या देवी सर्वभूतेषु...

स्त्रिया या पुरुषांपेक्षा अधिक सहनशील, मेहनती, जिद्दी, कल्पक, खंबीर आणि व्यवहारी असतात.
agrowon editorial
agrowon editorial

देशभर सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे. आश्‍विन शुद्ध प्रतिपदेपासून पुढे दसऱ्यापर्यंत नऊ दिवस दुर्गा देवीचा, अर्थात शारदीय नवरात्र उत्सव सर्वत्र साजरा केला जातो. कोरोना महामारीच्या काही मर्यादांमुळे या उत्सवाच्या धूमधडाक्यात थोडी कमी दिसत असली, तरी धार्मिकतेने हा सण साजरा करण्यात कोणताही कसूर दिसत नाही.  या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थितः। या देवी सर्वभूतेषु शक्तीरूपेण संस्थितः। या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थितः। नमस्तस्यैः नमस्तस्यैः नमस्तस्यैः नमो नमः।।    अर्थात, सर्व प्राणिमात्रांत मातृत्व, शक्ती, शांती याबरोबरच दया, क्षमा, चैतन्य, कांती, बुद्धी, विद्या, श्रद्धा, भक्ती, लक्ष्मी, तृष्णा अशा रूपांत स्थित देवीला माझा नमस्कार... वारंवार नमस्कार! 

शेती संस्कृतीशी नवरात्र तसेच त्यानंतर येणाऱ्या दसऱ्याला महत्त्वाचे स्थान आहे. नवरात्र हा शेतीमध्ये स्थित्यंतराचा काळ आहे. पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागलेली असते. खरिपातील पिकांची काढणी आणि रब्बी हंगामाच्या तयारीचा हा काळ! नेमक्या अशवेळी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते. घट हे देहाचे प्रतिनिधित्व करतो. याचा आशय मानवामधील शक्तीजागरणाशी, जीवनाच्या उन्नत अवस्थेला पोहोचण्यासाठीच्या प्रतिबद्धतेशी जोडलेला आहे. या धार्मिक भावनेबरोबर घटस्थापनेमागे शास्त्रीय दृष्टिकोनदेखील आहे. शेतातील माती, पाण्याचा कलश वापरून तयार केलेल्या घटात रब्बी हंगामासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध पिकांच्या बियाण्यांची घरातील महिलेद्वारे पेरणी केली जाते. कलशातील पाणी घटावर दररोज थोडे थोडे शिंपडल्याने पेरलेले बियाणे उगवून येते. यावरून नेमके कोणते पीक घ्यायचे, त्यांचे बियाणे कसे, किती वापरायचे याचा अंदाज शेतकऱ्यांना येतो. घटस्थापनेद्वारे रब्बीतील पिकांच्या बियाण्याची एकप्रकारे उगवनशक्तीच तपासली जाते.

शेती हा शब्दच ‘ति’च्याशिवाय पूर्ण होत नाही. शेती व्यवसायाची खरे तर तीच जननी आहे. शेतीचा शोध आणि त्यानंतर आजपर्यंतचे सर्व कालसुसंगत विविध बदल, या सर्व टप्प्यांत महिलांचा शेतीत सहभाग वाढतच गेला आहे. आजही पेरणीपासून ते पिकांच्या काढणीपर्यंतची बहुतांश कामे विशेष म्हणजे घर-संसार सांभाळून महिलाच करतात. शेतीला कल्पकतेने दुग्ध व्यवसाय, शेळी-मेंढी-कोंबडीपालनाची जोडसुद्धा महिलांनीच दिली आहे. एवढेच नव्हे तर काळाची पावले ओळखत शेतीमाल प्रक्रिया ते विक्री यातही महिलांचा सहभाग आता वाढतोय. स्त्रिया या पुरुषांपेक्षा अधिक सहनशील, मेहनती, जिद्दी, कल्पक आणि व्यवहारी असतात.

कर्जबाजारीपणा तसेच शेतीतील इतर अडचणींना कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु शेतकरी महिलेने कधी आत्महत्या केल्याचे दिसून येत नाही. त्याही पुढे जाऊन पतीच्या आत्महत्येनंतर उद्‌ध्वस्त झालेले संसार आणि शेती अनेक महिलांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. हे तिच्या खंबीरतेचा आदर्शवत नमुना आहे. असे असताना ग्रामीण भागात खासकरून शेतकरी कुटुंबात महिलांना निर्णयप्रक्रियेत अजूनही स्थान नाही. जमिनीची मालकी देखील १२ ते १३ टक्के महिलांकडेच असल्याचे दिसते. स्त्री-पुरुष समानता, या गोंडस नावाला आजही ग्रामीण भागात समाजमान्यता मिळालेली नाही. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिला मजुरांना पुरुषांपेक्षा कमी मजुरी दिली जाते. ठरावीक वर्तुळाबाहेर काम करण्यास तिला बंधने घातली जातात. घरात आणि घराबाहेर सुद्धा महिला असुरक्षित आहे. नवरात्रीकडे स्त्री शक्ती जागराचा उत्सव म्हणूनही आपण पाहतोय. अशावेळी शहरातील असो की ग्रामीण स्त्रियांना सर्वत्र सन्मान आणि समानतेची वागणूक मिळायला हवी. तिचे पंख छाटण्याऐवजी तिला निर्णय ते अंमलबजावणी प्रक्रियेत पूर्ण स्वातंत्र्य दिले गेले पाहिजे. असा हा बदलच या आदिशक्तीचा खऱ्या अर्थाने जागर ठरेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com