मागोवा मॉन्सूनचा

यावर्षी पावसाने सरासरी ओलांडली असली तरी शेतीसाठी उपयुक्त असा पाऊस फारसा लाभलाच नाही, असे म्हणणे अतिशोयक्ती ठरणार नाही.
संपादकीय.
संपादकीय.

देशात यावर्षी सरासरीच्या ९६ टक्के पावसाबरोबर त्याच्या सर्वसमान वितरणाचे पूर्वानुमान हवामान विभागाने वर्तविले होते. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळ्याच्या काळात हवामान विभागाच्या पूर्वानुमानापेक्षा अधिक म्हणजे ११० टक्के पावसाची नोंद झाली आहे. देशपातळीवर मागील २५ वर्षांत एवढा पाऊस झाला नाही. राज्यातही सरासरीच्या ३२ टक्के अधिक पाऊस यावर्षी बरसला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात चांगला तर मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांच्या दुष्काळी पट्ट्यात आजही सरासरीच्या कमीच पाऊस आहे. राज्यात आणि देशपातळीवर पडणाऱ्या पावसानुसार शेतीच्या कामांचे एक ठरावीक वेळापत्रक आहे. वेळच्या वेळी पाऊस पडला नाही तर हे वेळापत्रक कोलमडून पिकांचे नुकसानच अधिक होते. तसे यावर्षीच्या पावसाने केले आहे.

मॉन्सूनचा पाऊस शांत, हलका, रिमझिम पडत असतो. संथ पावसाचे पाणी जमिनीत अधिक मुरते. असा पाऊसच शेतीसाठी उपयुक्त असतो. यावर्षी पावसाने सरासरी ओलांडली असली तरी शेतीसाठी उपयुक्त असा पाऊस फारसा लाभला नाही, असे म्हणणे अतिशोयक्ती ठरणार नाही. 

वळवाचा पाऊस यावर्षी पडलाच नाही. पेरणीपूर्वीच्या मशागतीसाठी हा पाऊस उपयुक्त असतो. परंतु, वळवाच्या पावसाने दांडी मारल्याने मशागतीची कामे राज्यात खोळंबली होती. त्यानंतर मॉन्सूनचे राज्यात उशिरा आगमन झाले. आगमनानंतरही त्यात मोठा खंड पडला. जून, जुलै या दोन महिन्यांत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील भाग सोडला तर उर्वरित राज्यात सरासरीच्या ५० टक्के कमी पाऊस होता. पावसाळ्याच्या सुरवातीच्या दोन महिन्यांतील अशा प्रकारच्या पावसाने अनेक भागांतील पेरण्यांना उशीर झाला. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकटही ओढविले. वाढीच्या काळात पावसाच्या ताणाचा मोठा फटका खरीप पिकांना बसला. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत पावसाने दमदार हजेरी लावली. परंतु, अल्पकाळात धो-धो पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील बहुतांश भागात पुराने थैमान घालून खरीप पिकांचे अतोनात नुकसानच केले.

यंदा उशिरा आगमन झालेल्या मॉन्सूनचा परतीचा प्रवासही उशिराच सुरू होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यातच ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील विविध भागांत वादळी पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. हा पाऊस ऊस, चारा पिके यांसह रब्बी पिकांना उपयुक्त मानला जात असला तरी त्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान संभवते. हवामान विभागाच्या इशाऱ्याप्रमाणे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाल्यास अनेक खरीप आणि रब्बी पिकांसाठी तो नुकसानकारकच ठरेल. 

देशपातळीवरही पाऊसमान आणि पिकांचे काहीसे असेच चित्र आहे. कुठे महापुराने नुकसान तर कुठे मोठ्या खंडाने वाया गेलेली खरीप पिके. यावर्षीच्या पावसाने बहुतांश धरणे भरली आहेत, ही बाब दिलासादायक असली तरी त्यातील पाण्याचा योग्य वापर व्हायला हवा. यावरून पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडला म्हणजे सारेच आलबेल झाले, असे काही नाही. उलट पावसाळ्यापूर्वी हवामान अंदाजांनी निर्माण केलेल्या आशादायक परिस्थितीचे शेवटी निराशेतच रूपांतर झाले आहे. त्यामुळे दीर्घ अवधी हवामानाचा अंदाज व्यक्त करताना मॉन्सूनचे निश्चित आगमन, पावसातील मोठे खंड नेमके कधी आणि कुठे पडणार तसेच अतिवृष्टीबाबतही अधिक स्पष्टता हवी. अल्पावधीच्या अंदाजातही ठोबळ ठोकताळ्यांपेक्षा नेमकेपणा गरजेचा आहे.

हवामानशास्त्र विभागाचे अधिकृत अन् अचूक अंदाज, इशारे शेतकऱ्यांबरोबर सर्वसामान्य लोकांपर्यंत वेळेत पोचायला हवेत. असे झाले तर तथाकथीत हवामान तज्ज्ञांच्या अंदाजांनी लोकांमध्ये संभ्रम पसरणार नाही, हेही लक्षात घ्यायला हवे. यावर्षीच्या पावसाळ्यात वारंवार उद्भवलेली सागरी वादळे आणि त्यातून अनेक ठिकाणी झालेली अतिवृष्टी हा हवामान बदलाचा परिणाम असल्याचेही अनेक हवामान तज्ज्ञांकडून बोलले जात आहे. अशावेळी हवामान बदलास आता गांभीर्याने घ्यावेच लागणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com