‘खतवापर क्रांती’च्या दिशेने एक पाऊल 

दाणेदार युरियाच्या तुलनेत अनेक अंगानी सरस असलेला नॅनो युरिया पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये व्यावसायिक वापरासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.
agrowon editorial
agrowon editorial

‘इफ्को’ने (इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेड) दाणेदार युरिया द्रव स्वरूपात आणला आहे. यासाठी त्यांनी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. नॅनो युरियाचे संशोधन आणि निर्मिती हा देशातील नव्हे तर जगातील पहिला प्रयोग आहे. किमतीमध्ये स्वस्त, हाताळणी तसेच वापरास सोपे सुटसुटीत आणि मुख्य म्हणजे अत्यंत परिणामकारक, असा हा नॅनो युरिया आहे. नॅनो युरियाचे फायदे येथेच संपत नाहीत, तर जमीन-पाणी-हवेचे प्रदूषण कमी करण्याबरोबरच खतासाठी दिले जात असलेले शासनाचे अनुदान मोठ्या प्रमाणात वाचविण्याचे काम नॅनो युरियाद्वारे होणार आहे. नॅनो युरिया म्हणजे ३० ते ५० नॅनोमीटरच्या नत्र कणांचे द्रावण! एक नॅनोमीटर म्हणजे एक मीटरचा अब्जवा भाग! दाणेदार युरियाचा एक दाणा म्हणजे ५० हजार नॅनो युरियाचे कण. यावरून हे कण किती सूक्ष्म असतात, याचा अंदाज आपल्याला यायला हवा. दाणेदार युरिया फेकून अथवा पेरून देताना त्याच्या एका कणाने केवळ एक ते दोन मिलिमीटर क्षेत्र व्यापते. परंतु त्याच प्रमाणातील ५० हजार नॅनो नत्र कण जेव्हा आपण फवारतो तेव्हा क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात व्यापले जाते. दाणेदार युरिया जेव्हा पिकाला दिला जातो तेव्हा तो ७० ते ७५ टक्के वाया जाऊन २५ ते ३० टक्केच उपलब्ध होतो. नॅनो युरियाची पिकावर फवारणी केल्यास थेट पर्णरंध्राद्वारे नत्र शोषले जाऊन ते पिकाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. नॅनो युरियाची अन्नद्रव्ये वापर कार्यक्षमता ८६ टक्के आढळून आली आहे. 

नॅनो युरिया हा अर्ध्या लिटरच्या बॉटलमध्ये उपलब्ध होणार असून ३ ते ४ मिलि प्रतिलिटर पाण्यात मिसळून पिकांवर फवारणीची शिफारस करण्यात आली आहे. दाणेदार युरियाच्या एका बॅंगची किंमत २६५ रुपये शेतकऱ्यांना पडते. परंतु त्यावर जवळपास ११०० रुपये अनुदान शासनाला द्यावे लागते. एकूण रासायनिक खत वापराच्या ५५ टक्के वापर हा एकट्या दाणेदार युरियाचा होतो. अनुदानामुळे स्वस्तात उपलब्ध होत असलेल्या दाणेदार युरियाच्या अनियंत्रित वापराचे पीक, जमीन, पाणी यावर अनेक दुष्परिणाम देखील होत आहेत. नॅनो युरियाच्या एका बॉटलची किंमत २४० रुपये असून, ती ४५ किलो दाणेदार युरियाच्या एका बॅंगचे काम करणार आहे.

नॅनो युरियाचा वापर वाढला तर शासनाचे कोट्यवधींचे अनुदान वाचणार आहे. अशा वाचलेल्या अनुदानाचा उपयोग इतर शेतीविकास कामांसाठी होऊ शकतो. दाणेदार युरिया कारखान्यात तयार होतो. तो तयार करीत असताना मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. नॅनो युरिया हा प्रयोगशाळेत तयार होतो. त्यामुळे पर्यावरण प्रदूषणाचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. दाणेदार युरियाच्या तुलनेत अनेक अंगांनी सरस असलेला नॅनो युरिया पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये व्यावसायिक वापरासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. उच्च तंत्रज्ञानावर आधारित अन् उपयुक्त अशा नॅनो युरियाला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभायला हवा. असे झाल्यास कमी खर्चात पीक उत्पादन वाढ अन् पर्यायाने उत्पन्न वाढ साधली जाणार आहे. पिकांच्या वाढीसाठी १६ ते १७ अन्नघटकांची गरज असते. नत्र त्यांपैकी एक घटक आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे नॅनो युरियानंतर डीएपीसह इतरही अन्नघटक नॅनो स्वरूपात आणण्यासाठी इफ्कोने काम सुरू केले आहे. रासायनिक खतांमध्ये असे द्रवरूप नॅनो तंत्रज्ञान एकंदरीतच खत वापरामध्ये क्रांती घडून आणेल, यात शंका नाही.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com