निसर्ग आणि मॉन्सून

जूनच्या सुरवातीला सतत चार दिवस पाऊस म्हणजे ‘मॉन्सून आला’ असा सर्वसाधारण संकेत असून हवामानशास्त्र विभागही याच आधारावर अनेक वेळा मॉन्सून आल्याचे जाहीर करते.
agrowon editorial
agrowon editorial

अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटक किनाऱ्यालगत निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ बुधवारला (३ जून) अलिबागजवळ धडकले. ताशी जवळपास १२५ किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, सोबत मुसळधार पाऊस घेऊन आल्याने कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात शेती, शेतीपूरक व्यवसाय, ग्रीनहाऊस, पॉलिहाऊस याबरोबरच घर, गोठ्यांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. या वादळाचे हवामान विभागाने आधीच भाकीत केले होते, त्यानुसार शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता. त्यामुळे जीवित-वित्त हानी थोडी कमी झाली आहे. निसर्ग चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीची पाहणी करुन संबंधित सर्वांना भरपाई मिळायलाच हवी, यात शंकाच नाही. परंतू राज्यभर लवकरच सुरु झालेल्या पावसाने टंचाईग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. या पावसाने चाराही लवकर उगवून टंचाई दूर होईल. तसेच पेरणीपूर्व तर काही ठिकाणी खरीप पेरणीच्या कामांना पण वेग आलाय, हे ‘निसर्ग’च देणंच म्हणावं लागेल.

खरं तर तासी ११८ किलोमीटर वाऱ्याचा वेग असलेल्या चक्रीवादळाला अतितीव्र वादळ म्हटले जाते. निसर्गचा वेग तर त्याहूनही अधिक आहे. असे असले तरी हे चक्रीवादळ आणि मॉन्सूनचा जवळचा संबंध असल्याचे मत काही हवामानतज्ज्ञ शास्त्रीय आधारानिशी व्यक्त करतात. भारतीय हवामानशास्त्र विभाग मात्र मॉन्सून केरळमधून कर्नाटकात दाखल झाला आहे, राज्यात त्याच्या आगमनास अजून वेळ आहे, असे सांगत आहे. जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा पावसाळ्याचा काळ मानला जातो. ४ सप्टेंबरनंतर पडणाऱ्या पावसाचा समावेश मॉन्सूनच्या पावसात करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. तसेच जूनच्या सुरवातीला सतत चार दिवस पाऊस म्हणजे ‘मॉन्सून आला’ असा सर्वसाधारण संकेत असून हवामानशास्त्र विभागही याच आधारावर अनेक वेळा मॉन्सून आल्याचे जाहीर करते. अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये निसर्ग चक्रीवादळ आणि मॉन्सूनचे आगमन याचा थेट काही संबंध आहे की नाही, हे हवामानशास्त्र विभागानेच स्पष्ट करायला हवे. दरवर्षीचे हवामान वेगळे असते, मॉन्सूनही वेगळा असतो. त्याचे आगमन आणि वितरण यातही भिन्नता आढळून येते. मॉन्सूनच्या आगमनासंबंधी अनेक निकष आहेत. पण दरवर्षी ते सगळेच लागू पडतात असे नाही. विशेष म्हणजे मॉन्सून आला हे कसे ओळखायचे? याला सरळ, काटेकोर आणि सर्वसंमत असे वैज्ञानिक उत्तर अजूनही मिळालेले नाही. खरे तर मॉन्सूनचे महाराष्ट्रातील आगमन ही स्थानिक घटना मानली जाते. म्हणून तिचे पुर्वानुमान तीन-चार दिवस आधी करता येते. महाराष्ट्रात ८ ते १० जून दरम्यान येणाऱ्या मॉन्सूनने यापूर्वी मे च्या अखेरीसच हजेरी लावल्याचे, तर कधी जूनच्या शेवटपर्यंत वाट पाहावी लावल्याचे अनेक उदाहरणे आहेत. जूनचा पहिला आठवडा हा खरीप पिकांच्या पेरणीसाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. या काळात पेरणी झालेल्या पिकांची उगवण चांगली होते. पुढे पीक निरोगी राहून उत्पादकताही अधिक मिळते, हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. यावरुनच ‘आबक पेरण्या सुबक पीक’ अशी म्हण शेतकऱ्यांमध्ये रुढ झालेली आहे. राज्यात मागील चार-पाच दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी बळीराजाने पेरण्या सुरु केल्या आहेत. झालेला पाऊस, पुढील अंदाज, जमिनीतील ओलावा तसेच पिकांच्या पेरणीची वेळ यानुसार शेतकऱ्यांचे खरीप पिकांच्या पेरणीचे नियोजन असते. अशावेळी हवामान आणि कृषी तज्ज्ञांनी त्यांना याबाबत अधिक स्पष्टतेने मार्गदर्शन करायला हवे.

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com