सरत्या वर्षाचा सांगावा

तापमान, पाऊस आणि थंडी या सर्वांमध्ये उच्चांकी अशी नोंद आणि त्याचे शेतीसह सर्वसामान्य जीवनमानावर झालेले गंभीर दुष्परिणाम सरत्या वर्षात आपण सर्वांनी चांगलेच अनुभवले आहेत.
agrowon editorial
agrowon editorial

वर्ष २०१९ हे सर्वच प्रकारच्या विपरीत हवामानाने चांगलेच गाजले. या वर्षी उन्हाळ्यात राजस्थानसह विदर्भातील काही गावांत तापमानाचा पारा ४८ अंश सेल्सिअसवर जाऊन पोचला होता. जानेवारी ते मे ही पाच महिने तीव्र दुष्काळाची होती. या काळात महाराष्ट्रासह अर्ध्याहून अधिक देशाला पाणीटंचाईच्या झळा बसल्या. दुष्काळाने शेती आणि पशुधनाचे अपरिमित नुकसान झाले. मे महिन्याच्या सुरुवातीलाच फणी या चक्रीवादळाचा तडाखा भारताला बसला. हे वादळ मागील २० वर्षांतील सर्वाधिक शक्तिशाली मानले जाते. २०० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने ओडिशासह दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यांतील जनजीवन विस्कळित करून टाकले. या वादळाने शेतीचे मोठे नुकसान तर झालेच; त्याचबरोबर ३४ लाखांहून अधिक लोकांना आपले घरदार सोडून स्थलांतर करावे लागले होते. खरे तर मागील पाच दशकातील सर्वाधिक १९ वादळांची नोंद २०१९ मध्ये झाली आहे. या वर्षी समुद्रात उठलेल्या प्रत्येक वादळाने धो-धो पाऊस पाडला. त्यामुळे महापुरानेदेखील हे वर्ष गाजविले आहे. उत्तर भारतात या वर्षी महापुराने १९०० जणांचा बळी घेतला आहे. पूर्ण देशाचा विचार करता महापुराने मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा याच्या दुप्पट होतो. महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांसह राज्यभर महापुराने घातलेल्या थैमानातही जीवित, वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. मेघगर्जनेसह होणाऱ्या पावसात विजा पडून मृत्यू पावलेल्यांची संख्या या वर्षी अधिकच राहिली आहे. मागील दोन दिवसांपासून उत्तर भारतात थंडीची लाट उसळली आहे. काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. अनेक भागातील तापमान शून्याच्या खाली उणे २० अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. विदर्भही चांगलाच गारठला आहे. तीव्र थंडीच्या लाटेने देशभरात २० हून अधिक जणांचा बळी घेतला आहे. 

तापमान, पाऊस आणि थंडी या सर्वांमध्ये उच्चांकी अशी नोंद आणि त्याचे शेतीसह सर्वसामान्य जीवनमानावर झालेले गंभीर दुष्परिणाम या वर्षी आपण सर्वांनी चांगलेच अनुभवले आहेत. अशा प्रकारच्या वाढत्या नैसर्गिक आपत्तीस हवामान बदलच जबाबदार असल्याचे यापूर्वी अनेक वेळा अनेक संस्था-तज्ज्ञांनी स्पष्ट केले असले, तरी इंग्लंड येथील ‘ख्रिश्चन एड’ या संस्थेनेही एका अहवालातून नुकतेच हेच जाहीर केले आहे. हवामानतज्ज्ञ मिशेल मान म्हणतात, ज्वलंत इंधनाचा वापर आणि वातावरणात कार्बन उत्सर्जन असेच होत राहिल्यास पृथ्वी हा ग्रह अधिक उष्ण होईल आणि या घटना घडण्याचे प्रमाण वाढतच जाईल. गंभीर बाब म्हणजे हवामान बदलाचे सर्वाधिक दुष्परिणाम उष्ण कटिबंधातील भारत देशाला जाणवतील असेही जागतिक पातळीवरून अनेकदा सांगितले आहे. या वर्षी भारतात अनेक ठिकाणी झालेली अतिवृष्टी आणि ढगफुटी तसेच तापमान, पाऊसमान, थंडी यामध्ये होत असलेली उच्चांकी नोंद यातून शास्त्रज्ञांचा इशारा खरा ठरत असल्याचे दिसते. या वर्षी निर्माण झालेली सर्वाधिक वादळे हे समुद्राचे तापमानवाढीचा परिणाम आहे. आणि देशातील प्रदूषण, कार्बन उत्सर्जन असेच होत राहिले, तर पावसातील अनिश्चितता ५० टक्क्यांनी वाढेल, असाही इशारा तज्ज्ञांकडून मिळालेला आहे. आपल्या देशातील शेती मॉन्सूनचे पाऊसमान आणि त्यानुसार वेळोवेळी बदलणाऱ्या ऋतुचक्रावर आधारलेली आहे. यातील एक घटक पाऊसमान अनिश्चित झाला, तरी पुढील प्रत्येक घटक बदलत जातो. तसा अनुभवही सरत्या वर्षाने दिलेला आहे. देशात ऋतुमानानुसार बसलेली शेतीची घडी, पीकपद्धती विस्कळित झाली, तर त्याची फार मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल, हे लक्षात घेऊन बदलत्या हवामानात कसे पुढे जायचे, हे शेतकरी, शासन आणि शेती-हवामानाशी संलग्न संस्थांनी एकदाचे ठरवायलाच  हवे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com