agriculture news in marathi agrowon agralekh on one work one salary system for agriculture labors in Maharashtra | Agrowon

काम सुरळीतपणे पार पाडण्याचे धोरण

विजय सुकळकर
मंगळवार, 27 जुलै 2021

शेतीत कामांच्या वेळा आणि मजुरीच्या दरावरून वाद होत असताना कामनिहाय वेतनाचे धोरण योग्यच म्हणावे लागेल.

राज्याच्या कोणत्याही भागात कधीही गेलो तरी तेथील शेतकऱ्यांकडून मजूर समस्येचे गाऱ्हाणे ऐकू येतेच. पेरणी तसेच पिकांची काढणी मळणी, अशा हंगामात ही समस्या अधिकच तीव्रतेने जाणवते. आज आपण पाहतोय शेतीत यांत्रिकीकरण वाढतेय. परंतु लहान आकाराच्या शेतीस आजही फारशी उपयुक्त यंत्र-अवजारे उपलब्ध नाहीत. तसेच शेतीतील सर्वच कामे यंत्रांनी होत नाहीत, ती शेतकऱ्यांना स्वतः करावी लागतात, नाही तर मजुरांकडूनच करून घ्यावी लागतात. असे असताना शेतीत काम करायला सध्या फारसे मजूरच उरले नाहीत. गावपरिसरात रोजगार हमी योजनेसह इतरही बरीच कामे मजुरांना मिळू लागली आहेत. महत्त्वाचे म्हणजे शहरात जाऊन काहीही काम करू, पण शेतीची कामे नकोत, अशी खासकरून खेड्यातील तरुणांची मानसिकता बनली आहे. त्यामुळे शेतीत मजूरटंचाईच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. अशा परिस्थितीत गावात उपलब्ध मजूर मनमानी मजुरी मागतात, कामांच्या वेळाही ठरलेल्या नसल्यामुळे टंगळमंगळ करून दिवसाची भरती करायची, असेही प्रकार काही ठिकाणी पाहावयास मिळतात. काही शेतकऱ्यांना वेळेत कामे उरकून घ्यायची असतात. असे शेतकरी अधिक मजुरी देऊन कामे करून घेतात. अशा एखादं-दुसऱ्या शेतकऱ्याने दिलेली मजुरी गावातील इतर शेतकऱ्यांना परवडणारी नसते. मजूर त्याच मजुरी दरावर अडून बसतात. काही ठिकाणी या उलटही प्रकार पाहावयास मिळतो. मजुरांना गत्यंतर नसल्यामुळे काही ठिकाणी कमी मजुरीत अधिक कामे करून घेत शेतकऱ्यांकडून मजुरांची देखील पिळवणुक होते. असे एकमेकांच्या अडवणुकीचे पेच बहुतांश गावात पाहावयास मिळतात. गोंदिया जिल्ह्यातील पांढराबोडी गावाने हा पेच ‘समान काम समान वेतन’ धोरणाचा अवलंब करून दूर केला आहे.

पूर्वी शेतकरी आणि शेतमजूर यांच्यामध्ये परस्पर सामंजस्य खूप होते. शेतजमिनीचे क्षेत्र अधिक होते. त्यामुळे अनेक शेतकरी वर्षभर शेतीत काम करण्यासाठी सालदार (गडी) ठेवत. सालदाराच्या कुटुंबातीलच महिला-मुलं आपल्या मालकाकडे हंगामी मजुरीची कामे करीत असत. गड्यांना वर्षभरासाठीचे साल (वेतन) आणि हंगामी मजुरीचे दरही सर्व गावकरी मिळून परस्पर संमतीने ठरवीत असत. महत्त्वाचे म्हणजे काळवेळ याचा विचार न करता सालगडी असो की हंगामी मजूर हे पूर्ण निष्ठेने आणि जबाबदारीने शेतातील सर्व कामे करीत. आता हे सर्व जवळपास लुप्त झाले आहे. त्यामुळे देखील कामांच्या वेळा आणि मजुरीच्या दरावरून वाद होत असताना कामनिहाय वेतनाचे धोरण योग्यच म्हणावे लागेल. एखादे काम पैसे देऊन जेव्हा कोणी करून घेते, तेव्हा ते ठरावीक वेळेत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा असते. शासकीय कार्यालये तसेच खासगी कंपन्या यामध्ये काम करणाऱ्या नोकरदार वर्गाचे कामाचे स्वरूप, काम करण्याच्या वेळा आणि वेतन ठरलेले असते. त्यामुळे अशा कंपनी, कार्यालयातील कामे नियोजनानुसार पार पडतात. शेती क्षेत्रच यापासून वंचित आहे. त्याचे बरेवाईट परिणाम शेतमालक आणि मजूरदार या दोन्ही घटकांना भोगावे लागत आहेत. समान काम समान वेतन या धोरणाने शेतमालक आणि मजूर अशा दोघांच्याही अडचणी दूर होऊन शेतीची कामे सुरळीत पार पडण्यास हातभार लागेल. ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडही आकारला जाणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून नियम पाळले जातील. राज्यात सध्या शेतीची कामे खूपच विस्कळीतपणे पार पाडली जात असताना पांढराबोडी गावचा आदर्श राज्यातील इतर गावांनीही घ्यायला हरकत नाही.


इतर संपादकीय
भारतातील मोटार गाड्यांसाठी इथेनॉल...पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचा कार्यक्रम...
सोयाबीन विक्री करा जरा जपूनचमागील दोन महिन्यांपासून सोयाबीन हे पीक देशभर...
खरे थकबाकीदार ‘सरकार’च  वीजबिलाची थकबाकी ७९ हजार कोटींच्या घरात पोहोचली...
देवगड ‘राम्बुतान’हापूस आंब्याच्या प्रदेशात चक्क परदेशी फळ ‘...
‘कृषी’चे धडे घेऊनच करावी लागेल शेतीदेशात तथा महाराष्ट्रात आजही सुमारे ६० ते ६५...
हतबलतेचा अंत नका पाहूसोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर...
दूध आणि ऊस उत्पादकांच्या लुटीचे रहस्यसाखर उद्योग व दुग्ध व्यवसायामध्ये कमालीचे...
शर्यतीतील बैलांवरील ताणतणाव नियोजनबैलगाडा शर्यतीसाठी अत्यंत पद्धतशीरपणे ...
रीतसर नफ्याचा घोटाळाशेती हा असा व्यवसाय आहे, की ज्यामध्ये शेतकरी...
व्रतस्थ कर्मयोगीप्रसिद्ध ऊसतज्ज्ञ डॉ. ज्ञानदेव गंगाराम हापसे...
शुभस्य शीघ्रम्शालेय अभ्यासक्रमात कृषीचा समावेश करण्याच्या...
वाढत्या नैसर्गिक आपत्ती गांभीर्याने...पर्यावरणाच्या कडेलोटाच्या कुंठितावस्थेचं ...
शुद्ध खाद्यतेलासाठी हेतूही हवा शुद्धपामची लागवड आणि तेलनिर्मिती वाढविण्यास केंद्र...
कात टाकून कामाला लागानागपूर येथील `केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन...
घातक पायंडाजनुकीय बदल केलेल्या (जीएम) सोयापेंड आयातीला...
ऊस रसापासून थेट इथेनॉल निर्मितीचे हवे...जागतिक पातळीवर उसाच्या थेट रसापासून ३२ टक्के व...
‘गोल्डनबीन’ची झळाळी टिकवून ठेवा मागील दशकभरापासून राज्यात सोयाबीन (गोल्डनबीन)...
दिलासादायक दरवाढ खरे तर यंदाच्या साखर हंगामात साखरेच्या किमान...
अन्नप्रक्रिया योजना ठरताहेत मृगजळ भारतात उत्पादित शेतीमालापैकी ४० टक्के माल सडून...
शेतकऱ्यांच्या जिवांशी खेळ थांबवा सुमारे चार वर्षांपूर्वी २०१७ च्या खरीप हंगामात...