दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस शेतकऱ्यांचे नवीन तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदो
संपादकीय
नवे वर्ष नवी उमेद
कोरोनामुळे उद्भवलेली संकटे कमी होती की काय, म्हणून सरत्या वर्षात निसर्ग पण शेतकऱ्यांच्या मागे हात धुऊन लागला होता. परंतु अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्यावर मात केली आहे.
सरत्या वर्षाने (२०२०) निसर्गापुढे मानवाच्या मर्यादा आणि त्याचबरोबर शेतीतील अमर्याद संधी दाखवून दिल्या आहेत. या वर्षाची सुरुवात होण्याआधीच (नोव्हेंबर २०१९) चीनमध्ये कोरोना विषाणूचे संक्रमण सुरू झाले. अल्पावधितच अदृश्य अशा जिवाने संपूर्ण जगाला बंदिस्त करून टाकले. आपल्या देशात मार्चअखेरपासून ते जूनपर्यंत तीन महिने कडक टाळेबंदी होती. माणूसच घरात कोंडला गेल्यामुळे उद्योग-व्यवसाय-सेवा ही क्षेत्रे ठप्प झाली. केंद्र-राज्य शासनाकडे विविध कररूपाने येणारा पैशाचा ओघ कमी झाला. कोरोनाने संपूर्ण जगासह भारताचेही अर्थचक्र थांबविले. देशात हातावर पोट असणाऱ्या मजुरांपासून ते लहान-मोठ्या उद्योजकांना ‘आता कसे होणार’ या चिंतेने ग्रासले होते. अशा परिस्थितीतही चालू होते ते केवळ शेतीक्षेत्र! सर्व जग घरात बंदिस्त असले तरी त्यांना अन्नपाणी तर लागणारच होते. आणि त्याचसाठी टाळेबंदीमध्ये सुद्धा शेतीत अन्न पिकविणे तसेच ते गाव-शहरातील सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू होती.टाळेबंदीत पोलिसांच्या भीतीतही दूध-फळे-भाजीपाला शेतकऱ्यांनी घरोघरी पोचविला. या त्यांच्या कामगिरीला सलाम!
टाळेबंदीच्या काळात देशात उन्हाळा होता. मागच्या हंगामातील रब्बी पिकांची काढणी झालेली होती. त्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी आदी शेतीमाल विकण्यास शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली. मागणी ठप्प, दर पडलेले यांत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यातच उन्हाळी मशागतीची कामे खोळंबली होती. अधिक मजुरी आणि यंत्रासाठी जास्तीचे भाडे देऊन शेतकऱ्यांना मशागत करून घ्यावी लागली. जूनपासून टाळेबंदी थोडी शिथिल झाली तरी लोकांच्या मनात कोरोनाची भीती होतीच. घरातील शेतीमाल घरातच पडून असल्यामुळे आणि पीककर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक ताण होता. खरीप पेरणीकरिता निविष्ठांच्या टंचाईने अधिक दराने त्यांची खरेदी करावी लागली. परंतु येथेही बळीराजा मागे हटला नाही आणि खरीप हंगामात आपले राज्यच नाही, तर देशभर विक्रमी क्षेत्रावर पेरणी झाली.
कोरोनामुळे उद्भवलेली संकटे कमी होती की काय, म्हणून सरत्या वर्षात निसर्ग पण शेतकऱ्यांच्या मागे हात धुऊन लागला होता. पावसाळ्यात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या पावसाने पिकांबरोबर शेतकऱ्यांनी पाहिलेली स्वप्नेही वाहून गेली. परंतु शेतकरी खचला नाही, तर पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागला. त्याची फळे रब्बी हंगामातील जोमदार पिकांच्या रूपाने आज दिसत आहेत. संकटांच्या अशा मालिकेत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट, समूह, उत्पादक कंपन्या यांच्या माध्यमातून शेतीमालाचे उत्पादन घेताना आणि विक्री करताना येणाऱ्या अडचणींवर मात केली. यावरून एकत्रित शेती आणि शेतीमाल विक्री हाच भविष्यातील शेतीचा राजमार्ग असल्याचे दिसून येते. शिवाय निविष्ठांपासून ते निर्यातीपर्यंतच्या सोयीसुविधांसाठी गाव आत्मनिर्भर झाले पाहिजे, हेही २०२० या वर्षाने शिकविले आहे. देशाची अर्थव्यवस्था रसातळाला जात असताना शेती क्षेत्रच त्यास तारू शकते, हेही दिसून आले आहे. हवामान बदल शेतीत निर्णायक ठरत आहे. आपल्याकडे अजूनही या विषयीचे गांभीर्य दिसत नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन नियोजनकर्त्यांनी शेतीची ध्येयधोरणे आखायला हवीत, तरच या देशातील शेती आणि शेतकरीही टिकेल.
नवीन वर्षात अॅग्रोवन ‘नव्या रूपात येत आहे. शेती मशागतीबरोबर मनाची मशागत करणारी काही नवीन सदरेही सुरू केली आहेत. मांडणीतही आकर्षक बदल केले आहेत. हा बदल वाचकांना निश्चितच आवडेल. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
- 1 of 82
- ››