नागपूर ः जगाच्या तुलनेत भारताची आणि त्यातही महाराष्ट्राची प्रति हेक्टरी कापूस उत्पादकता
अॅग्रो विशेष
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मक
बंगालच्या उपसागरात अतितीव्र निवार चक्रीवादळ उठले आहे. त्याचा प्रभाव सध्या राज्यात जाणवत असून ढगाळ हवामानासह काही ठिकाणी पाऊस पडत आहे. अशा विपरित हवामानामुळे रब्बी हंगाम संकटात सापडला आहे.
खरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या पावसाने तूर हे एकमेव हंगामी खरीप पीक सोडून उर्वरित बहुतांश पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. ऑक्टोबर शेवटपर्यंत लांबलेला पाऊस तुरीस मात्र पोषक ठरला आहे. त्यामुळे राज्यभरात तुरीचे पीक चांगलेच बहरुन आले. मागील काही वर्षांपासूनच्या अनियमित पाऊसमानाने प्रामुख्याने सोयाबीनचे होत असलेले नुकसान आणि घटती उत्पादकता पाहता तसेच कापसावरील गुलाबी बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तूर हे पीक राज्यातील शेतकऱ्यांना आश्वासक वाटू लागले आहे. विदर्भ, मराठवाड्यात तर आता तूर या पिकाचा आंतरपीक म्हणून नव्हे तर मुख्य पीक म्हणूनच विचार करावा लागेल, अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चाही सुरु आहे. मात्र, सध्या नोव्हेंबर महिन्यामध्ये हवामान बदलत असलेल्या रंगामुळे खरीपातील चांगले आलेले तुरीचे पीक धोक्यात आले आहे. तूर पीक ऐन फुलोऱ्यात असताना सातत्याचे ढगाळ वातावरण आणि काही भागात होत असलेल्या पावसाने तुरीची फुलगळ होत आहे तसेच पानं, फुलं आणि शेंगा खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे तूर उत्पादक सध्या चिंतातूर आहेत.
चालू रब्बी हंगामाबाबत बोलायचे झाले तर लांबलेल्या पावसाने सुरवातीला रब्बीची मशागत आणि पेरण्या खोळंबल्या. त्यामुळे ज्वारी, हरभरा आणि गहू या पिकांच्या पेरणीला थोडा विलंब झाला. रब्बी पिकांची पेरणी, उगवण आणि त्यानंतरच्या वाढीच्या अवस्थेत निरभ्र आकाश, स्वच्छ-थंड हवामान अनुकूल असते. परंतू सध्याचे वातावरण नेमके याच्या उलट आहे.
राज्यात नोव्हेंबरमध्ये थंडी पडायला नेमकी सुरवात झालेली असताना बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण पसरुन थंडी गायब झाली. पुढे पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण होऊन काही ठिकाणी पावसाच्या सरीही कोसळल्या. राज्याच्या बऱ्याच भागात वादळी वारेही वाहू लागले. या वाऱ्याने रब्बी पिकांना आडवे करायचे काम केले तर पडणाऱ्या पावसाने गहू, हरभऱ्याला मर लागून वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला. हे वातावरण निवळत आहे असे वाटत असतानाच बंगालच्या उपसागरात अतितीव्र निवार चक्रीवादळ उठले. त्याचा प्रभाव सध्या राज्यात जाणवत असून ढगाळ हवामानासह काही ठिकाणी पाऊस पडत आहे. अशा विपरित हवामानामुळे रब्बी हंगाम संकटात सापडला आहे. द्राक्ष, आंबा, डाळिंब आदी फळपिके उत्पादकही धास्तावलेले आहेत.
सातत्याने बदलत असलेल्या हवामानानुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन तसेच पीक सल्ले, ही बाब कृषी विभागाने अजूनही गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. तुरीवरील पाने गुंडाळणाऱ्या, शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचे नियंत्रण असो की गहू, हरभरा पिकाला लागलेली मर असो शेतकरी कृषी सेवा केंद्र चालकांच्या सल्ल्याने कीडनाशके तसेच विविध प्रकारचे टॉनिक्स आणून फवारण्या करीत आहेत. बहुतांश कृषी सेवा केंद्र चालक त्यांच्याकडे उपलब्ध असलेली कीडनाशके आणि टॉनिक्स हेच कसे चांगले, असे शेतकऱ्यांना पटवून देऊन स्वःतचा गल्ला भरत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पिकाला योग्य कीडनाशके मिळत नसल्याने त्याचे अपेक्षित परिणाम तर दिसतच नाहीत, उलट शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत आहे.
रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्ती फारशा उद्भवत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा कल पिकविम्याकडे दिसून येत नाही. परंतू मागील काही वर्षांपासून ऱब्बी हंगामातील पिकांचेही अवकाळी पाऊस, गारपीट, तापमानातील चढ-उतार, धुके यामुळे नुकसान वाढत आहे. त्यामुळे रब्बी पिकांचा विमा उतरविण्याची वेळ अजूनही गेलेली नाही. अधिकाधिक शेतकऱ्यांनी रब्बी पिकांना विमा संरक्षण द्यायला हवे, यातच त्यांचे हित दिसून येते.
- 1 of 655
- ››