी पाऊस वेळेवर दाखल होऊन तो चांगला बरसेल, असे मत हवामान आणि पर्यावरणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. ही यावर्षीच्या मॉन्सूनबाबत एक नवीनच सकारात्मक बाब म्हणावी लागेल. मागील काही वर्षापासून आपणांस प्रदुषणामुळे झालेल्या हवामान बदलाचे चटके बसताहेत. यावर्षी प्रदुषण कमी झाल्याने त्याचा बदलत्या हवामानावर नेमका काय परिणाम होणार, याचाही बारकाईने अभ्यास व्हायला हवा. मागचे वर्ष हे सरासरीपेक्षा अधिक पावसाचे होते. परंतू त्याच्या असमान वितरणाने खरीप तसेच रब्बी हंगामांची झालेली मोठी हानी सर्वांसमोर आहे. याचाही गांभिर्याने विचार व्हायला हवा.
.........................................


इतर संपादकीय
बांधावरच्या तरुणाईला गरज स्व-संवादाची!अभिनेता सुशांतसिंह राजपूतने नुकताच टोकाचा निर्णय...
आरोग्य निर्भरतेसाठी पशुधन गाळतेय ‘लाळ’ राज्यात पशुरोग निर्मूलन करण्यासाठी लसीकरणाचा...
राजर्षींचे आपत्ती व्यवस्थापन कौशल्य दोन एप्रिल १८९४ रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर...
आपत्ती शिकविते नियोजनप्रभावी विस्तार शिक्षण यंत्रणा नसल्याने शाश्वत...
सडेवाडीचा आदर्शया वर्षी चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने...
शेतकऱ्यांना हवी थेट आर्थिक मदतकोरोना विषाणू चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेमधून...
दुबार पेरणीस शेतकऱ्यांना उभे करा राज्यातील खरीप हंगामातील महत्त्वाचे नगदी पीक...
श्रमाचा बांध  ऐन पावसाळ्यात चांगला पाऊस पडल्यानंतर...
पर्यटन पंढरीचा ‘निसर्ग’  निसर्ग आणि कोकण यांचे अतिशय जवळचे नाते आहे....
सुधारित तंत्रा’चा सरळ मार्ग  आपल्या देशात एचटीबीटी कापूस, बीटी वांगे, जीएम (...